रामलीला मैदानावर अनंत झाल्या आहेत राजकीय लीला !!

गोष्ट आहे २०११ सालची. दिल्लीच्या एका मैदानावर सगळ्या जगाच लक्ष लागलेलं. भारताचे आधुनिक गांधी म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भारतात लोकपाल बिल झाले पाहिजे म्हणून आमरण उपोषण करत होते. लाखोंची गर्दी जमली होती. मैदानाच्या बाहेर जत्रेसारखं रूप आल होतं. सगळ्यांच्या तोंडात एकच चर्चा सुरु होती,

“रामलीला मैदानावर काय झालं?”

रामलीला मैदान हे काही आज काल प्रसिद्ध झालेलं नाही. याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत.

दिल्ली ही मुघलांची राजधानी. तिथल्या मुघल सैन्यात अनेक हिंदू सैनिक असायचे. हे हिंदू सैनिक आपल्या मनोरंजनाच्यासाठी रामायणातील कथांवर नाटिका बसवायचे. पुढे पुढे ही परंपराच निर्माण झाली. यमुना नदीच्या तीरावर या नाटिका बघायला लोक गर्दी करू लागले. त्याला नाव देण्यात आल रामलीला.

खुद्द मुघल बादशहा बहादूरशहा जफरने या रामलीला पहायला यायचा अस म्हणतात !!

ही रामलीला मुख्यतः ज्या मैदानात व्हायची ते दिल्लीचे रामलीला मैदान. तटबंदीने बंदिस्त अशा जुन्या दिल्लीच्या आणि ब्रिटिशांनी वसवलेल्या नव्या दिल्लीच्या मधोमध हे मैदान उभे आहे. नवरात्रीनंतर दसऱ्याच्या दिवशी महाप्रचंड रावणाचे दहन केलं जायचं.

गेली शेकडो वर्षे इथे रामलीला होते. पूर्वी इथे तळे होते अस सांगितलं जात. पण आता त्याच्या खाणाखुणाच उरल्या आहेत. भगवान राम आणि त्यांच्या हनुमान आदी वानर सेनेच्या रामलीला तर प्रसिद्ध आहेतच. पण या पेक्षाही राजकीय पक्षाच्या सभामध्ये होणाऱ्या लीला देखील खूप प्रसिद्ध आहेत.

१९११ साली इंग्रजांनी भारताची राजधानी दिल्लीला हलवली आणि दिल्ली हे राजकीय घडामोडींच केंद्र बनलं.

गांधीजींच्या आगमनाने कॉंग्रेसने देखील इंग्रजांच्या विरुद्ध आक्रमक होतं असहकार आंदोलनास सुरवात केली. यावेळी अनेकदा गांधीजी, सरदार पटेल, पंडित नेहरू यांची भाषणे याच मैदानात होत होती. एखाद्या सागराप्रमाणे पसरलेले हे मैदान सर्वअर्थाने सभेच्या दृष्टीने सोयीचे होते.

येथे उभे राहूनच मोहम्मद अली जिना यांनी मुसलमानासाठी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती.

स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक प्रसंगाचा साक्षीदार रामलीला मैदान ठरले. 

स्वातंत्र्याच्या नंतरही रामलीलाचे हे स्थान कायम राहिले. स्वतंत्र भारताच्या भेटीला आलेली इंग्लंडची रानी एलिझाबेथच स्वागत इथेच करण्यात आलेलं. चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्या भेटीच्या कार्यक्रमासाठी नेहरूनी उभे केलेले मंदिरा सारखे स्टेज आजही तिथे आहे.

तिथे उभे राहूनच हिंदी चीनी भाई भाई ची घोषणा करण्यात आली होती.

मात्र काही वर्षातच चीनने नेहरूंच्या पाठीत खंजीर खुपसले आणि भारतावर युद्ध लादले. तेव्हा रामलीला मैदानावरच झालेल्या एका कार्यक्रमात लता दिदींनी ऐ मेरे वतन के लोगो हे गाण गायलं आणि पंडित नेहरूंच्या सकट अख्खा मैदान रडला होता.

याच मैदानात लागलेल्या आगीत नेहरुंना एका छोट्या मुलाने वाचवले आणि त्याचा गौरव करता करता  नेहरूंनी लहान मुलांच्यासाठी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार सुरु केले. 

नेहरूंचे उत्तराधिकारी लालबहादूर शास्त्री यांनी इथेच जय जवान जय किसान ही घोषणा दिली.

इंदिरा गांधीनी जेव्हा आणिबाणीची घोषणा केली तेव्हा त्यांच्या विरुद्ध जनसंघर्ष जयप्रकाश नारायण यांनी इथूनच सुरु केला. लाखो विद्यार्थी या सभेला हजर होते आणि पुढच्या काही काळातच त्यांनी इतिहास घडवला. जेपीनी इथुनच आरोळी दिली होती,

“सिंहासन करो खाली जनता आ रही है”

मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, चन्द्रशेखर, जगजीवनराम यांनी कॉंग्रेसला पर्याय देणारा जनता पक्ष याच मैदानात स्थापन केला होता.

भारतात कधीही कोणती मोठी आंदोलने झाली त्याची सुरवात येथेच झाली. 

काही वर्षापूर्वी अण्णाच्या भारतव्यापी इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमेच केंद्र रामलीला मैदान होतं. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, श्री श्री रवीशंकर, बाबा रामदेव असे अनेक जण त्यांच्यासोबत इथे राहून लोकपाल बिल व्हावे यासाठी लढत होते. अख्खा देश त्यांच्यापाठीशी उभा राहिला. इथूनच बाबा रामदेव आपली अटक टाळण्यासाठी महिलेचा वेश करून पळाले होते.

अस म्हणतात की याच आंदोलनाचा परिणाम म्हणून दहा वर्षांचे मनमोहन सिंगांचे सरकार पडले. कॉंग्रेसच्या वाईट काळास इथूनच सुरवात झाली.

तीन फुटबॉल मैदान बसतील एवढा महाप्रचंड असलेला हा रामलीला मैदान भारताच्या स्थित्यंतराचे प्रतिक आहे. आता इथे रामलीला होत नाहीत. राजकीय सभा नसतील तेव्हा मुले खेळण्यासाठी इथे जमतात. क्रिकेट, विटी दांडू, फुटबॉल खेळणाऱ्या या मुलांना ठाऊक देखील नसेल की आपण किती मोठ्या इतिहास बदलणाऱ्या मैदानावर उभे आहोत ते.

महात्मा गांधींपासून ते पंतप्रधान मोदीच्यापर्यंत अनेक भाषणांचा साक्षीदार आहे रामलीला मैदान

आज येथे कॉंग्रेसने नागरिकता सुधारणा विधेयक (cab) विरोधात आंदोलन सुरु केलेलं आहे. या सभेला देखील गर्दी झालेली आहे. इथे उभा राहून कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधीनी घणाघाती भाषण केलंय. ज्या रामलीला मैदानात कॉंग्रेसमुक्त भारतची स्क्रिप्ट लिहिली गेली तिथेच कॉंग्रेसला पुनर्जन्म देण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. आता जनता त्यांना साथ देते का हेच पहावे लागेल.

  हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.