ह्रितिक रोशनच्या पप्पांना टक्कल का आहे?

आता तुम्ही म्हणाल कि भिडू ला लागलंय येड. काय पण शोधत बसलंय. तर तस काही नाही. हीरोचे केस ही पण एक महत्वाची केस स्टडी आहे. हिरोईनची झुल्पे जेवढी महत्वाची असतात तेव्हढाच महत्वाचा हिरोची हेअर स्टाईल असते. केसांनी दगा दिला तर पोरांची लग्न अडकतात मग जर तुम्ही अॅक्टिंग सारख्या क्षेत्रात असाल तर केस म्हणजे सोन्यासारखे सांभाळावे लागतात.

तरी कधी कधी दगा देतातच. एक एक केस साथ सोडून जातो तेव्हा गर्लफ्रेंड सोडून गेल्या पेक्षा जास्त दुःख होतं. मग सुरु होतो उपाय. कधी भाईसारखं हेअरट्रासंप्लांट केल जात तर काही महागुरू विगखाली टक्कल लपवतात. काही थोडेच फिल्मइंडस्ट्रीतले लोक आहेत जे आपल टक्कल अभिमानाने चमकवतात.

त्यात समावेश होतो ह्रितिक पिता राकेश रोशन यांचा.

आजची पिढी त्यांना क्रिश, कोई मिल गया, कहो ना प्यार है बनवणारे राकेश रोशन म्हणून ओळखते. पण तुम्हाला माहित नसेल पण ते हिरोसुद्धा होते. सत्तरच्या दशकात अँग्री यंग मन बच्चनची हवा होती त्याच काळात राकेश रोशन यांचं आगमन झालं होतं.

तेव्हा सगळे मेन पिक्चर बच्चन कडे जायचे. उरलेल्या पिक्चरसाठी वाटणी व्हायची. मारामारीचे पिक्चर धर्मेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांना आणि रोमांटिक पिक्चर राजेश खन्ना,ऋषी कपूर, शशी कपूर यांना. त्याहूनही काही उरल तर ते राकेश रोशन सारख्यांना.

त्याचे वडील मोठे संगीतकार होते पण जेव्हा राकेश सिनेमात आला तोपर्यंत त्यांचं निधन झालं होतं.
राकेश रोशननां जास्त करून लो बजेटच्या पिक्चरमध्येच संधी मिळाली. हिरोचा रोल मिळाला तरी कुठे स्त्रीप्रधान सिनेमामध्ये. त्यातूनही खुबसुरत, आंखो आंखो में, खेल खेल मै,खट्टा मिठा असे काही पिक्चर गाजले. बऱ्याचदा सेकंड लीड अक्टर म्हणूनच तो चमकला होता.

गोरा घारा रंग, हिरवे डोळे हे त्याच भांडवल होतं.(डोक्यावर पूर्वी पण केस खूप होते का माहित नाही. त्यांचे आधीचे केस बघून तो विग असावा याचीच शंका जास्त वाटते.) पण चेहऱ्यावर खूप काही एक्प्रेश्न आणायची ऐपत नाही, डान्स सुद्धा काही पोरासारखा जबराट करता येत होता अस ही नाही. एवढ्यावर खूप वर्ष कारकीर्द चालली नाही. हळूहळू येणाऱ्या सिनेमांची ऑफर आटत गेली. स्वतःच पिक्चर प्रोड्यूस करून पाहिला पण तेही फ्लॉप.

पण राकेश रोशन होता चापटर. त्यांनी दिग्दर्शनाकडे आपले पाउल वळवल. पहिलाच पिक्चर होता खुदगर्ज. 

जितेंद्र शत्रुघ्न सिन्हा हे में लीड मध्ये होता. नुकताच स्टार बनलेला गोविंदा सुद्धा होता. भानुप्रिया, अमृता सिंग, नीलम कोठारी यांनी हिरोईनची आघाडी सांभाळली होती. कादर खान, सईद जाफरी, सत्येन कप्पू, मक मोहन, किरण कुमार , सुषमा सेठ असे दिग्गज कलाकार होते. याशिवाय खास दोस्त ऋषी कपूरला एक गेस्ट अपियरंस करायला तयार केल होतं. सगळ्यात महत्वाच म्हणजे राकेश रोशनने स्वतः एखादा रोल करायचा मोह टाळला होता.

त्याचा भाऊ राजेश रोशन संगीत देत होता. पिक्चरची निर्मिती राकेशच्याच फिल्मक्राफ्ट संस्थेकडून केली जात होती. एवढा मोठा स्टार कास्ट, त्याचा खर्च सुद्धा मोठा होता. हा राकेश रोशनच्या आयुष्यातला सर्वात मोठा जुगार होता. आधीच अक्टिंग मध्ये काही होत नव्हत जर हा सिनेमा चालला नाही तर दिग्दर्शनाचेही रस्ते बंद होणार होते.
राकेश रोशनने खूप मेहनत घेऊन खुदगर्ज बनवला.

पिक्चर रिलीज झाला. हिट झाला. राकेश रोशनची गाडी निकल पडी.

ही बातमी कळल्या कळल्या राकेश रोशन पहिल्यांदा तिरुपतीला गेला आणि असतील नसतील तेवढे केस दान देऊन टाकले. तसा नवसच केला होता नां त्यानं. त्या नवसात त्याने एक सब क्लॉज पण टाकला होता की यापुढे आयुष्यभर चमनगोटा लुकच ठेवेन, कधी लाजणार नाही.

खुदगर्जपासूनच त्याला आपल्या सिनेमाचं पहिलं अक्षर ‘के’ नं सुरु करायचा नाद लागला.

आता त्याची ही श्रद्धा, अंधश्रद्धा काही का असेना पण गेली वीसवर्षे आजतागायत राकेश रोशनने इमाने इतबारे तो नवस पाळतोय. बाकीची अख्खी इंडस्ट्री टकलेपणा लपवायच्या नादात आहे पण राकेश रोशनने त्यालाच एक स्टाईल बनवली आहे.

त्याचे पिक्चर गाजत आहेत. त्याचा पोरगा सुपरस्टारच्या रेस मध्ये असतो. तो इंडस्ट्रीमधला मोठा सेलिब्रेटी झालाय. इतक असूनही टक्कल चमकवायला पण डेरिंग लागत आणि राकेश रोशन कडे ते आहे यात शंका नाही.

काही दिवसापूर्वी ह्रितिकने त्याचा आणि राकेश रोशनचा एक जिममधला फोटो शेअर केला होता.

नेहमीप्रमाणे चमकणार टक्कल, जवळपास ह्रितिक एवढेच दंड, ह्रितिक पेक्षाही देखणा चेहरा असलेल्या राकेश रोशनला कॅन्सर झालाय आणि तो त्याफोटो नंतर ऑपरेशनसाठी जाणार आहे हे त्या पोस्टमध्ये होतं. एवढी जिद्द आणि जिगर असणारा राकेश रोशन आजच्या पिढी पुढे संकट कसही असू दे लढा कसा द्यायचा याच उदाहरण सेट करतोय हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.