कित्येक राजवंश आले नी गेले, पण त्यांचा साक्षीदार बनून रामेश्वरम मंदिर मानाने उभं आहे

भारताला देवभूमी असं संबोधल्या जातं. अनेक धर्माचे लोक इथे गुण्या – गोविंदान नांदत असले तरी भारत हा हिंदू बहुल राष्ट्र आहे. साहजिकच हिंदूंची खूप देवस्थानं इथे आहेत, ज्यांना रोज हजारोच्या संख्येने लोक भेट देतात. यामध्ये चार धाम यात्रा खूप जास्त प्रसिद्ध आहे. आयुष्यातून एकदा हज यात्रा करावी, अशी मुस्लिम लोकांची धारणा आहे तशीच मान्यता हिंदू संस्कृतीतही आहे. जीवनात एकदा तरी चार धाम यात्रा करावी, असं बोलल्या जातं.

या चार धाम यात्रेत भारतातील चार प्रतिष्ठित मंदिरांचा समावेश आहे. बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि पुरी. या चार मंदिरांपैकी रामेश्वरम हे एकमेव मंदिर आहे, जे महादेवाला समर्पित आहे. महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम. शिवाय स्थापत्यशास्त्रामुळेही याला विशेष महत्त्व आहे. असे म्हटलं जातं की, आशियातील हे एकमेव मंदिर आहे, ज्याचा खांब असलेला कॉरिडॉर सर्वात लांब आहे.

याचं अजून एक वैशिष्ट्य असं की,  या मंदिराचा रामायणाशीही संबंध आहे, म्हणून हे मंदिर अजूनच पूजनीय ठरतं. मान्यतेनुसार, इथूनच श्रीरामांनी मंदिरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर धनुषकोडी याठिकाणी लंकेत जाण्याचा सागरी मार्ग म्हणजे राम-सेतू बनवला होता.

पवित्र धार्मिक केंद्राव्यतिरिक्त, हे बेट प्राचीन काळात एक समृद्ध व्यापारी केंद्र देखील होते. ऐतिहासिकदृष्ट्या, सिलोन बेटावर ज्याला आज आपण श्रीलंका म्हणून ओळखतो, तिथे पोहोचण्यासाठी हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा हा बिंदू होता. १५ व्या शतकापर्यंत रामेश्वरम बेट मुख्य भूभागाचा भाग होता, पण कालांतराने विनाशकारी वादळामुळे ते मुख्य भूमीपासून वेगळे झाले, असं सांगितल्या जातं.

रामेश्वरमची भूमी अनेक राजवंशाची  साक्षीदार राहिली आहे.

सन १०१२-१०४० दरम्यान चोल राजा राजेंद्र चोल-पहिला यांचं राज्य होतं. त्यानंतर १२१५-१६२४ या काळात सिलोनच्या जाफना राज्याचा रामेश्वरम बेटाशी जवळचा संबंध होता. मंदिरामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं आणि इथे त्यांनी दान देखील केलं होतं. असं म्हटलं जातं की, पहिले शीख गुरु नानक यांनी १६ व्या शतकात सिलोनला जाताना या बेटाला आणि मंदिराला भेट दिली होती. याच शतकात मदुरै  नायकांपासून फारकत घेणारे सेतुपती हे प्रमुख शासकांपैकी एक होते. त्यांच्या कारकिर्दीत रामेश्वरमच्या मंदिरात विलक्षण बदल घडून आला.

हा प्रदेश नंतर १८ व्या शतकात पांड्य, विजयनगर साम्राज्य, मराठा, निजाम आणि अखेरीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आला.

रामेश्वरम मंदिराची निर्मिती कधी करण्यात आली?

मंदिराच्या बांधकामाची नेमकी तारीख स्पष्ट नाही, परंतु एका पौराणिक कथेनुसार, श्रीरामांनी रावणाचा वध केला. पण रावण ब्राम्हण होता आणि हिंदू धर्मात ब्रह्महत्या पाप मानल्या जातं. ब्राह्मण रावणाच्या वधाच्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी ऋषींनी श्रीरामांना सल्ला दिला. रावण हा शिवभक्त असल्याने श्रीराम आणि सीता माता यांनी शिवाची पूजा करावी, असा सल्ला त्यांना देण्यात आला.

पूजेसाठी श्रीराम आणि सीता माता यांना  शिवलिंग हवं होतं. त्यासाठी श्रीरामांनी हनुमंताना शिवलिंग आणण्यासाठी काशीला पाठवलं. पण हनुमंताना शिवलिंग आणण्यास उशीर झाला, त्यामुळे सीता मातांनी इथे  वाळूपासून शिवलिंग बनवलं. यामुळेच आज मंदिरात दोन शिवलिंग आहेत.

असं म्हणतात की, आज आपण जे मंदिर पाहतो ते अनेक शतकांनंतर वेगवेगळ्या राजांच्या योगदानाने बांधलं गेलं आहे. यामध्ये मुख्य योगदान रामनाथपुरमच्या सेतुपती राजाचं होतं. रामेश्वरम मंदिराचं एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुबक-स्तंभ असलेला बाह्य कॉरिडॉर. १२ खांब असलेला कॉरिडॉर हा आशियातील सर्वात लांब मंदिर कॉरिडॉर मानला जातो. हे १८ व्या शतकात मुथुरामलिंगा सेतुपतीनं बांधलं होतं, आणि त्याला ‘चोक्काटन मंडपम’ असं म्हणतात.

मुख्य देवता म्हणजे महादेवाव्यतिरिक्त, मंदिर परिसरात बावीस तीर्थ पवित्र जलाशयांचा समावेश आहे. यामध्ये  विष्णू, गणेश आणि पार्वती यांना समर्पित अनेक लहान मंदिरे आहेत.

वास्तुविशारद जेम्स फर्ग्युसन यांच्या मते, “जर असं एक मंदिर निवडायचं असेल जे द्रविडीयन शैलीचं सर्व सौंदर्य त्याच्या संपूर्ण परिपूर्णतेमध्ये प्रतिबिंबित करत असेल आणि डिझाइनच्या सर्व विशिष्ट वैशिष्ट्यांचे उदाहरण असेल तर ते नक्कीच रामेश्वरमचं मंदिर असेल. “

आज या मंदिरात सर्वात जास्त भाविक येतात आणि लाखो लोकांच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक बनून रामेश्वरम मंदिर उभं आहे.

हे ही वाच भिडू :

 

1 Comment
  1. abhay says

    “जुडलेलं”??? असा मराठी शब्द अस्तित्वात तरी आहे का? भैय्या ठेवलाय का टाइपिंग करायला??

Leave A Reply

Your email address will not be published.