पाचच दिवसांपूर्वी सुरु झालेले रामदेव बाबांचे पतंजली टीव्ही चॅनल्स बंद पडायला आलेत…

रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी नेपाळमध्ये २०२१ मध्ये आस्था नेपाळ आणि पतंजली नेपाळ हे दोन चॅनल्स लॉन्च केले होते…हो तुम्ही या चॅनल्स चं नाव तर ऐकलच असेल..पण आता हेही माहित करून घ्या कि हे चॅनल्स बंद पडायच्या मार्गावर आलेत. 

विशेष म्हणजे १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हे चॅनल्स नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा आणि नेपाळचे कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते हा कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडला होता, या दोन मोठ्या नेत्यांच्या संयुक्त उपस्थितीत हे टीव्ही चॅनेल सुरू करण्यात आले होते. 

मात्र आता रामदेवबाबांच्या याच दोन चॅनलला नेपाळमध्ये विरोध होतोय, नेपाळ सरकारने या चॅनलवर कारवाईचा इशाराही दिला आहे. विनापरवानगी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करताच टीव्ही चॅनल्सचे प्रसारण झाले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा नेपाळ प्रशासनाने दिला.  शासनाचं म्हणणं आहे कि, रामदेव बाबांच्या दोन्ही चॅनल्स साठी नोंदणीचा अर्ज केला नव्हता…मग काय प्रशासन कोणतंही असो कारवाईचा बडगा उचलणारच ना !

असो, याच बाबत पतंजली योगपीठ नेपाळने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही टीव्ही चॅनेलचे प्रत्यक्ष प्रक्षेपण करत नाही. त्यासाठी आम्ही फक्त तांत्रिक तयारी करतोय. आम्ही नुकतेच टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग ऑफिसचे उद्घाटन केले आहे असेही त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे. 

त्याच वेळी, नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असा स्पष्ट इशारा दिला की, सरकारची मान्यता न मिळवता तसेच आवश्यक त्या प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत असलेल्या टीव्ही चॅनेलवर कारवाई केली जाणार आहे.  दुसरीकडे, नेपाळच्या माहिती आणि प्रसारण विभागाचे महासंचालक गोगन बहादूर हमाल यांनी सांगितले की, बाबा रामदेव यांच्या दोन्ही वाहिन्यांनी नोंदणीसाठीचा अर्जच केलेला नाहीये.

थोडक्यात सरकार दरबारी या चॅनेलची कोणतीही कायदेशीर नोंद नाही ना त्यासाठी प्रक्रिया अवलंबली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. हमाल म्हणाले की, “आम्ही पतंजली नेपाळने जारी केलेल्या निवेदनावर  विश्वास ठेवू शकत नाही. खरं काय ते शोधण्यासाठी आम्ही चौकशी समिती स्थापन केली आहे. जर पतंजली नेपाळने आमच्या परवानगीशिवाय आणि योग्य प्रक्रियेचे पालन न करता नेपाळमध्ये टीव्ही चॅनेल चालवले जातेय, तर आम्ही आवश्यक ती कठोर कारवाई करू…

दरम्यान, नेपाळमधील स्थानिक पत्रकारांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ नेपाळी पत्रकारांचे म्हणणे आहे की, मीडियामध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे कि, बाबा रामदेव यांचे दोन्ही चॅनेल्स सुरू करणेच मुळात कायद्याचे उल्लंघन आहे. 

मग या वादामध्ये ऑफिशीयली पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजारावाला उतरले..

त्यांचं असं म्हणन आहे की, नेपाळमध्ये डाउनलिंकिंगसाठी आस्था टीव्हीकडे २०२४ पर्यंत कायदेशीर  परवाना आहे. ते म्हणाले की, १९ डिसेंबरनंतर विहित प्रक्रियेनुसार संपूर्ण प्रसारण सुरू होईल. या दोन्ही चॅनलवर नेपाळच्या प्रेक्षकांसाठी धार्मिक आणि योगाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जातील. 

अलीकडेच रामदेव बाबा तीन दिवसांच्या नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या पतंजली सेवा सदन या निवासस्थानाचे उद्घाटनही केले होते….वाजत गाजत

पण पतंजली योगपीठाच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कार्यालयाच्या वतीने तर असंच सांगण्यात कि, चॅनेलच्या व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली आहे. याशिवाय उर्वरित काही गोष्टींच्या मंजुरीसाठीची  आवश्यक प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे…असं असेल तर मग नेपाळ सरकार खोटं बोलतंय कि बाबा रामदेव चे पतंजली योगपीठ खोटं बोलतंय हे येत्या चौकशीत समोर येईलच !

 

Leave A Reply

Your email address will not be published.