आठवले म्हणतायत, मलिकांच्या पिक्चरमध्ये अजून माझा रोल बाकी आहे
राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजतंय. क्रूझ पार्टीत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ड्रग्ज घेतले का नाही हे अजून स्पष्ट झालं नसलं, तरी ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बरेच नवे पिक्चर सुरू झाले. त्यातलाच एक म्हणजे नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात रंगलेला सामना.
आतापर्यंत अनेक आरोप-प्रत्यारोप, पत्रकार परिषदा आणि शेरो-शायरी झाली आहे. तरी या पिक्चरचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मलिकांनी वानखेडेवर बोगस जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोपही केला. हा सामना सुरु असतानाच वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिही. वानखेडे यांच्या वडिलांच्या नावावरूनही बराच गदारोळ झाला.
आर्यन खान आणि इतरांची जामीनावर सुटका झाल्यावर हे प्रकरण निवळेल असं वाटत होतं. मात्र आता यात नवा ट्विस्ट आला आहे.
क्रांती रेडकर आणि समीर यांचे वडील ज्ञानदेव यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली.
या भेटीनंतर रामदास आठवले काय म्हणाले,
समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही, आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे. नवाब मलिक म्हणतात पिक्चर अजून बाकी आहे, पण या पिक्चरमध्ये माझा रोल बाकी आहे. नवाब मलिक दररोज वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. क्रांती रेडकर यांनी मला सर्व कागदपत्रं दाखवली. कागदपत्रं अधिकृत आहेत. वानखेडे कुटुंबीय बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत. समीर वानखेडेंविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. जर तुमचे काही आरोप असतील तर कोर्टात जा. जावयावरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप करण्यात येत आहेत. मलिकांसाठी आमच्याकडे वेळ नाही.
त्यामुळं आता नवाब मलिक आठवलेंना काय उत्तर देतात आणि आठवलेंचा रोल आणखी काय खुलासे करतो हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच.
हे ही वाच भिडू:
- म्हणून नवाब मलिक यांना भंगारवाला म्हणतात
- पोरालाच नाही तर कधी काळी वानखेडेनी शाहरुखला पण आपला इंगा दाखवला होता.
- वानखेडेमध्ये शाहरुखला अडवणाऱ्या विकास दळवींचं पुढं काय झालं?