गुलशन कुमारची विकेट पडणार याचा प्लॅन राकेश मारिया यांना अगोदरच कळला होता….

बॉलिवुडमध्ये डी गँग शिरकाव करू पाहत होती. कुठलाच दिग्दर्शक डी गँगच्या लफडयात पडू इच्छित नव्हता. कारण एकदा का पैसे यायला लागले आणि पिक्चर प्रोड्युस व्हायला लागले जर पोलिसांना कळलं की अंडरवर्ल्ड सिनेमे प्रोड्युस करत आहे तर लाइफटाइम जेलमध्ये जावं लागेल. पण पोलिसांनी मोठया हुशारीने अंडरवर्ल्ड हादरवून सोडलं होतं. बॉलिवूडमध्ये पहिला मर्डर डी गँगकडून घडवण्यात आला तो म्हणजे कॅसेट किंग गुलशन कुमार यांचा. पण गुलशन कुमारची विकेट पडणार याचा सगळा प्लॅन अगोदरच राकेश मारिया यांना ठाऊक होता त्याबद्दलचा हा किस्सा.

मुंबई पोलीसचे माजी कमिशनर राकेश मारिया यांनी लिहिलेल्या आत्मकथनात लेट मी से इट नाउ हा सगळा किस्सा मांडलाय. या पुस्तकात अंडरवर्ल्डमधल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे आणि त्यात कॅसेट किंग गुलशन कुमारचा विकेट पडण्याचा किस्सासुद्धा आहे.26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई आतंकवादी हल्ल्याचा उल्लेखसुद्धा यात आहे आणि उरलेलं मुंबई अंडरवर्ल्ड काय आहे तेसुद्धा लिहिलेलं आहे. 1997 साली गुलशन कुमारची हत्या झाली याचा सुरवातीचा प्लॅन मारिया यांना माहिती होता पण ते गुलशन कुमारचा जीव वाचवू शकले नाही.

मारिया म्हणतात की गुलशन कुमार यांना गुंड शिव मंदिराच्या बाहेर ठोकणार हे मला माहिती होतं. हा ती काळ होता जेव्हा गुलशन कुमार या नावावर म्युझिक मार्केट चालायचं. गुलशन कुमार यांनी भक्तीसंगीत, बॉलिवुड संगीत निर्माण करून करोडो रुपये कमावले होते. तेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड सुद्धा सक्रिय झालेलं होतं. कॅसेट किंग म्हणून फेमस असलेले गुलशन कुमार टी सिरीजचे मालक झाले होते.

कॅसेट मधून गुलशन कुमार करोडो रुपये कमवत होते पण अंडरवर्ल्डच्या नजरेत त्यांचं हे यश खूपू लागलं होतं. आणि लवकरच त्यांचा गेम होणार अशी लक्षण दिसू लागली होती.

22 एप्रिल 1997 रोजी राकेश मारिया यांना एक फोन आला तो फोन त्यांच्याच एका खबरीचा होता. फोनवर फक्त एवढंच ऐकू आलं की गुलशन कुमारची विकेट पडणार आहे. शिवमंदिराच्या बाहेर जिथून गुलशन कुमार रोज पूजेला जातो तिथंच त्याचा मृत्यू होणार आहे…अगोदर तर राकेश मारिया यांना विश्वास पटला नाही म्हणून त्यांनी खबरीला पुन्हा विचारलं की तू खरं बोलतोय का ? खबरीने सांगितलं की असं घडणार नसतं तर तुम्हाला कशाला सांगितलं असतं. या प्लॅन मागे कोण आहे आणि कशासाठी चाललंय हे सगळं ? मारिया यांनी विचारलं, खबरीने अबू सलेमच नाव सांगितलं सोबतच हेही सांगितलं की गुलशन कुमारच्या मागावर शूटर्स आहेत.सगळा प्लॅन झालेला आहे.

मारिया यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी लगेचच महेश भट्टला फोन लावला आणि विचारलं की दररोज सकाळी गुलशन कुमार शिवमंदिरात जातात का ? महेश भट्टने सांगितलं की त्यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे त्यामुळे ते तिथेच जात असतात.

अगोदरच इतकी माहिती असताना गुलशन कुमार यांचा जीव का वाचवता आला नाही ?

याबाबतीत मारिया लिहितात की मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुलशन कुमार यांना सुरक्षा देण्यास सांगितलं होतं पण 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईच्या अंधेरी परिसरात स्थित शिव मंदिराच्या आवारात गुलशन कुमार यांची हत्या झाली. तपासात समोर आलं की गुलशन कुमार यांनी सुरक्षा यूपी पोलीस ठरत होते कारण यूपीच्या नोएडा मध्ये गुलशन कुमार यांची कंपनी होती त्यामुळे मुंबई पोलिसांची सुरक्षा हटवण्यात आलेली होती.

गुलशन कुमारचा मृत्यू बॉलिवुड हादरवून गेला आणि विकेट पडण्याचा प्लॅन सगळा माहीत असूनही राकेश मारिया यांना काहीच करता आलं नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.