फक्त पेटलेला पंजाबच नाही तर आसाम, मिझोराम शांत करण्याचं श्रेय राम प्रधान यांनां जातं.
प्रशासकीय अधिकारी मनात आणल तर किती चमत्कार करू शकतात याचं उदाहरण म्हणजे भारताचे माजी गृह सचिव राम प्रधान.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचे विश्वासातले सनदी अधिकारी. जेव्हा चीनच्या युद्धानंतर हिमालयाने सह्याद्रीला साद घातली तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीला रवाना झाले. देशाचं जोखमीच संरक्षणमंत्रीपद स्विकारल.
दिल्लीतला कारभार सुरळीत व्हावा म्हणून त्यांनी महाराष्ट्रातले काही अधिकारी केंद्रात नेले होते तेव्हा त्यात राम प्रधान यांच नाव प्रमुख होत.
१९५२ साली राम प्रधान आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई इलाख्यात त्यांची नियुक्ती झाली. प्रशासनाच्या शेवटच्या पायरीपासून ते संयुक्त राष्ट्रात देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला होता.
याच अनुभवामुळे ऐंशीच्या दशकात राजीव गांधी पंतप्रधान बनल्यावर त्यांची गृह सचिव या सर्वोच्च पदासाठी निवड झाली.
तो काळ भलता धामधूमीचा होता. नुकतीच इंदिरा गांधी यांची खलिस्तानवाद्यांनी हत्या केली होती. पंजाब पेटून उठला होता. इंदिरा गांधींच्या समर्थकांनी केलेल्या दंगलीमुळे आगीत तेल ओतल्याप्रमाणे झाले होते. आत्मघाती शीख अतिरेकी विमान अपहरणापासून मुख्यमंत्र्यापर्यंत हल्ले करत सुटले होते. त्यांना आवरणे कठीण झाले होते.
फक्त पंजाबच नाही तर ईशान्येकडील आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम प्रत्येक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जात होती. खंबीर समजल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर अननुभवी राजीव गांधी पंतप्रधान बनले होते आणि याचा फायदा देशविघातक शक्ती घेण्याचा प्रयत्न करत होत्या.
राजीव गांधी यांना अनुभव नव्हता मात्र आपल्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्याचे उपजत शहाणपण त्यांच्या जवळ होते.
देशांतर्गत परिस्थिती नियंत्रणात आणायची या विषयावर त्यांची व राम प्रधान यांची बैठक झाली. सर्वात ज्वलंत प्रश्न पंजाबचा होता. तिथे अकालीदल शीख समुदायाचे नेतृत्व करत होता. त्यांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. पण परिस्थिती आणखी चिघळली जात होती.
राम प्रधान यांनी राजीव गांधी यांना सांगितलं,
“अकाली दलाशी बोलू शकेल असा एकच माणूस माझ्या समोर आहे तो म्हणजे शरद पवार. ”
शरद पवार तेव्हा विरोधी पक्षात होते. ते कॉंग्रेस पक्षात नसूनही राजीव गांधी त्यांना या प्रश्नाची जबाबदारी देण्यास तयार झाले. पवारांना यातल काहीच माहिती नव्हत. ते दिल्लीला आले असता एक दिवस राम प्रधान त्यांना भेटायला महाराष्ट्र भवन येथे आले.
त्यांनी पवारांना थेट प्रश्न केला,
“पंजाब मधलं वातावरण सुरळीत करण्यासाठी अकाली नेत्यांशी संवाद सुरळीत करायला लक्ष घालाल का?“
शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने पवार अख्खं पंजाब फिरले होते. त्यांची अकाली नेत्यांसोबत चांगली मैत्री होती. त्यांच्याशी सुसंवाद करण्याची पवारांनी तयारी दाखवली. शीख समाज कॉंग्रेस विरोधात अस्वस्थ होता पण राजीव गांधी यांची हा प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक इच्छा होती. शरद पवारांना आवश्यक ते सर्व स्वातंत्र्य दिले गेले, राम प्रधान त्यांच्या मदतीला होते. पुढे गुप्त बैठका घेण्यात आल्या.
सरकार स्वतः हून एक पाउल पुढे येत आहे हे बघितल्यावर अकाली नेत्यांनी देखील चर्चेची तयारी दर्शवली.
अखेर २४ जुलै १९८५ रोजी अकाली नेते लोंगोवाल व राजीव गांधी यांच्यात करार झाला व पंजाब प्रश्न सुटण्याच्या दिशेने पाहिले पाऊल पडले. यात सिंहाचा वाटा गृहसचिव राम प्रधान यांचा होता.
असाच प्रकार आसामच्या बाबतीतही झाला होता.
बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावरून आसामी तरुणांनी शस्त्र हाती घेतले होते. प्रचंड मोठ्या दंगलीच सत्र सुरु होतं. इंदिरा गांधी यांच्या काळातच आसामचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला पण तिथल्या नेत्यांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता. १९८३ पासून आसामशी शांततेची बोलणी बंद होती.
राम प्रधान यांनी राजीव गांधी यांना आसामचा प्रश्न सोडवणे किती महत्वाचा आहे हे समजावलं. ऑल आसाम स्टुडंट फेडरेशनचे विद्यार्थी नेते प्रफुल्लकुमार महंत, भृगुकुमार फुकन यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं. राम प्रधान यांनी त्यांच्याशी अनेक बैठका घेतल्या.
तेव्हाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासोबत ९ ऑगस्ट १९८५ रोजी आसामचा दौरा केला. तिथल्या सर्व स्तरातील लोकांशी चर्चा केली. अनेक ठिकाणी पाहणी केली. १२ ऑगस्टला राम प्रधान यांनी आसामच्या नेत्यांबरोबर फायनल बैठक घेतली. या सर्व चर्चेपासून आसामचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना देखील दूर ठेवण्यात आलं होत.
अखेर १५ ऑगस्ट १९८५ च्या पहाटे २.३० वाजे पर्यंत बैठक लांबली. राम प्रधान यांच्या दबावनितीचा परिणाम झाला अखेर आसामचा प्रश्न सुटला.
त्या दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राजीव गांधी यांनी ही खुश खबर जनतेला दिली.
राम प्रधान यांच्या चाणक्यनितीमुळे अनेक राज्यात शांतता स्थापन झाली. मात्र त्यानाही सर्वाधिक त्रास मिझोरमच्या तिढ्यामुळे झाला
अनेक बैठका वाटाघाटी होऊनही मिझोरमचे बंडखोरांचे नेते लालडेंगा हे काही ना काही कारण काढून विषय लांबवत होते. करार अगदी दृष्टीक्षेपात आला असूनही त्यांचे तळ्यातमळ्यात सुरू होते. राम प्रधान यांच्या निवृत्तीचा दिवस उजाडला.
३० जून १९८६ रोजी ते निवृत्त होणार होते. साडेचार वाजता उत्तराधिकाऱ्याकडे पदभार सोपविणे आणि नंतर निरोप समारंभ, असा कार्यक्रम ठरला होता.
दुपारी २.३० च्या सुमारास लालडेंगा हे नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात आले. गप्पांमध्ये कराराबाबत चर्चा झाली. तुमच्या कार्यकाळातच शांतता करार व्हावा, अशी इच्छा लालडेंगा यांनी राम प्रधान यांच्याकडे प्रदर्शित केली. सहकाऱ्यांशी चर्चा करून साडेचापर्यंत परत येतो, असे सांगून लालडेंगा कार्यालयातून बाहेर गेले.
ही बाब राम प्रधान यांनी पंतप्रधान राजीव गांधी व गृहमंत्र्यांच्या कानावर घातली.
जर करार दृष्टिक्षेपात येत असल्यास पदभार सोडू नका, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यानच्या काळात निरोप समारंभ दुसऱ्या दिवशीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला. साडेचार वाजता लालडेंगा त्यांच्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. काही मुद्दय़ांवर अडले होते, त्यावर तोडगा काढण्यात आला.
लालडेंगा यांच्यासह राम प्रधान ७, रेसकोर्स रोड या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले. तेथे बठक झाली. थोडय़ाच वेळात सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बठक होऊन त्यात शांतता कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. एव्हाना रात्रीचे साडेआठ वाजल्याने आपली सेवा केव्हाच संपुष्टात आली, हे प्रधान यांच्या लक्षात आले होते.
राम प्रधान निवृत्त होण्यापूर्वी करार व्हावा, अशी इच्छा राजीव गांधी यांनी देखील व्यक्त केली होती.
विधी सचिवांना नियम विचारला. पदभार सोपविला नसल्यास मध्यरात्रीपर्यंत पदावर राहता येते, असे स्पष्ट केले. रात्री नऊच्या सुमारास भारत सरकार आणि मिझो बंडखोरांमध्ये झालेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि नंतरच राम प्रधान निवृत्त झाले.
ही आठवण त्यांनी आपल्या माझी वाटचाल या पुस्तकात सांगितली आहे.
राजीव गांधी यांना भारतात संगणकयुग आणल्याचे क्रेडीट दिले जाते, टेलिफोन क्रांतीचा जनक, आधुनिक भारताकडे नेणारा तरुण नेता म्हणून त्यांचं कौतुक होत, त्यांनी पंचायत राज संपूर्ण देशात लागू केला याचही श्रेय देण्यात येत मात्र देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अनेकदा दुर्लक्षित राहतात.
भारतात देशांतर्गत शांतता व सुव्यवस्था स्थापना साठी जे करार केले गेले या सगळ्याचे शिल्पकार असलेले राम प्रधान यांना पद्मभुषण हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आले होते.
सर्वसामान्यांच्या समस्या विचारात घेऊन काम करणाऱ्या व काम करताना सामाजिक भान जपणाऱ्या या कार्यक्षम अधिकाऱ्याचे नुकतेच निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
हे ही वाच भिडू.
- निवडणूक आयुक्त असताना थेट उपमुख्यमंत्र्यांना आचारसंहिताभंग केल्याची नोटीस पाठवली होती.
- ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.
- ६ तासात तब्बल ३००० बांगलादेशी घुसखोरांच्या कत्तली घडवून आणण्यात आल्या होत्या.
- मटक्यावर मात करायची म्हणून तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी राज्य लॉटरीची योजना आणली.