लोहिया खुलेआम लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले पण चारित्र्यावर डाग लागला नाही .

स्वातंत्र्यानंतर भारतात काँग्रेसला निवडणुकीत हरवता येऊ शकेल यावरच कोणाचा विश्वास नव्हता. नेहरू, वल्लभभाई पटेल असे मोठे नेते काँग्रेसचं नेतृत्व करत होते. अशा वेळी काँग्रेसशी थेट पंगा घेणारा, नेहरूंना नडणारा नेता होऊन गेला.

राम मनोहर लोहिया त्यांचं नाव.

त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. वडील हिरालाल हे व्यापारी होते. ते देखील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. राममनोहर लोहिया यांच्या वर लहानपणापासून राष्ट्रवादी संस्कार झाले. मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी बनारस हिंदू विश्वविद्यालयात दाखल झाले. इथे असताना त्यांचा गांधीजींच्या राष्ट्रीय चळवळीशी जवळचा संबंध येऊन आला.

विद्यार्थिदशेतच १९२६ च्या गौहाती काँग्रेस अधिवेशनास ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंशी सहवास घडला.

पुढे आपले अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते जर्मनीला गेले. तिथे त्यांनी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावर अभ्यास करून पीएचडी मिळवली.

जर्मनीहून परतल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात उतरले. समाजवादी विचारसरणीमुळे काँग्रेसमध्ये राहूनच समाजवादी पक्ष स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीस वेळा तुरुंगावास घडला. तुरुंगात त्यांचा छळही करण्यात आला. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, म्यानमार (ब्रह्यदेश), गोवा येथेही त्यांना विविध कारणांसाठी कारावासात डांबण्यात आले.

१९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी अच्युतराव पटवर्धन व जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरीने चळवळीचे नेतृत्व केले.

१९४७ साली फाळणीनंतर सुरू झालेल्या हिंदु-मुस्लिम दंगलीत त्यांनी म. गांधीबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते आघाडीवर होते. काँग्रेस अध्यक्षांसह कोणीही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ नये, अशी त्यांची धारण होती. अखेर काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाला घेऊन ते बाहेर पडले आणि स्वतंत्र समाजवादी पक्षाचे नेतृत्व केले.

स्वातंत्र्यानंतर आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आभाळाएवढे मोठे नेते बनले होते. त्यांना लोहिया यांनी विरोध तर केलाच शिवाय त्यांच्या दैनंदिन खर्चावर बोट ठेवून निरुत्तर केले.

नेहरूंचे सर्वात मोठे विरोधक म्हणून राममनोहर लोहिया यांना ओळखले जाते. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडीया म्हणायचं धाडस देखील फक्त त्यांच्यातच होतं.

भारतात सर्वात शक्तिशाली लोकनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत होता. काँग्रेसमध्ये राहिले तर
पंतप्रधानपदासकट कोणतंही मंत्रिपद त्यांच्यापायाशी लोळण घालू शकलं असत. पण तरीही सत्तेच्या परिघाबाहेर राहून विचारसरणी जपण्याच काम त्यांनी केलं.

भारतात समाजवादी चळवळ रुजली ती राममनोहर लोहिया यांच्या मुळे. त्यांनी घडवलेल्या विचारसरणीला लोहियावादी समाजवाद अस ओळखलं जातं.

सत्तेचे आणि उद्योगाचे विकेंद्रीकरण हा या विचारसरणीचा पाया होता. यंत्र हे शोषणाचे साधन न बनता दारिद्र्यनिवारणाचे साधन बनावे हा त्यांचा आग्रह होता. गांधीजींच्या प्रभावामुळे उद्योगांच्या बाबतीत लघुउद्योग, त्यांना उपयुक्त अशी यंत्रसामग्री आणि स्वावलंबन यांवर त्यांनी भर दिला.

लोहिया हे स्त्रियांच्या समस्यांची जाणीव असलेले एक विचारवंत होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा तसेच आंतरजातीय विवाह, कुटुंब नियोजन आणि हुंडाबंदी इ. प्रागतिक विचारांचा हिरिरीने पुरस्कार केला. जातिसंस्था हा समाजवादाच्या मार्गातील मुख्य अडसर आहे, हे लक्षात घेऊन या सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रखर संघर्ष उभा केला आणि अनुसूचित जातिजमातींची आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला.

जातीवर आधारित राजकारणाला मूलगामी परिवर्तनाचे परिमाण लोहियांनी दिले.

आज आपण पाहतो ते मुलायम सिंग, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार वगैरे उत्तर भारतातील सर्वशक्तीशाली नेते हे राम मनोहर लोहिया यांच्या विचारसरणीतुनच उदयाला आले. साठच्या दशकात काँग्रेस हटाव म्हणून लोहिया यांनी चळवळ सुरू केली त्याला जयप्रकाश नारायण यांनी देशभरात पोहचवलं आणि त्यातून असे लाखो कार्यकर्ते घडले.

उत्तरेत एक म्हण फेमस आहे,

जब जब लोहिया बोलता है, दिल्ली का तख्त डोलता है

असा हा एवढा मोठा नेता. मात्र वैयक्तिक आयुष्यात देखील असाच बिनधास्त आणि बंडखोर होता. त्यांनी आयुष्यभर लग्न केलं नाही मात्र त्याकाळी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचं धाडस त्यांनी दाखवलं.

बंगालच्या रमा मित्रा या दिल्लीत मिरांडा हाऊस महाविद्यालयात प्रोफेसर होत्या. त्यांनी देखील स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत भाग घेतला होता. पुढे समाजवादी पक्षाच्या कामाच्या निमित्ताने  राममनोहर लोहियाजी व त्या हे दोघे प्रेमात पडले. पण काही कारणांनी त्यांना लग्न करता आले नाही.

रमा मित्रा यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवली होती.

जेव्हा लोहियाजी लोकसभा मतदारसंघात विजयी झाले. तेव्हा दिल्लीच्या खासदार निवासात तेव्हा ते व रमा मित्रा अनेक दिवस एकत्र राहत होते. फक्त रमा यांच्या बरोबरच नाही तर इतर अनेक महिलांशी आलेलं नातं लोहिया यांनी लपवले नाही. तरीही कधी त्यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग लागला नाही. तेवढा उमदेपणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जरूर दाखवला. त्यांची व रमा मित्रा यांची पत्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहेत.

फक्त भारतातच नाही तर जगभरात समाजवादी चळवळीमुळे त्यांचं नाव पोचलं होत.

अल्बर्ट आईन्स्टाईनशी त्यांची मैत्री होती. असा हा थोर नेता दिल्लीतील सरकारी इस्पितळातील हलगर्जीपणा मुळे आपले जीव गमावून बसला. इंदिरा गांधींच्या विरुद्ध छेडलेलं जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन असो किंवा मनमोहन सिंग यांच्या काळात सुरु झालेलं अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन प्रत्येकाचे प्रेरणा स्रोत राममनोहर लोहिया हेच होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.