धाब्यावर काम करणाऱ्या तेलगू पोराला मारलेली हाक पुढे इतकं फेमस हिंदी गाणं झालं.

मराठी भाषा असो, हिंदी असो कि अजून कुठली. गाण्यात भाषेची भेसळ करण्याचं फॅड हल्ली बरच वाढलंय.

हिंदी भाषेतल्या गाण्यात मध्येच एखादी मराठी ओळ येणं किंवा मराठी गाण्यात मध्येच हिंदी ओळ असणं हे काय आपल्यासाठी नवीन राहिलेलं नाही. देशी भाषा पुरे पडत नाहीत म्हणून की काय तर आता अनेक विदेशी भाषाही हल्ली गाण्यांमध्ये डोकावायला लागल्या आहेत.

गाण्यात एखादी ओळ इतर कुठल्या भाषेची येणं तरी सुद्धा ठीके. पण हिंदीत एक असं गाणं आहे की ज्या गाण्याचे सुरवातीचे दोन शब्दच मुळी हिंदी भाषेतले नाहीत. म्हणजे गाण्याची सुरवातच वेगळ्याच कुठल्या तरी भाषेने होते.

तर हे गाणं म्हणजे, रमैय्या वस्तावैय्या.

गाणं तसं जुनं असलं तरी या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. अंताक्षरीतल्या ठरलेल्या चार गाण्यांपैकी हे एक गाणं. आजही हे गाणं कुठेही लागलं की हात आपोआप ताल धरतात, पाय आपोआपच थिरकायला लागतात.

परंतु रमैय्या वस्तावैय्या या दोन शब्दांचा नेमका अर्थ काय हे बहुतेकांना माहीतही नसेल.

तर या दोन शब्दांमागे एक गमतीशीर किस्साय.

रमैय्या वस्तावैय्या हे गाणं आहे श्री ४२० या चित्रपटालं.

शोमन राज कपूर यांच्या आर के बॅनरच्या या चित्रपटाची स्टारकास्ट एकदम तगडी. स्वतः राज कपूर यांच्या सोबत नर्गिस, नदिरा, ललिता पवार यांसारखी दिग्गज मंडळी या चित्रपटात होती. राज कपूर यांच्या सिनेमांची खास ओळख म्हणजे त्यातली साधी सोपी पण हृदयाला भिडणारी गाणी. स्वतः राज कपूर यांना संगीताची जाण होती त्यामुळेच संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र हे त्यांच्या सिनेमांचा नाही तर त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले होते.

या त्यांच्या गाढ मैत्रीमुळे सिनेमाच्या गाण्यांची निर्मिती म्हणजे एक सोहळाच असायचा.

एकदा असच झालं. श्री ४२० या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान; राज कपूर, शंकर जयकिशन, शैलेन्द्र वगैरे मंडळी आपापली कामं आणि शूटिंग उरकल्यावर नेहमी एका धाब्यावर जात असत. धाब्यावर जाऊन चहा पित ‘चील’ करणं हा त्यांच्या शूटिंग आणि रुटीनचाच एक भाग.

तर या धाब्यावर एक काम करणारा पोऱ्या होता. दिवसभर धाब्यावर अशी अनेक माणसं येत जात असंत, खाण्या पिण्याची रेलचेल असे आणि तो तिथे एकटाच असल्याने त्याची पार तारांबळ उडत असे.
सतत पळापळ करणाऱ्या या पोऱ्याचं नाव होतं रमैय्या.

रमैय्या हे आण, रमैय्या ते आण, रमैय्या इकडे ये आणि रमैय्या तिकडे जा हे ऐकण्यातंच त्याचा सारा दिवस जात असे. तिथे येणारा प्रत्येकजण रमैय्याच्या नावाचं पारायण करी.

पण या धाब्याचा मालक होता तेलगू. त्यामुळे रमैय्याशी तो तेलगू भाषेतंच बोलत असे. आणि गंमत म्हणजे तेलगू भाषेत ‘इकडे ये’ला वस्तावैय्या असं म्हणंत.

त्यामुळे दर वेळी रमैय्याला बोलवताना तो रमैय्या वस्तावैय्या असं म्हणत असे.

झालं.. एक दिवशी शूटिंग आटपून, राजकपूर, शंकर जयकिशन आणि मंडळी धाब्यावर गेली असताना हा रमैय्या असाच इथून तिथे पळत होता आणि त्याच्या मालकाची रमैय्या वस्तावैय्या, रमैय्या वस्तावैय्या अशी टकळी सुरूच होती.

तेवढ्यात चहा येण्याची वाट बघता बघता या फिल्मी कलाकारांनी टेबलावरंच एक ठेका धरला.
आणि रमैय्या वस्तावैय्या, रमैय्या वस्तावैय्या करत राहिले..

पुढे शैलेन्द्रनी याच ठेक्यावर शब्द गुंफायला सुरवात केली. काय तर म्हणे,

मैने दिल तुझको दिया.. मैने दिल तुझको दिया.. रमैय्या वस्तावैय्या, रमैय्या वस्तावैय्या..

एका धाब्यावरच्या पोऱ्याला मारलेल्या हाकाऱ्यांचं पुढे इतकं फेमस हिंदी गाणं होईल ह्याची ना त्या पोऱ्याला कल्पना असेल, ना त्याच्या मालकाला असेल आणि ना ह्या कलाकारांना..

या गाण्याचे ज्येष्ठ संगीतकार शंकर जयकिशन होते, गीतकार अर्थातंच शैलेन्द्र होते, हे गाणं चित्रित झालं ते नर्गिस आणि राज कपूरवर आणि गायलं.. लता मंगेशकर, महम्मद रफी आणि मुकेश यांसारख्या ज्येष्ठ गायकांनी.

आता तुम्ही हे गाणं जेव्हा पुन्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला, त्यावेळी टेबलावर या गाण्याचा ठेका कसा धरला गेला असेल ह्याची आपोआपच कल्पना येईल.

नंतर प्रभुदेवा दिग्दर्शित, ‘रमैय्या वस्तावैय्या’ नावाचा, २०१३ साली एक चित्रपटही आला त्यामुळे या गाण्याला मिळालेली प्रसिद्धी किती होती ह्याबद्दल वेगळं काही सांगायलाच नको.

एखाद्या नामांकित आणि लोकप्रिय कलाकृतीच्या मागे असा रंजक किस्सा असला की ती कलाकृती अधिकंच आवडायला लागते आणि आपण त्या कलाकृतीकडे आणखीनच कौतुकाने पाहायला लागतो, त्या कलाकृतीशी लगेचच कनेक्ट होतो.

आता हे गाणं ऐकताना प्रत्येक वेळी तो धाब्यावरचा रमैय्या तरी आठवेल नाहीतर कुठल्याही पोऱ्याला पाहून हे गाणं तरी आठवेल एवढं नक्की.

  • भिडू मैथिली आपटे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.