राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाण्यांना चाल लावणाऱ्या कॅप्टनचे सुभाषबाबूसुद्धा फॅन होते…

जन गण मन अधिनायक जय हे….आपल्या भारताचं राष्ट्रगीत किती वेळा आपण म्हणत आलो, दरवेळी गाताना शरीरात एक ऊर्जा संचारते. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं आणि सोबतच त्याची धुनसुद्धा बनवली होती. पण आज घडीला आपण जी चाल ऐकतो ती एका मिलिटरीच्या अधिकाऱ्याने बनवली होती. फक्त राष्ट्रगीतच नाही तर देशभक्तीपर गाणीसुद्धा त्यांनी कंपोज केली. त्यांच्या गाण्याचे गांधीजीसुद्धा फॅन होते.
मिलिटरी प्लस म्युझिक करणारे ते स्वातंत्र्य सेनानी होते कॅप्टन राम सिंह ठाकूर. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाळा जिल्ह्यातल्या खनियारामध्ये राहायला ते होते. लहानपणापासूनच संगीताची गोडी होती आणि त्याबरोबरच आर्मीचं वेडसुद्धा त्यांना होतं. वयाच्या १४ व्या वर्षी राम सिंह ठाकूर हे भारतीय सेनेच्या गोरख रायफल्समध्ये सामील झाले.
ब्रिटिश राजवट असल्याने राम सिंह ठाकूर यांनी द्वितीय विश्वयुद्धात सिंगापूरमध्ये जपानविरुद्ध युद्ध केलं. पण त्यांच्या तुकडीला हरवून जपानी सेनेने त्यांना कैद केलं. १९४२ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच कैद केलेल्या लोकांना सोडवून इंडियन नॅशनल आर्मी [ आझाद हिंद सेना ] ची स्थापना केली. यामध्ये होते राम सिंह ठाकूर.
याच काळात राम सिंह ठाकूर यांना गाण्यांचं वेड होतं तेव्हा त्यांनी एक धून बनवली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ऐकवली.
ती धून होती कदम कदम बढाए जा ……..
सुभाषचंद्र बोसांना हि धून चांगलीच आवडली आणि त्यांनी आपली व्हायोलिन राम सिंह ठाकूर यांना देत सैनिकांचा आत्मविश्वास वाढेल अशी एखादी धून बनवायला लावली. पूर्णपणे संगीतबद्ध गाणं करूर्न कदम कदम बढाए जा गाणं बनवलं यावर लोकं सहजतेने नाचू शकत होते. सैनिकांनासुद्धा हे गाणं फार आवडलं. नंतर हे गाणं हळूहळू भारतभर पसरलं आणि लोकांचं तोंडपाठ झालं.
लाल किल्ल्यावर शुभ-सुख चैन की बरखा बरसे…या गाण्याची धून बनवली.
नंतर राम सिंह ठाकूर यांनी आयएनएच्या कौमी तरानेमध्ये शुभ-सुख चैन की बरखा बरसे…गाणं कंपोज केलं. हे तेच गाणं होतं जे पुढे राष्ट्रीय गाणं म्हणून पुढे आलं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी कॅप्टन राम सिंह ठाकूर यांचे नेतृत्व असलेला ऑर्केस्ट्राने लाल किल्ल्यावर शुभ-सुख चैन की बरखा बरसे…गाणं वाजवलं. हे गाणं अगोदर महात्मा गांधीजींना ऐकवण्यात आलं होतं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशावरून कॅप्टन राम सिंह ठाकूर उत्तर प्रदेशामध्ये सब इन्स्पेक्टरच्या रूपाने लखनौला आले आणि पीएसीचे बँड मास्टर बनले. आपल्या कारकिर्दीत अनेक मेडल कॅप्टन राम सिंह ठाकूर यांना मिळालेले होते. यात जॉर्ज VI, नेताजी गोल्ड मेडल [ आझाद हिंद सेना ], उत्तर प्रदेश प्रथम राज्यपाल स्वर्ण पदक, राष्ट्रपती पोलीस पदक, युपी संगीत नाटक अकादमी असे अनेक पुरस्कार आणि मेडल त्यांना मिळाले होते.
कॅप्टन राम सिंह ठाकूर हे नाव आज आठवतही नाही. पण देशाला त्यांनी अजरामर गाणी लिहिली, जन गण मन सारख्या राष्ट्र्गीतला अजरामर अशी चाल लावली. कॅप्टन राम सिंह ठाकूर यांच्या गाण्याचे देशवासी आणि महात्मा गांधीजीसुद्धा फॅन होते.
हे हि वाच भिडू :
- आझादांनी ज्या भूतांना कॉलेजमधून पळवून लावले त्यांनाच पुढे क्रांतीकार्यात सामील करून घेतले.
- देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजच काय तर भूतप्रेतांशी लढायला चंद्रशेखर आझाद तयार होते.
- आझाद हिंद सेनेच्या पहिल्या महिला हेराने देशप्रेमाखातर स्वतःच्याच पतीची हत्या केली होती….
- आझाद यांच्या आईला शेणकूट विकायची वेळ आलेली, मराठी क्रांतिकारकाने त्यांचा सांभाळ केला