बापानं ३७ वर्षांपूर्वी भाजप-सेना युती तोडलेली, पोरगं आज शिंदे गटाकडून कोर्टात लढतंय

शिवसेना नेमकी कुणाची ? या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणाऱ्या प्रश्नावर सध्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय.

एकनाथ शिंदे गटाकडून युक्तिवाद करणाऱ्यांमध्ये एक लक्षवेधी नाव आहे, ते म्हणजे महेश जेठमलानी.

घटनापीठासमोर शिंदे गटाची बाजू मांडताना त्यांनी, ‘ते अशा अपात्रतेच्या आधारावर केस उभी करत आहेत, जी कधी झालीच नाही,’ असा युक्तिवाद करत आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार असणाऱ्या महेश जेठमलानी यांनी हर्षद मेहता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अभिनेता संजय दत्त अशा वेगवेगळ्या हाय प्रोफाइल केसेस लढवल्या होत्या.

विशेष म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग या केसमध्ये महेश जेठमलानीच परमबीर सिंग यांची बाजू मांडत आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरेंशी काही त्यांचा पहिल्यांदा सामना होत नाहीये.

पण ठाकरे विरुद्ध जेठमलानी हा अप्रत्यक्ष सामना याआधीही १९८५ मध्ये झाला होता, जेव्हा महेश जेठमलानी यांचे वडील आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांच्यामुळे शिवसेना-भाजप युती तुटली होती.

झालेलं असं की, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या निवडणूकांमध्ये राजीव गांधींना न भुतो न भविष्यती असं पाठबळ मिळालं. कॉंग्रेसला तब्बल ४१४ जागांवर विजय मिळाला.

आजवरचा हा रेकॉर्ड होता..

या निवडणूकीत नुकताच जन्म घेतलेल्या भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. १९८४ च्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण या युतीचा फरक महाराष्ट्रात पडला नाही. भाजप सेनेचा एकही उमदेवार विजयी होवू शकला नाही.

नेमकं हे का घडलं? फक्त सहानभुतीच होती की अन्य काही कारणं होती. याचाच विचार करण्यासाठी लोकसभेच्या निवडणूकीनंतर विश्लेषण करण्यासाठी भाजपने आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, पराभूत उमेदवारांची बैठक बोलवली

या बैठकीत होते जेष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी

राम जेठमलानी तेव्हा भाजपकडून निवडणूकीसाठी उभा होते. पराभवाचं विश्लेषण करत असताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या बदनाम पक्षासोबत जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याने पराभव झाला.’ त्यानंतर पराभवांच्या केंद्रस्थानी शिवसेना आली व शिवसेनेमुळेच भाजपला पराभव पहावा लागला, हा बदनाम झालेला पक्ष आहे अशा चर्चा अजेंड्यावर राहिल्या..

दूसरीकडे भाजप जनता दलासोबत जाण्यास उत्सुक होती. तर तिसरीकडे शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पुरोगामी लोकशाही दलामार्फत कॉंग्रेसविरोधात १९८५ च्या विधानसभा निवडणूकांसाठी आघाडी करत होते. शरद पवारांच्या आघाडीत जनता पक्ष तर होताच सोबत अन्य डावे पक्ष देखील होते. भाजप सेनेसोबतची युती सोडून जनता पक्षात जाण्यास उत्सुक होती पण जनता पक्ष व इथे असणारे अन्य डावे पक्ष यांचा शिवसेनेला विरोध होता कारण शिवसेनेचं कम्युनिष्ट विरोधी प्रचारतंत्र.

मात्र महाजन आणि पवारांना बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जायचं होतं.

उमेदवार उभा न करता पाठींबा व त्याबदल्यात विधानपरिषदेवर संधी असा फॉर्म्युला महाजन पवारांचा होता. याला जनता दलासहीत डाव्यांचा शिवसेनेला असणाऱ्या विरोधाच कारण होतच सोबतच शिवसेना बदनाम असल्याचं राम जेठमलानी यांनी मांडलेला मुद्दा देखील कारणीभूत होता.

पण बाळासाहेबांनी त्या पूर्वीच शिवसेनेचे १८ उमेदवार घोषीत करून टाकले. युती तुटली. भाजप जनता दलासोबत गेला आणि याच वेळच्या प्रचारात बाळासाहेब म्हणाले, कमळाबाई आम्हाला सोडून गेली.. 

महाजन यांनी भाजपला पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलाचा भाग बनवलं आणि या निवडणूका लढल्या. भाजपला या निवडणूकीत १६ जागा जिंकता आल्या मात्र कॉंग्रेसने १६१ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता राखली.

थोडक्यात काय, तर ३७ वर्षांपूर्वी वडील राम जेठमलानी यांच्यामुळं भाजपसोबतची युती तुटल्यानं शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागलं होतं, तर आता त्यांचा मुलगा महेश जेठमलानी या निर्णायक लढाईत उद्धव ठाकरेंसमोर उभा आहे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.