५७ वर्ष झाली अजूनही त्यांच्या लव्हस्टोरीची जादू कायम आहे
आपण हिंदी नट-नटींच्या प्रेमकहाण्या अगदी आवडीने ऐकतो. झगमगत्या दुनियेत त्यांचं कसं जुळलं, मग पुढे लग्न कसं झालं, असे अनेक विषय कित्येकदा गप्पांमध्ये सर्रास निघतात. पण आता तुम्हाला एक अशी प्रेमकहाणी वाचायला मिळणार आहे, जी अगदी सिनेमाची स्टोरी वाटेल.
हि प्रेमकहाणी आहे मराठी-हिंदी सिनेसृष्टीतली चिरतरुण जोडी सीमा आणि रमेश देव यांची.
सीमा देव म्हणजेच लग्नाआधीच्या सीमा सराफ यांनी सिनेसृष्टीत अभिनय करायला नुकतीच सुरुवात केली होती. हिंदी सिनेमांमध्ये काही भूमिकांमधून त्या झळकत होत्या. चंदेरी दुनियेत अभिनयाची सुरुवात अगदी लहान वयातच केल्याने शुटींगला जाताना त्यांची आई सोबत असायची.
‘जेवढे डायलाॅग असतात तेवढेच बोलायचे, इतर कोणाशी बोलायचं नाही’
असा आईचा प्रेमळ धाक सीमावर होता.
सीमा यांनी जेव्हा पहिला सिनेमा केला त्या सिनेमात रमेश देव त्यांच्या भावाच्या भूमिकेत होते. पुढेही दोन-तीन सिनेमांत सीमा-रमेश एकत्र होते. १९५८ साली रमेश हे सिनेमाचे हिरो म्हणुन नावारुपास येत होते. सिनेमांमध्ये एकत्र काम केल्याने रमेश सीमाबरोबर बोलायचा प्रयत्न करायचे.
‘अहो बाई! मी काय राक्षस आहे का, तुम्ही बोलत का नाही?’
असं रमेश सीमाला विचारायचे. आईच्या शब्दांमुळे आणि वयाने लहान असल्याने सीमा सेटवर शांतच असायच्या. रमेश सुद्धा बोलायची संधी साधत असले तरी सीमा हसण्याच्या पलीकडे कोणतं उत्तर द्यायच्या नाहीत.
याचवर्षी व्ही.अवधूत यांच्या ‘ग्यानबा तुकाराम’ सिनेमासाठी हि जोडी पुन्हा एकत्र आली. या सिनेमात रमेश सीमाचे हिरो होते. व्ही. अवधूत दोघांना शाॅट समजावत होते. शाॅट असा होता की, कॅमेरापासून थोडी लांब एक बैलगाडी होती. या बैलगाडीवर गवताचे मोठे भारे ठेवलेले होते. यावर बसुन ॲक्शन म्हटल्यावर सीमा-रमेश बैलगाडीतून येतील.
शाॅटची तयारी पूर्ण झाली. रमेश-सीमा बैलगाडीवर जाऊन बसले. इतक्यात हातातल्या भोंग्याच्या साहाय्याने व्ही. अवधूत यांनी ‘आता एक मोठा ढग आला आहे. तुम्ही उतरु नका. बैलगाडीवरच बसून राहा. ढग गेल्यावर आपण शुटींगला सुरुवात करु’ अशी सूचना सीमा-रमेशला केली.
अभिनयात परफेक्ट असणा-या रमेशने हिच वेळ साधली.
‘माझ्याशी लग्न करशील का?’ रमेशने सीमाला विचारले. रमेशने विचारलेला प्रश्न हा या सीनमधल्या डायलाॅगचा भाग आहे का, असं सीमाला सर्वप्रथम वाटलं. पण नंतर रमेशच्या प्रश्नाचा अर्थ सीमाच्या लक्षात आला. सीमा त्यावेळी पंधरा वर्षांच्या होत्या. ‘मी आता कुठे कामाला सुरुवात केलीय. अभिनय करुन मला घरची आर्थिक परिस्थिती सुधारायचीय. त्यामुळे इतक्यात माझा काही लग्नाचा विचार नाही’ असं सीमाने रमेशला उत्तर दिलं.
हे उत्तर ऐकल्यावर एखादा माणुस निराश होईल. पण रमेशने सीमाचं हे उत्तर स्वीकारलं. ‘हा ठीकय. मी थांबायला तयार आहे’ असं त्यांनी सीमाला सांगीतलं.
त्यानंतर एक नव्हे , दोन नव्हे तर तब्बल पाच वर्ष रमेश सीमासाठी थांबले. पाच वर्षानंतर सीमाने रमेशशी लग्न करण्याचा विचार केला.
हा विचार जेव्हा सीमाजींच्या आईला कळाला तेव्हा त्यांना मुलीच्या निर्णयाची काळजी वाटली. त्यांनी सीमाला या लग्नासंबंधी पुन्हा एकदा विचार करायला सांगीतलं. ‘माझ्या नशिबात जे असेल ते होईल. हा निर्णय मी घेतलाय त्यामुळे पुढच्या परिणामांची जबाबदारी पण माझीच असेल’ असं स्पष्ट शब्दात सीमाजींनी आईला सांगीतलं.
अखेर १ जुलै १९६३ ला सीमा-रमेश विवाहबंधनात अडकले.
रमेश-सीमा यांनी लग्नानंतर सुद्धा स्वतःची सिनेमा क्षेत्रातील कारकीर्द यशस्वी रित्या सुरु ठेवली. ‘अपराध’, ‘वरदक्षिणा’, ‘मोलकरीण’, ‘आनंद’, ‘जेता’ अशा अनेक मराठी-हिंदी सिनेमांमध्ये हि जोडी एकत्र दिसली. व्ययक्तिक आयुष्यात नवरा-बायको असणारी हि पहिली जोडी असेल जी सिनेमांमध्ये सुद्धा प्रेक्षकांना तितकीच पसंत पडली.
२०१३ साली या दोघांच्या सहजीवनाला ५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने देव कुटूंबियांनी पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नसमारंभ सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
मग भिडू! कशी वाटली या मराठमोळ्या कलाकारांची लव्हस्टोरी…
हे ही वाच भिडू.
- तिला कळालं आपला नवरा भुरटा चोर आहे, मग तीने आपल्या नवऱ्याला भारताचा डॉन बनवलं !
- अल्ताफ म्हणजे लांबूनच प्रेम करणाऱ्या व लांबूनच प्रचंड प्रेमभंग करून घेणाऱ्यांचा राजामाणूस.
- कट्टर धर्मांध औरंगजेब प्रेमात पडल्यानंतर दारू प्यायला निघाला होता