मुंबईचं टायटॅनिक “रामदास बोट” जी आजच्या दिवशी ६९० लोकांना घेवून बुडाली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळायाला महिना बाकी होता. १७ जुलै १९४७ चा दिवस. सकाळी ८ वाजताची वेळ होती.

रामदास बोट नेहमीप्रमाणे मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवस बंदराकडे निघाली. गटारी अमावस्या असल्याने सुट्टी होती त्यामुळे मुंबईत राहणारी चाकरमानी मंडळी कोकणात घरच्याना भेटण्यासाठी निघाली होती. यात विठ्ठलाची वारी करून आलेले वारकरी होते, कोळी बांधव आणि भाजीपाला विकणारे देखील होते. त्यादिवशी प्रवाशांसह बोटीतील कामगार आणि खलाशी मिळून जवळपास ७५० लोकं बोटीवर स्वार होते.

पावसाळ्याचे दिवस होते.

शिट्टी वाजली, हमालांनी शिडी काढून घेतली, नांगर वर उचललं गेलं, खलाशाने सुकाणू फिरवलं अन बोट निघाली. पाऊस पडत होता. रामदास बोट प्रवाशांना घेऊन रेवस बंदराकडे निघाली असताना काशाच्या खडकाजवळ पोहचली तोच वातावरण बदललं.

सोसाट्याचा वारा सुटून समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या. बोट वादळात अडकली. समुद्राच्या लाटा बोटीला धडका देत होत्या. बोटीत पाणी शिरायला लागलं आणि बोटीवरील लोकांत एकच कल्लोळ माजला. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी आटापिटा करत होता. बोटीवर असलेल्या तुटपुंज्या लाईफ सेव्हिंग जॅकेट मिळवण्यासाठी धडपडत एकमेकांच्या उरावर चढत होते.

अशातच बोटीच्या स्टारबोर्डच्या बाजूने एक जोरदार लाट बोटीवर धडकली आणि बोट पूर्णपणे एका बाजूला उलटली. काही कळायच्या आत परत एक मोठ्ठी लाट उसळली आणि तिच्यात बोट गुडूप झाली. 

मुंबई बंदरापासून हाकेच्या अंतरावर सकाळी ९ वाजता बोट बुडाली तरी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बोट बुडल्याची बातमी कुणाला मिळाली नव्हती. अलिबागचे बारकू शेठ मुकादम लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने मुंबई बंदरावर पोहचले आणि रामदास बुडल्याची बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली.

अख्खी मुंबई भाऊच्या धक्क्यावर जमा झाली. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर भीती. रामदास वरच्या प्रवाश्यांमध्ये गिरगाव आणि परळ भागातील प्रवासी अधिक होते. जे पेण, रोहा आणि अलिबाग भागात काम करायचे.

रेवस आणि मुंबईचे अनेक कोळीबांधव या प्रवाशांच्या शोधासाठी आपापल्या बोटी घेऊन गेले. अनेकांनी आपली गोळा केलेली मासळी परत समुद्रात फेकून दिली. जवळपास ७५ जणांचा जीव वाचवण्यात यश आलं. यात बोटीचा कप्टन शेख सुलेमान इस्माईल देखील होता. बाकी ६९० लोकांना बोटीसोबत जलसमाधी मिळाली. पण बाकीच्या अनेकांचे मृतदेह देखील सापडले नाहीत.

चुकून यातला कोणी वाचला असेल आणि पोहत किनाऱ्यावर येईल या वेड्या आशेने बरेच जण घटना घडून गेल्यावरही कित्येक महिने लोकं भाऊच्या धक्क्यावर आणि रेवसच्या बंदरावर जात होती.

स्वातंत्र्याच्या तोंडावर मुंबईकरांना बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता. नवीन सरकारने आल्या आल्या दुर्घटना पिडीताना मदत जाहीर केली. त्यांना रेवस जवळ जमिनी देण्यात आल्या. यातूनच बोदनी हे छोटे गाव वसले. या गावातील अनेकांचे नातेवाईक रामदास बोटीवर प्रवासी होते.

स्कॉटलंडच्या स्वान अँड हंटर या कंपनीने १९३६ मध्ये ही बोट बांधली होती. ती १७९ फूट लांब आणि २९ फूट रुंद होती तर तिचे वजन सुमारे ४०० टन्स इतके होते. तिची १००० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती.

या बोटीचे मालक होते  ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह स्टीम नेव्हीगेशन कंपनी’ स्वदेशी चळवळीच्या निम्मिताने एकत्र येऊन काही जणांनी सहकारी तत्वावर या कंपनीची स्थापना केली होती आणि ही बोट खरेदी करून तिला रामदास हे नाव दिल. त्याकाळात लोकांच्या भावनांचा आदर करून देवदेवतांची, संतांची नावं बोटीला दिली जायची.

गोऱ्यांच्या नाकावर टिच्चून या कंपनीने कोकण-गोवा किनारपट्टीवर स्वस्त आणि मस्त बोट सेवा सुरू केली. लोकांच्या मनातही कंपनी बद्दल जिव्हाळा होता. ते तिला आपुलकीने ‘माझी आगबोट कंपनी’ म्हणून बोलायचे. पण अवघे ९ वर्षेच या बोटीला लोकांना सेवा देता आली.

रामदास बुडून आज ७४ वर्षे झाली. कोकणातून मुंबईला स्थायिक झालेल्या चाकरमान्याना या आठवणी विसरता येत नाहीत. पिढ्यानुपिढ्या याच्या गोष्टी सांगितल्या जातात.

भारताच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात होता. जो जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजबुडी इतकाच गंभीर होता. टायटॅनिक जहाजबुडीवर चित्रपट आल्याने त्याची प्रसिद्धी जगभर पसरली.  आता रामदास बोटी बुडीवर सुद्धा चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.