तुमच्या घरात बाप-भाऊ नाहीये का म्हणणाऱ्या रमाबाईंचा समाजाला आज विसर पडलाय ?

आजकाल सोशल मीडियावर काही लोकांचा ट्रेंड असतो. उठसुठ हि लोकं इतरांना स्त्रीवाद शिकवतात. विचित्र म्हणजे काही स्त्रीवादी महिलांना, पुरुषांना ‘फेमिनिष्ट’ म्हणून हिणवलं जातं… का ? तर काही व्यक्ती सोयीनुसार काही विचारधारेचा वापर करतात. याचं दुःखं म्हणजे कि, यांना खरा स्त्रीवाद आणि खरी समता-समानता कळलीच नसावी..असो 

पण भारतात स्त्रीवादाचंगी लाट कधी का येईना पण त्याही आधी खऱ्या समानतेचं आयुष्य जगल्या तसेच समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा विचार रुजवला अशा थोर स्त्रियांची यादी बरीच मोठी आहे. माँ जिजाऊ पासून ते झाशीची राणी लक्ष्मीबाई…तसंच सावित्रीबाई, भगिनी निवेदिता, डॉ.रखमाबाई राऊत, डॉ.आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, पंडित रमाबाई अशी बरीच मोठी यादी आहे….यांच्यात समतेच्या पुरस्कर्त्या…स्त्रीवादी रमाबाई रानडेंबद्दल बोलणं आज महत्वाचं आहे.

१८ व्या शतकात या बाईने समजाला खडसावून विचारलं होतं, तुमच्या घरात बाप-भाऊ नाहीये का?  

रमाबाई रानडे यांनी १९ व्या शतकात दाखवलेला समाजसुधारणेचा मार्ग स्तुत्य आहे आणि तो मागे वळून समजून घेण्याची गरज देखील तितकीच महत्वाची आहे…कारण काळाची गरज आहे !!!

१९ व्या आणि २० व्या शतकात सामाजिक-आर्थिक कारणांमुळे फार कमी महिला त्यांच्या हक्कांसाठी लढू शकल्या होत्या. पण त्या काळातही भारतात समाजातून पंडिता रमाबाई आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या काही स्त्रिया उदयास आल्या ज्यांनी रूढीवादी परंपरा मोडून काढल्या आणि स्त्रीवादी चळवळ, महिला हक्क आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले. पण इतिहास ज्याप्रकारे पंडिता रमाबाई आणि सावित्रीबाई फुले यांची आठवण करतो….

त्याचप्रमाणे भारतातील महत्वाच्या महिला सुधारक  महिला रमाबाई रानडे का आठवत नाहीत ?

महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या रमाबाई रानडे या पहिल्या सामाजिक कार्यकर्त्या तर होत्याच पण मुंबई आणि पुण्याच्या बाहेर पडून महाराष्ट्रात जाऊन त्यांनी अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला होता. १९०४ मध्ये झालेल्या पहिल्या महिला परिषदेचे त्यांनी नेतृत्व केले, फिजी आणि केनियामधील भारतीय कामगारांच्या हक्कांबद्दल प्रश्न उपस्थित केले, महिलांच्या मताधिकाराची मागणी केली आणि विशेष म्हणजे सेवा सदन सुरू केले, ज्याने महिलांच्या सामाजिक स्थितीमध्ये बरीच सुधारणा झाली.

रमाबाई रानडे यांनी आपल्या कामातून साऱ्या जगाला मार्ग दाखवला आणि त्या काळातल्या परिस्थितीतही त्यांनी केलेली कामे आजच्या पिढीला थक्क करतात….आजची विचारवंत जी विचार मांडतात तेच विचार त्यांनी त्या काळात मांडून झालेत देखील…. पण ती समाजाला ना तेंव्हा पचले ना आज पचत आहेत. 

रमाबाईंचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ हे चरित्र नक्कीच वाचा कारण ते वाचलं कि याची जाणीव नक्कीच होते कि त्यांनी केलेलं कार्य आणखी कमी येतेच कारण समाज नावाची गोष्ट बदल स्वीकारायला कोतेपणा दाखवते. खरं तर चरित्र लिहिणार्‍या रमाबाई रानडे या बहुधा पहिल्याच मराठी महिला असाव्यात. त्यांनी समाजातील शोषित, वंचित महिलांच्या हक्कांसाठी कशाप्रकारे वकिली केली हे चरित्रात त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.

रमाबाई रानडे यांनी समाजाच्या अनेक जुन्या परंपरा मोडीत काढल्या होत्या. साहजिकच आहे त्याकाळी ते मोठं कठीण काम असणार. रमाबाईंना त्या काळातील इतर स्त्रियांनाही समाजाच्या अरिष्टांचा सामना करावा लागला होता. त्या काळात बालविवाह नावाचं एक संकट तर होतंच पण सोबतच महिलांना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते. रमाबाईंचा देखील बालविवाह झाला होता. त्यांच्या वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांच्यापेक्षा २१ वर्षांनी मोठ्या असलेल्या समाजसुधारणेचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला होता. 

पण बालविवाहानंतरही रमाबाईंनी अभ्यास सोडला नाही आणि हि कृती करून त्यांनी बरोबरीच्या इतर महिलांना बळ दिले. नेमकंच त्या दरम्यान बंगाल आणि महाराष्ट्रात समाजसुधारणेच्या चळवळीही तीव्र झाल्या होत्या. बंगालमध्ये या सुधारणांचे नेतृत्व राजा राममोहन रॉय करत होते तर महाराष्ट्रात न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी केले.

न्यायमूर्ती रानडे यांनी घरच्यांच्या नाराजीचा सामना करूनही रमाबाईंना शाळेत पाठवले आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रयत्नाने रमाबाईंनी मराठी, इंग्रजी आणि बंगाली भाषा शिकून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन शोषित महिलांना संघटित करण्यास सुरुवात केली.

असं म्हणतात कि त्यांना चळवळीत आणण्यासाठीची महत्वाची भूमिका त्यांच्या पतीने निभावली 

ज्यांनी सर्व सामाजिक अडथळे तोडून पत्नीला पुढे आणले….…काहीही असो पण चळवळीत उतरणे आणि बदल घडवणे हि काय साधारण गोष्ट नाही, ती कुणी शिकवून होत नसते ते त्यासाठी जिद्द आणि समाजाशी तोंड द्यायला हिंमत लागते. त्यांच्या चरित्रात त्या सांगतात कि, महिलांच्या हक्कांसाठी लढायला खरे तर प्रार्थना समाजाने त्यांना शिकवलं…त्यामुळे त्यांना चळवळीत कुणी आणलं या श्रेयवादावर न बोललेलंच बरं….

न्यायमूर्ती रानडे हे त्या काळात महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेसाठी काम करणाऱ्या प्रार्थना समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते. १८८० च्या सुमारास, रमाबाई रानडे देखील प्रार्थना समाजाच्या कार्यात सामील झाल्या, जिथे त्यांना उदारमतवादी विचार आणि वैचारिक बळ मिळाले. प्रार्थना समाजात राहून त्यांनी महिलांना जागरुक आणि संघटित करण्यास सुरुवात केली आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व, भाषा शिकवणे आणि बरेच काही सांगण्यास सुरुवात केली. लवकरच रमाबाई रानडे यांच्या कार्याला समाजात ओळख मिळू लागली. 

१८९३ ते १९०१ या काळात रमाबाई रानडे लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्या काळात त्यांनी मुंबईमध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब आणि लिटररी क्लब सुरू केला, ज्या अंतर्गत महिलांना सार्वजनिक बोलण्याची आणि शिवणकाम आणि विणकामाची कला शिकवली गेली. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना समाजातील रूढिवादी वर्गाकडून टीका आणि विरोधाला सामोरे जावे लागले, पण रमाबाईंनी कधीच मागे वळून पाहिले नाही….

त्या काळात असा विरोध होत होता तरी देखील त्यांनी समाजाला भीक घातली नाही आणि सुधारणा कार्य चालूच ठेवलं…हे झालं तेंव्हाचं पण आत्ता एकविसाव्या शतकात देखील भारतातील महिलांच्या प्रगतीवरून वाद निर्माण होतात. लोंकांचा विरोध होतो….म्हणजे त्या काळाची कल्पनाच न केलेली बरी. 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.