राकेश टिकैतांच्या वडिलांमुळेच आंदोलनासाठी देशाला जंतर-मंतर मिळालं…

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच दिल्लीत शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने आज संसदेच्या बाहेर निदर्शनं करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात आंदोलक दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर दाखल झाले आहेत.

दिल्लीच्या सीमेवर मागच्या जवळपास ८ महिन्यांपासून कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २०० शेतकऱ्यांचं एक पथक गुरुवारी दिल्लीत पोहोचलं आहे. 

शेतकरी स्वतंत्र संसद भरवतील, आमचा आवाज पोहोचवला नाही तर कोणत्याही पक्षाचे असले तरी सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात टीकेचा सामना करावा लागले असं म्हणतं राकेश टिकैत यांनी जंतर-मंतरवर निदर्शनची हाक दिली आहे.

तसं बघितले तर टिकैत घराण्याचं हे पहिलं शेतकरी आंदोलन नाही, आणि जंतर-मंतरवरचं तर नाहीच नाही. टिकैत आणि जंतर-मंतर यांचं फार जुन नातं आहे. अगदी मागच्या ३० वर्षांपासूनचं जुन. किंबहुना राकेश टिकैत यांचे वडिल महेंद्रसिंग टिकैत यांच्यामुळेच निदर्शन करण्यासाठी देशाला जंतर-मंतर मैदान मिळालं आहे.

यामागचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला मागच्या काळात डोकावणं गरजेचं आहे. 

१९८८ सालचा ऑक्टोबर महिना.

इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी जवळ आली होती. काँग्रेसतर्फे दिल्लीच्या बोट क्लबवर मोठा कार्यक्रम होणार होता. त्याची तयारी सुरू होती. मैदानाच्या भिंती रंगवणे वगैरे चालू होतं. पंतप्रधान आपल्या आईला अभिवादन करणार म्हणून एक मोठा स्टेज उभा करण्यात आला होता.

एक दिवस अचानक कुठून तरी शेतकरी आपल्या गाई म्हैशी घेऊन या मैदानात ठाण मांडून बसू लागले. बघता बघता त्यांची संख्या वाढत गेली. प्रशासनाचे डोके हलले. लाखोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीत घुसले होते.

त्यांना आणणारा नेता होता चौधरी महेंद्रसिंह टिकैत उर्फ बाबा टिकैत.

टिकैत यांच्या या आंदोलनाने संपूर्ण राजधानी पॅरलाईज झाल्यासारखी झाली होती. आधी हे शेतकरी राजघाटावर होते, त्यानंतर तिथून ते बोट क्लबकडे सरकले होते. तो काळ म्हणजे राजीव गांधी यांच्या प्रसिद्धेचा काळ होता. मात्र या शेतकरी आंदोलनामुळे ते देखील हतबल झाले आणि त्यांनी या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या.

पुढे १९९३ मध्ये देखील काहीशी अशीच अवस्था होती.

भारतीय किसान संघाचं आंदोलन सुरु झालं, दिल्लीच्या काही मोजक्या मोठ्या आंदोलनापैकी हे एक आंदोलन होतं. आंदोलनाचे नेते महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात लाखो शेतकरी पुन्हा एकदा बोट क्लब मैदानावर जमा झाले. अनेक दिवस शेतकरी तिथं तळ ठोकून बसले.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे राजधानी पुन्हा एकदा थांबली. सगळीकडे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना निदर्शनासाठी बोट क्लब ऐवजी जंतर-मंतर मैदानावर बसण्याची विनंती केली. त्यानंतर हे शेतकरी जंतर-मंतरच्या बाहेरील फुटपाथवर जाऊन बसले, मात्र त्यावेळी सरकारनं या मैदानाला प्रदर्शनाचे अधिकृत मैदान म्हणून मान्यता दिली.

हे मैदान एक प्रकारे आंदोलक आणि सरकार या दोघांसाठी फायद्याचं होतं. कारण एकतर हे मैदान संसदेपासून जवळ होतं त्यामुळे आंदोलकांना आपल्या मागण्या अधिक तीव्रतेने सरकार पर्यंत पोहोचवता येणार होत्या. तर त्याचवेळी इथं जास्त आंदोलक एकत्र जमू शकत नसल्यामुळे ते सरकाराच्या देखील फायद्याचं होतं.  

इतर ही काही गाजलेली आंदोलन 

अण्णा हजारे यांचं आंदोलन देखील इथचं झालं होतं. 

५ एप्रिल २०११ ला जेव्हा सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार संपवण्यासाठी लोकपाल विधेयकाची मागणी केली तेव्हा त्यांनी जंतर-मंतरवरूनच आंदोलनाची हाक दिली होती. इथूनच हे आंदोलन पुढे देशात पसरत गेलं. प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारखे कार्यकर्ते देखील जोडले गेले, आणि पुढे याच आंदोलनातुन आम आदमी पार्टीचा जन्म झाला.

२०१३ मध्ये समाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात ‘नर्मदा बचाओ’ आंदोलनाच्या समर्थानात इथं निदर्शन करण्यात आली होती. 

२०१७ मध्ये तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी जंतर मंतरवर प्रदर्शन केलं होतं, शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला ४० हजार कोटी रुपयांची दुष्काळ निधी पॅकेज देण्याची मागणी केली होती. काही काही संघटना तर अशा आहेत कि त्या मागच्या ३ वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी इथं तळ ठोकून बसले आहेत.

आता त्यांच्यासाठी हेच घर आणि हीच कर्मभूमी झाली आहे. दिल्लीत सुरुवातीच्या काळात अकबर रोडवर होतं होते, पुढे ते बोट क्लबवर होतं होते. पुढे ते जंतर-मंतरवर शिफ्ट करण्यात आले होते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.