राकेश मारियांनी कानफटात दिली आणि संजय दत्त पोपटासारखा बोलू लागला…

बॉलिवुड आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन जगाला काही नवीन नाही. बॉलिवुडचे सिनेमे अंडरवर्ल्ड प्रोड्युस करू लागलं होतं आणि सेलिब्रिटी लोकांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला होता. यात संजय दत्त टार्गेटवर आला आणि बॉलिवूडचे धाबे दणाणले.

आजचा किस्सा आहे संजय दत्तने खाल्लेल्या झापडीचा

ज्यामुळे राकेश मारिया यांच्यासारखा एक कर्तव्यदक्ष अधिकारी नव्याने समोर आला होता. मुंबईत झालेला साखळी बॉम्बस्फोट हा अनेक निष्पाप लोकांचा जीव घेऊन गेला त्याचा तपास हा राकेश मारिया करत होते. त्यावेळी त्यांनी स्वतः संजय दत्तला अटक केली होती.

आयपीएस राकेश मारिया यांनी आपलं पुस्तक लेट मी से इट नाऊमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोट कट कोणी आखला याची तपासणी सुरू झाली होती आणि अटक केलेल्या काही लोकांच्या तोंडून सतत संजय दत्तचं नाव येत होतं. त्यावेळी संजय दत्तचा यात काही हात आहे का हे शोधण्याची जबाबदारी राकेश मारिया यांच्यावर सोपवण्यात आली होती. तत्कालीन पोलीस कमिशनर अमरजीत सामरा यांचा आदेश मिळताच मारिया कामाला लागले.

19 एप्रिल 1993 रोजी ते सहारा एअरपोर्टवर पोहचले. जिथं मॉरिशसवरून संजय दत्त मुंबईला येत होता. फ्लाईट लँड होताच राकेश मारिया संजय दत्तच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. राकेश मारिया यांनी आपला परिचय देत संजय दत्तचा बोर्डिंग पास आणि पासपोर्ट ताब्यात घेतला.

हे वातावरण बघूनच संजय दत्त घाबरून गेला होता काहीही न बोलता त्याने पासपोर्ट आणि बोर्डिंग पास मारिया यांना देऊ केला. यानंतर राकेश मारिया यांनी आपल्या अँबेसिडर गाडीतून दोन पोलीस शिपायांसोबत संजय दत्तला घेऊन मुंबई क्राईम ब्रांचला रवाना झाले.

गाडीत संजय दत्त ओरडून ओरडून शिपायांना विचारत होता की कुठं घेऊन चालले म्हणून, तो घडी घडी त्याच्या ओळखीच्या लोकांकडे सोडा म्हणून आर्जव करत होता. पण गाडीतल्या पोलिसांनी त्याच्या एकाही शब्दाला उत्तर दिलं नाही. नंतर संजय दत्तला एका स्पेशल रूममध्ये बसवण्यात आलं जिथं त्याला शौचालयाचा वापर करायचा असल्यास दार उघड ठेवायला लावलं शिवाय तिथं धूम्रपान बंदी होती.

ज्या दिवशी संजय दत्तला अटक करण्यात आली ती दिवशी पूर्ण दिवस त्याला क्राईम ब्रांचच्या ऑफिसात बसून ठेवण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता राकेश मारिया चौकशी करण्यासाठी आले. राकेश मारिया यांनी संजय दत्तला सगळी बॉम्ब ब्लास्टची गोष्ट सांगायला लावली. पण संजय दत्त दरवेळी म्हणायचा की मला यातलं काहीच माहिती नाही. यात संजय दत्त लहान मुलासारखा रडत सुद्धा होता.

दरवेळी प्रश्नाला मला माहिती नाही असं उत्तर मिळू लागल्याने मारिया चिडले आणि त्यांनी संजय दत्तच्या कानाफडात एक पेटवली.

अजूनच कडक शब्दात मारिया यांनी विचारणा केली तेव्हा संजय दत्तने एकट्यालाच सांगीन म्हणून विनंती केली. मग लहान पोरागत रडून संजय दत्तने सगळं सांगितलं की, त्याच्याकडे हत्यारं होती पण त्यानं ती नष्ट केली.

हत्यारं नष्ट करण्याच्या आरोपाखाली संजय दत्त आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. तिथून पुढे त्याला जेलही झाली.

याच दरम्यान संजय दत्तने मारिया यांना विनंती केली होती की, यातलं वडिलांना काही सांगू नका पण मारिया यांनी सांगितलं की यात मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. हे सगळं त्यांनी खासदार सुनील दत्त यांना सांगितलं. ओक्सबोक्शी रडत वडिलांच्या पायावर पडून संजय दत्त मला माफ करा म्हणून मुसमुसत होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.