जडेजामुळं वाचला नाहीतर, रमण लांबाला भर मैदानात स्टम्पनं मार खावा लागला असता…
तुम्हाला रमण लांबा आठवतो का ? धिप्पाड उंचीचा तगडा प्लेअर. मुळचा दिल्लीकर असलेला रमण लांबा खतरनाक प्लेअर होता. रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या नावाचा डंका वाजवून लांबानं भारतीय संघात स्थान मिळवलं. कृष्णम्माचारी श्रीकांतचा ओपनिंग पार्टनर म्हणून लांबा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानातही उतरला.
ऑस्टेलियाच्या खतरनाक बॉलिंगला या दोघांनी जबरदस्त चोपकाम दिलं. साहजिकच लांबाच्या नावाची चर्चा सुरु झाली. पण लांबाच्या बॅटिंगपेक्षा एक गोष्ट भारी होती ती म्हणजे त्याची फिल्डिंग.
शॉर्ट फॉरवर्ड लेग या महत्त्वाच्या पण डेंजर पोझिशनला बिना हेल्मेटचा थांबून लांबा कॅचेस घ्यायचा. बॅटला लागून बॉल जरासा हवेत उडाला आणि जवळ लांबा असेल तर विकेट फिक्स असायची. इतकी लांबाची दहशत होती.
लांबानं जसं बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये नाव काढलं, तसंच त्याचं नाव चर्चेत राहिलं ते एका राड्यामुळं.
दुलीप ट्रॉफीमध्ये वेस्ट झोन विरुद्ध नॉर्थ झोन फायनल मॅच होती. वेस्ट झोनकडून तीन सेंच्युरीज बसल्या. रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर आणि संजय मांजरेकर या तिघांनी सेंच्युरी मारली आणि वेस्ट झोननं बोर्डावर स्कोअर लावला ५६१ रन्स. आता ५६१ रन्स आपल्याला लय वाटत असले, तर नॉर्थ झोननं थोडे नाही ७२९ रन्स मारले होते.
कपिल देव, मनोज प्रभाकर आणि रमण लांबा तिघांनीही सेंच्युरी मारत वेस्ट झोनच्या भारी बॉलिंग लाईनअपला धुतलं होतं. साहजिकच नॉर्थ झोनला दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त वेळ घालवायचा होता.
लांबा आणि अजय जडेजा ही ओपनिंग पेअर मैदानात उतरली. मॅचचा पाचवा दिवस होता, त्यामुळं दोघांनी टुकूटुकू खेळायला सुरुवात केली. अधनंमधनं एखादा शॉट मारायचा, लोकांच्या टाळ्या मिळवायच्या असा सगळा कारभार. इनिंगमधली दहावी ओव्हर टाकत होता, राशिद पटेल.
आता राशिद पटेल कोण हे सांगायला हवंच.
तर राशिदचंही डोमेस्टिक सर्कलमध्ये चांगलं नाव होतं. डेब्यू मॅचमध्ये दोन विकेट्स काढल्या होत्या, तेव्हाही त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. पटेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची संधी सुद्धा मिळाली, पण डेब्यू टेस्टमध्ये दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर आऊट झाल्यानं त्याच्या इंटरनॅशनल टेस्ट करिअरला तिथंच ब्रेक लागला. त्यानं एक वनडेही खेळली पण त्याच्या या करिअरची फार चर्चा झालीच नाही. चर्चा झाली ती रमण लांबा विरुद्धच्या राड्याची.
राशिद पटेल बॉलिंगला आला आणि त्यानं लांबाच्या अंगाला बॉल लागेल असा मारा करायला सुरुवात केली. लांबाही चिडला, पण पुढच्या बॉलवर किस्सा झाला.
राशिदनं नो बॉल टाकलाच पण बॉल पिचवर नाय पडला, बॉल गेला रमण लांबाच्या डोक्यावर. पण विषय इथंच थांबला नाही, राशिद उचकला आणि त्यानं स्टम्प काढला तो थेट लांबाला मारायला घेतला. तो थेट लांबाच्या मागं पळायला लागला, लांबाला वाटलं तो फक्त धस्ती देतोय.
पण प्रत्यक्षात राशिदनं स्टम्प घुमवला, लांबा तेवढ्यात जडेजाच्या मागं लपला आणि स्टम्प जडेजाला लागला. सगळे प्लेअर्स मध्ये पडले आणि दोघांना बाजूला केलं.
पण या राड्यामुळं प्रेक्षकांनीही कल्ला करायला सुरुवात केली. त्यांनी थेट ग्राऊंडवर दगड फेकले, बाऊंड्री लाईनवर असलेल्या विनोद कांबळीलाही या दगडांचा मार खावा लागला. मॅच सुरु झाली, पण टी टाईमच्या आधीच संपवण्यातही आली. साहजिकच या सगळ्याच खापर फुटलं ते राशिद पटेलवर.
त्या घटनेनंतर राशिदवर १३ महिन्यांचा बॅन लागला आणि काहीच चूक नसताना, मार खाता खाता वाचलेल्या रमण लांबालाही १० महिन्यांच्या बंदीची शिक्षा सोसावी लागली.
हे ही वाच भिडू:
- खास दिल्ली स्टाईल बेफिकीरीने तो जगला पण याच बेफिकिरीमुळे त्याचा घात केला..
- त्या दिवशी रोहित शर्मा सर जडेजाला बुक्कीत गार करणार होता.
- WWE स्क्रिप्टेड असायचं हे माहीत असेलही, पण ही स्क्रिप्ट कशी लिहिली जायची हे बघून घ्या…