पुणे कितीही स्मार्ट झालं तरी रेनकोटसाठी आजही “रमेश डाईंग” हाच ब्रॅण्ड आहे

ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट, पाट्यांच शहर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्याचे आणखी एक ओळख म्हणजे इथले ब्रँड ज्यांनी त्यांची ओळख जगभर निर्माण झाली. त्यात भारत फोर्ज, बजाज सारख्या मोठे ब्रँड तर आहेत त्याच बरोबर लिज्जत, चितळे, अमृततुल्य सारख्या लोकल ब्रँड सुद्धा आपली लीगसी टिकवून ठेवली आहे. 

यात अजून एक भर पडते ती रमेश डाईंग या ब्रँडची.

पावसाळ्यात रेनकोट आणि हिवाळ्यात स्वेटर आणि शाळा सुरु झाल्यावर स्कुल बॅग खरेदीसाठी पुणेकरकरांची पहिली पसंती असते ती रमेश डाईंगला. जेलमधील कपडे रंगविण्यापासून हा ब्रँडची सुरुवात झाली.

१९४५ मध्ये हौशीलाल भाई, बाबुलाल भाई, प्रणाला भाई, जयंतीलाल भाई शहा या चार भावांनी मिळून नारायण पेठेतील कन्याशाळेजवळ कपडे रंगविण्याचे एक दुकान सुरु केले. पुढच्या काही दिवासनांतर त्यांनी येरवडा जेल मधील कैद्यांचे कपडे रंगवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू शहरातील ग्राहक वाढविणाऱ्या भर दिला.

शहा कुटुंबीय मूळचे तळेगाव ढमढेरे येथील.

कामानिम्मित पुण्यात स्थायिक झाले होते. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात काही काळ शहा बंधू होते. त्यानंतर  १९५६ मध्ये कापडाच्या आणि नायलॉनच्या ताडपत्रीच्या पिशव्या तयार करायला सुरुवात केली. रमेश डाईंगला खरी ओळख इथूनच मिळाली. त्याचं दरम्यान रमेश डाईंगचे आताचं मेन स्टोर जिथं सदाशिव पेठेत आहे. ते स्टोर १९५८ मध्ये शहा त्यांनी सुरु केले. 

ताडपत्रीच्या पिशव्या टिकावू असल्याने त्यांना चांगली मागणी वाढली होती. १९६५ मध्ये शहा बंधूनी सदाशिव पेठेतील आपल्या दुकानात प्रिंटेड आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या तयार करायला सुरुवात केली होती. 

१९८१ मध्ये प्रदीप प्रणालाल शहा, गिरीश आणि मिलिंद जयंतीलाल शहा ही दुसरी पिढी या व्यवसायात उतरली होती. तर १९९१ मध्ये मिलींद आणि गिरीश शहा यांच्या हातात रमेश डाईंगचा सगळा व्यवहार आला. या बजाज, भारत फोर्ज सारख्या मोठं मोठ्या कंपन्यांना त्यांच्या नावाचे प्रिंट असलेल्या बॅग बनवून  द्यायला गिरीश आणि मिलिंद यांनी सुरुवात केली. 

त्या पिशव्यांना चांगली मागणी होती. मोठ्या कंपन्यांची ऑर्डर त्यांना मिळू लागली होती. कमी किंमतीत चांगली वस्तू कशी देता येईल यावरचं ते काम करत. जर चांगल्या वस्तू दिल्या तर ग्राहक आपल्याकडे परत येतील असा विश्वास या दोघांना होता. 

खरं डोकं लढविलं ते गिरीश शहा यांचा मुलगा कुशलने. 

त्यापूर्वी रमेश डाईंग मध्ये फक्त पिशव्या घ्यायला लोकं यायचे. फक्त पिशव्यांचा नाही तर इतर वस्तू ठेवायला सुरुवात केली होती. वाईल्ड क्राफ्ट, स्काय बॅग, केचवा, अमेरिकन टुरिस्टर सारखे ब्रँड कंपन्यांच्या वस्तू रमेश डाईंग मध्ये ठेवण्यात येऊ लागल्या. 

लोकांना ब्रँडच्या वस्तू हव्या असतात. हे मानसिकता कुशल याला पक्की ठाऊक झाली होती. लहान मुले, कॉलेजे मधले तरुणांना अट्रॅक्टीव्ह कलर, ब्रँडचे नाव असलेल्या गोष्टी पाहिजे असायच्या. मात्र, ब्रँडेड या वस्तू काहीशा महाग असायच्या. त्यामुळे ब्रँडेड वस्तूंन सारखी क्वालिटी असणारी त्याच क्वालिटीच्या वस्तू कमी किंमतीत उपलब्ध करून दिली तर लोकांकडून त्या चांगल्या प्रमाणात विकत घेण्यात येतील असे त्याला वाटले.  

त्यामुळे कुशलने  रेनकोट, स्कुल बॅग, छत्री, रेन बॅग कव्हरचे उत्पादन करण्याचे ठरविले. जयंतीलाल शहा यांच्या नावातील जय आणि त्यांच्या मुलांनी तयार केला म्हणून २०१२ मध्ये जयसन नावाने ब्रँड सुरु केला. याअंतर्गत रेनकोट, स्कुल बॅग, छत्री, रेन बॅग कव्हरचे उत्पादन सुरु केले.

पुणेकर वर्षभर काही ना काही कारणाने रमेश डाईंग मध्ये जात असतातच. 

कमी किंमतीत ब्रँड कंपन्यांचा वस्तू प्रमाणे त्यांनी आपले प्रोडक्ट द्यायला सुरुवात केली होती. येथून रमेश डाईंगचा लोकल टू ब्रँडेड असा प्रवास सुरु झाला. 

याच बरोबर रमेश डाईंगच्या दुकानात यामुळे येणारे ग्राहक त्यांचा ब्रँड जयसन आणि इतर ब्रँडेड वस्तूत फरक समजू लागला होता. इतर ब्रँडच्या तुलनेत जयसनच्या वस्तू कमी किंमतीत मिळत असल्याने ग्राहकांची मागणी त्यांच्या वस्तुंना वाढली होती. 

पूर्वी रबरा पासून रेनकोट तयार केले जात होते. त्यांचे वजन जास्त असल्याचे. त्यामुळे अनेकांना ते घालायला नको वाटायचे. रमेश डाईंग कडून जयसन ब्रँडनावाखाली हलक्या वजनाचे आणि चांगल्या क्वालिटीचे रेनकोटचे उत्पादन करण्यात येऊ लागले. याला पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. पावसाळ्यात पुण्यातील रस्त्यावर निम्म्या पेक्षा जास्त लोकांच्या अंगावर जयसन ब्रँडचा रेनकोट असतो.   

रमेश डाईंगमध्ये  सर्व हंगामी कपडे एकाच छताखाली मिळतात. रेनकोट, छत्र्या, जॅकेट्स, स्वेटशर्ट्स, थर्मल वेअर, स्कूल बॅग, लॅपटॉप बॅग आणि ट्रॉली बॅग रमेश डाईंगमध्ये अत्यंत स्वस्त दरात ब्रँडेड तसेच घरातील उत्पादने मिळू शकतात.

पुण्यात परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षण, नोकरी आणि फिरायला जाणारे अशी तीन कॅटेगरी आहे. यांना परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथं मिळतात. त्यात बॅग, रेनकोट, स्वेटर, मफलर चा समावेश असतो  

उत्तम दुकानदार म्हणून त्यांना पुण्यात गौरविण्यात आलं आहे. मर्चंड चेंबरकडून यशस्वी उद्योजक म्हणून सुद्धा पुरस्कार देण्यात आला आहे. कपड्यानं रंग देण्यापासून सुरु झालेला रमेश डाईंग चा प्रवास आता स्वतःचा ब्रँड बनण्यापर्यंत पर्यंत झाला आहे. पुण्यात रमेश डाईंगच्या एकूण ९ स्टोर आहेत. पुणेकर वर्षभर काही ना काही कारणाने रमेश डाईंग मध्ये जात असतातच. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.