भारतीय क्रिकेटचं भविष्य समजल्या जाणाऱ्या रामनाथ पारकरांचा अंत मात्र दुर्दैवी होता…

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही. खेळामध्ये दुर्दैवी अंत झालेल्या खेळाडूंची उदाहरण सुद्धा बरीच आहेत. आजचा किस्सा अशा खेळाडू विषयीचा आहे जो एके काळी भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून ओळखला जात होता. सुनील गावस्करांचा आवडता खेळाडू असलेला हा क्रिकेटपटू मात्र शेवटी अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय क्रिकेटला अलविदा करून गेला.

रामनाथ पारकर हे नाव भलेही आज आपल्याला ऐकायला नवीन असेल पण हा खेळाडू एकेकाळी भारताच्या आक्रमक फिल्डर्समध्ये एक नंबरला होता. इंडियन क्रिकेट कॅप्टनचा तो स्वप्नातला खेळाडू असेल कारण त्याची फिल्डिंग तर जबरदस्त होतीच शिवाय तो ज्या पद्धतीने बॅटिंग करायचा कि समोरच्या संघाच्या बॉलर्स लोकांचा बचाव सुरु व्हायचा. पण रामनाथ पारकर यांच्या कारकिर्दीबद्दल जास्त कोणाला माहिती नाही त्याबद्दल जाणून घेऊया. 

५’३ इंच इतकी हाईट असलेला एक खेळाडू संघात आला होता नाव होतं रामनाथ पारकर. वरळीच्या जम्बोरी मैदानावर पारकर हे सुरवातीला क्रिकेट खेळायचे. वेगळ्या स्टाईलने कट्स, पूल, हुक खेळणारा खेळाडू सुनील गावस्करांना आवडला होता. सुनील गावस्कर रामनाथ पारकर यांच्याबद्दल म्हणतात कि,

“the best opening batsman of my career”.

फ्रंट फुटवर येऊन स्पिन डिपार्टमेंटची धुलाई करण्याचं काम रामनाथ पारकर अचूक करायचे. १९७२-१९७३ च्या काळात रामनाथ पार्कर यांना टेस्टमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी टोनी लेविसच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ खेळत होता. पण रामनाथ पारकर यांना केवळ २ कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. या दोन टेस्ट सामन्यांमध्ये ८० धावा पारकरांनी केल्या.

रणजी क्रिकेटमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व रामनाथ पारकर यांनी केलं. ८५ फर्स्ट क्लास मॅचमध्ये रामनाथ पारकर यांनी मुंबई संघासाठी क्रिकेट खेळलं. सुनील गावस्करांचे ओपनिंग पार्टनर म्हणून पारकर हे मुंबईकडून खेळायचे. ८५ फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये पारकरांनी ४४५५ धावा ८ शतकांनीशी केल्या होत्या. टेस्टमधून वगळल्यानंतर पारकर हे पुन्हा स्थानिक क्रिकेटकडे वळले. 

पुढे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून रामनाथ पारकर हे रिटायर झाले आणि अकादमीमध्ये क्रिकेट कोच म्हणून काम पाहू लागले. रामनाथ पारकर हे क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिले जाणारे खेळाडू होते मात्र त्यांचा खेळ टेस्टमध्ये अत्यंत निराश करणारा होता. याही पेक्षा वाईट म्हणजे रामनाथ पारकर यांचा दुर्दैवी अंत झाला.

३१ डिसेंबर १९९५ रोजी रामनाथ पारकर हे आपली मुलगी सुचित्रा हिला ओशिवाराला सोडून कुलाब्याला क्रिकेट अकॅडमीकडे चालले होते. पण एका टॅक्सीने त्यांना धडक दिली आणि यात पारकर यांना गंभीर जखमा झाल्या. बऱ्याच सर्जरी झाल्यानंतरसुद्धा काहीही फरक पडला नाही. उपचार सुद्धा बरेच झाले. रामनाथ पारकर हे तब्बल ४३ महिने कोमात होते. शेवटी ११ ऑगस्ट १९९९ रोजी रामनाथ पारकर यांचं निधन झालं. 

एकेकाळचा भारताचा भविष्य समजला जाणाऱ्या क्रिकेटरचा दुर्दैवी अंत झाला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.