२०१४ साली कॉंग्रेसचं अचूक भविष्य सांगितल्याने सोनिया गांधींनी त्यांना आमदार केलं..

सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेमधील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीच काम चाललंय.कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर होईल. बारा जणांच्या साठी मात्र शेकडोजण गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

या जागांसाठी देखील प्रचंड मारामारी सुरु आहे.

राज्यपाल हे आमदार निवडतात मात्र त्यांना ती यादी मंत्रिमंडळाकडून जाते. खरं तर या जागा विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी असतात.

मात्र आजवरचा इतिहास पाहिला तर जास्त करून राजकीय नेत्यांनाच यात संधी मिळत आलेली आहे.

निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांचे पुनर्वसन, नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना सामावून घेणे, जुने हिशोब, जातीपातीची गणिते यातच ही यादी भरते. कोणत्याही निवडणूक नाहीत, मनस्ताप नाही, पैसे खर्च करावे लागणार नाहीत यामुळे बरेच नेते या मागील दरवाजाने विधानपरिषदेमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात.

एकूण सांगायचं झालं तर नावाला राज्यपाल नियुक्त आमदार मात्र खरी नियुक्ती प्रत्येक पक्षाचे अध्यक्ष आपल्या मर्जीने करत असतात.

यावर्षी निवृत्त झालेले काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवार यांचा असाच एक किस्सा सांगितला जातो. 

माळशिरस तालुक्याचे रहिवासी असलेले अँड. रामहरी रुपनवर हे नव्वदच्या दशका पासून राजकारणात आहेत. खरं तर ते मूळचे भाजपचे. १९९७ पासून दहा वर्षाच्या काळात ते फोंडशिरस या जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते.

जिल्हा परिषदेतील भाजप नेते, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आदी पदे अँड. रुपनवर यांनी भूषवली होती. युती शासनाच्या काळात ३ वर्षे त्यांनी शेती महामंडळाचे संचालकपदही भूषवले होते.

अकलूज माळशिरस भागात विजयसिंह मोहिते यांच्या विरोधी गटातील प्रमुख नेत्यांमध्ये अँड. रामहरी रुपनवर यांचे नाव प्रमुख होते. पण भाजपमधील गटबाजीला कंटाळून त्यांनी २००४ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

त्यावेळी त्यांना काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे संघटक हे पद देण्यात आले होते. तिथे त्यांनी जोरदार प्रगती केली. काही वर्षातच प्रदेश काँग्रेसचे सचिव झाले. तळागाळातून आलेल्या रूपनवर यांना ग्रामीण भागाची नाडी व्यवस्थित ठाऊक आहे असं म्हणतात. याचाच अनुभव सोनिया गांधी यांना पण आला.

गोष्ट आहे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीची.

काँग्रेस पक्षातल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची सोनिया गांधी यांच्या समवेत बैठक बसली होती. प्रचाराची रणनीती ठरवणे, उमेदवार निश्चित करणे असे निर्णय या बैठकीत घेतले जात होते. त्यावेळी सहज म्हणून सोनिया गांधी यांनी प्रश्न विचारला,

“इस बार महाराष्ट्रसे युपीए के कितने एमपी चुनके आयेंगे ?”

खरं तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा आधीपासूनचा गड राहिला आहे. मात्र या निवडणुकीत एकूण भारतातच काँग्रेस आणि मित्र पक्षांची स्थिती प्रचंड वाईट होती. नरेंद्र मोदी यांची लाट आली होती आणि तिला थोपवणे कोणालाही शक्य नव्हते. राज्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नव्ह्ती. पण ते पक्षाध्यक्षांना सांगण्याची कोणाचीही हिंमत नव्हती.

राज्यातले मोठमोठे जेष्ठ नेते सुद्धा सोनिया गांधी यांना यंदा आपले ३० ते ३५ खासदार हमखास निवडून येणार असा दावा करत होते. एकेकाला विचारत विचारत सोनिया गांधी रामहरी रुपनवर यांच्याकडे आल्या.

तेव्हा साध्या भोळ्या रुपनवर यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं,

“यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे जास्तीतजास्त दोन खासदार निवडून येतील. “

या उत्तरामुळे सगळे अवाक झाले. सोनिया गांधींना हे अपेक्षित नव्हते. त्यांनी आपल्या चष्म्याच्या कोनातून एकदा रूपनवर यांच्याकडे पाहिले आणि पुढच्या नेत्याला सेम प्रश्न केला. त्यांनी देखील ३०-३५ चा आकडा सांगितला.

रामहरी रुपनवर यांची भविष्यवाणी खरी ठरली. २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून राजीव सातव आणि अशोक चव्हाण हे दोनच खासदार निवडून आले. भलेभले नेते या निवडणुकीत धाराशायी झाले होते.

त्याच वर्षी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदार नेमण्याची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोनिया गांधी यांनी रुपनवर यांना बोलावून घेण्यास सांगितले. हा कार्यकर्ता अभ्यासू आहे त्याला आमदार बनवा असा आदेश दिला.

विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पृथ्वीराज चव्हाणांनी सर्वच्या सर्व आमदार राजकीय क्षेत्रातून निवडले. त्यात रामहरी रुपनवर यांचा समावेश होता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.