राजकारण न करताही फिल्मसिटी उभी करता येऊ शकते हे रामोजी राव यांनी दाखवून दिलं

सध्या उत्तरप्रदेशच्या फिल्मसिटीवरून वाद सुरु आहेत. तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारून मुंबईचं बॉलिवूड तिकडे नेण्याची घोषणा करत आहेत. तर यावरून महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करत आहेत.

फिल्मसिटीचं राजकारण चांगलंच पेटलंय. पण भारतातली एक फिल्मसिटी अशीही आहे जिथे कोणतंही राजकारण झालं नाही पण ती फक्त भारतातलीच नाही तर जगातली सर्वात मोठी फिल्मसिटी आहे.

नाव आहे रामोजी फिल्म सिटी.

दक्षिणेतल्या लोकांना सिनेमाचं वेड आपल्यापेक्षाही जरा जास्तच आहे हे  पाहिजे. तिकडचे सिनेमे देखील लार्जर दॅन लाईफ असतात. मोठमोठाले सेट, हवेत उडणाऱ्या गाड्या, तसेच धिप्पाड व्हिलन, फायटिंग, रोमान्स सगळंच अजबगजब असतं. या दक्षिणेतल्या सिनेमाला लार्जर दॅन लाईफ बनवते ती म्हणजे रामोजी फिल्मसिटी.

तब्बल दोन हजार एकर परिसरात पसरलेली ही फिल्मसिटी म्हणजे एका माणसाने पाहिलेलं स्वप्न आहे,

चेरूकुरी रामोजी राव यांनी पाहिलेलं हे स्वप्न 

रामोजीराव यांचा जन्म आंध्रप्रदेशमधल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शाळेत हुशार होते, मोठ्या शहरात जाऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नोकरी करायची नव्हती म्हणून छोटे मोठे उद्योग सुरु केले. प्रिया पिकल्स, चिटफंड वगैरे मध्ये त्यांना यश सुद्धा मिळालं. यानंतर त्यांनी पत्रकारितेत उतरायचं ठरवलं.

सगळं लहानपण छोट्याशा खेड्यातच गेल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या समस्या, शेतीतले प्रश्न त्यांना माहित होते. म्हणूनच त्यांनी शेतीविषयक पाक्षिक सुरु केलं. शेतकऱ्यांना सहज साध्या सोप्या भाषेत ज्ञान मिळवून देणारे हे पाक्षिक अगदी कमी काळातच सुपरहिट झाले.

याच्या यशानंतर त्यांनी सत्तरच्या दशकात विशाखापट्टणम येथे ईनाडू या वर्तमानपत्राची सुरवात केली.

त्याकाळी तेलगू भाषेत आंध्रप्रभा हे एकमेव मोठे वर्तमानपत्र होते. डळमळीत सुरवात करणाऱ्या ईनाडूने काही दिवसातच आंध्रप्रभाला धडक दिली. ऐंशीच्या दशकात प्रत्येक लहान मोठ्या शहरात ईनाडूच्या आवृत्त्या प्रकाशित होऊ लागल्या.

रामोजी राव प्रचंड महत्वाकांक्षी होते. त्यांनी १९८३ साली फिल्म कंपनी सुरु केली. उषाकिरण बॅनर खाली तेलगू सिनेमांची निर्मिती होऊ लागली. उषाकिरणने अनेक सुपरहिट सिनेमे बनवले. रामोजी राव यांना सिनेमाचं, लोकांच्या आवडीचं गणित नेमकं ओळखलं होतं. रामोजीराव यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणारे सिनेमे गाजत तर होतेच पण त्यांनी अनेक नव्या कलाकरांना संधी देखील दिली होती.

सुधाचंद्रन पासून ते आजच्या रितेश देशमुख, जेनेलिया डिसुझा यांच्यापर्यंत कित्येकजणांनी त्यांच्या बॅनरमधून सिनेमात डेब्यू केलं.

रामोजी राव एकदा अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी मोठमोठाले स्टुडिओ, फिल्मसिटी पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. ते भारतात परत आले तेव्हा त्यांच्या डोक्यात हेच विचार फिरत होते. तेलगू सिनेमाची हैद्राबाद हीच राजधानी होती. एकत्र हैद्राबाद किंवा चेन्नई येथे शूटिंग चालायचं, मात्र शूटिंग सुरु असताना बऱ्याच अडचणी यायच्या. अगदी कॉस्च्युम पासून ते एडिटिंग पर्यंत वेगवगेळ्या ठिकाणी फिरायला लागायचं.

याला वैतागून रामोजी राव यांनी ठरवलं की हैद्राबाद मध्ये फिल्मसिटी उभी करायची, साधुसुधी नाही तर जगातली सर्वात मोठी फिल्म सिटी.

नव्वदच्या दशकातला काळ. ग्लोबलायझेशनचे फायदे दिसू लागले होते. भारतात केबल टीव्हीचं आगमन झालं होतं. चकाचक सेट, पॉलिश्ड सिनेमा हि काळाची गरज होती. हि गरज भागवणारे स्टुडिओ फक्त मुंबईत होते. रजनीकांत, चिरंजीवी यांच्यासारख्या सुपरस्टारमुळे तेलगू तामिळ सिनेमा सुद्धा बॉलिवूडच्या तोडीस तोड कमाई करत होता. तो दिसायला देखील बॉलिवूड प्रमाणे असावा हि अपेक्षा असणे देखील साहजिक होतं.

रामोजीराव हे स्वतः फिल्म मेकर असल्यामुळे त्यांना फिल्मसिटी मध्ये काय लागेल आणि काय नाही याचा अंदाज होता. सगळं एका छताखाली आणायचा त्यांनी प्रयत्न केला.

सर्वात मोठा प्रश्न जागेचा होता. हैद्राबाद शहराच्या बाहेर नळगोंडा रोडवर त्यांना जमीन मिळाली. एकेकाळी हैद्राबादच्या नवाबाच्या खास सरदाराची ही जमीन होती. पण त्याच्या मृत्यूनंतर इनाम म्हणून त्याच्या कुळांना वाटण्यात आली होती.

मोठमोठाले दगड, खडकाळ जमीन, पाण्याचा अभाव यामुळे इथे शेती होत नव्हती. रामोजीराव यांनी अडीच हजार रुपये एकर या दराने शेतकऱ्यांच्या कडून हा सर्व परिसर विकत घेतला. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे बंगाली आर्ट डिरेक्टर नितीश रॉय यांना फिल्मसिटी उभी करण्याची जबाबदारी सोपवली.

नितीश रॉय यांनी जवळपास तीन वर्षे खपून रामोजी राव यांच्या स्वप्नातील मायानगरी निर्माण केली.

simg5c470c4ca6940

वेगवेगळ्या प्रकारचे ५०० सेट, १००च्यावर बागा, पन्नासच्यावर स्टुडिओ फ्लोअर, आऊटडोअर लोकेशन, हॉस्पिटल, मंदिर, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, खेडेगाव, शहर प्रत्येक गोष्ट तिथे उपलब्ध आहे. अगदी युरोपातील एखाद शहर हवं असेल तरी तेही इथं निर्माण करता येऊ शकतं.

रामोजीराव यांनी तेलगू, तामिळ, कन्नड, मल्ल्याळम, मराठी, हिंदी सगळ्या सिने निर्मात्यांना सांगितलेलं,

तुम्ही रामोजी फिल्मसिटीत येताना फक्त स्क्रिप्ट आणि हिरो हिरोईन घेऊन यायचं आणि जाताना अख्खा सिनेमा घेऊन जायचा.

सिनेमाच्या निर्मितीसाठी लागणारे एडिटिंग वगैरेच्या टेक्निकल लॅब्स, डबिंग स्टुडिओ, रेकॉर्डिंग स्टुडिओ, डिजिटल फिल्म निर्माणची सोय, कॉस्ट्यूम पासून ते मेकअप पर्यंत स्पॉटबॉय पासून ते कोरिओ ग्राफर पर्यंत प्रत्येक गोष्ट एका हाकेवर उपलब्ध आहे.

india ramoji film city in hyderabad 5

इथे एकावेळी तब्बल तीस चाळीस सिनेमांचं शूटिंग एकदम सुरु ठेवता येऊ शकतं.

या शिवाय कलाकारांना राहण्यासाठी दोन आलिशान हॉटेल, संपूर्ण रामोजी सिटीला एकदम जेवण पुरवता येईल असं सेंट्रल किचन बनवण्यात आलंय. सिनेमा बनवण्यासाठी लागणारी कोणती गोष्ट तिथे नाही असं नाही. फक्त सिनेमाचं नाही तर सिरीयल, डॉक्युमेंट्री, ऍड्स, हे सगळं रामोजी फिल्मसिटीत बनवण्याची सोय करण्यात आली.

हे सगळं एकीकडे चाललं होतं तेव्हा त्याच्याबरोबरच रामोजीराव आपले टीव्ही चॅनल्स सुरु करत होते. तेलगू पासून मराठी पर्यंत ईनाडू चॅनल सुरु झाले. भारताचा रुपर्ट मरडॉक म्हणून रामोजीराव यांना ओळखलं जाऊ लागलं. रामोजीचे साम्राज्य भारतभर पसरलं होतं.

पण त्यांचं पहिलं प्रेम फिल्मसिटी हीच राहिली. रामोजी फक्त फिल्मसिटीच ठेवली नाही तर तिचे पर्यटन क्षेत्र म्हणूनही रूपांतर केलं. शूटिंग लोकेशन्स, त्यांचे मोठे सेट सर्वसामान्य प्रेक्षकांना ही बघण्यासाठी खुले केले. त्यांचे तिथे मनोरंजन व्हावे म्हणून ऍडव्हेंचर गेम्स, ऍक्शन शो सारखे कार्यक्रम देखील दाखवले जाऊ लागले. स्थानिकांना रोजगार मिळाला.

रामोजीच्या भल्या मोठ्या गेट मधून आत गेल्यापासून संपूर्ण दोन हजार एकर चा परिसर फिरून दाखवण्यासाठी खास गाईड व बसेसची सुविधा करण्यात आली. हि आयडिया देखील तुफान यशस्वी ठरली. देशभरातुन हैद्राबादला येणारे पर्यटक वाट वाकडी करून रामोजी फिल्मसिटीतही गर्दी करू लागले. वर्षाकाठी इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या २० लाख इतकी आहे.

जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी म्हणून रामोजी फिल्मसिटी गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत जाऊन बसली.

एकेकाळी खडकाळ भूमी असलेला हा प्रदेश रामोजीनी अक्षरश पालटून टाकला. शेकडो प्रकारच्या बागा, कारंजे यांचे नयनरम्य सेट बघितल्यावर रामोजीफिल्म सिटीला मायानगरी का म्हणतात याचा प्रत्यय येतो.

Bahubali Set Tour Exclusively at Ramoji Film City

भारतातला सर्वात मेगा बजेट समजला जाणारा बाहुबली सिनेमा असो, रजनीकांतचा रोबोट असो किंवा ह्रितिक रोशनचा क्रिश हे सगळे सिनेमे रामोजी फिल्म सिटीतच बनलेत. आजवर दोन अडीच हजार सिनेमे येथे बनले आहेत. बाहुबली सारख्या सिनेमाचा सेट इथे अजूनही जपून ठेवण्यात आलाय.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही फिल्मसिटी उभारण्यात, तिला जागा मिळवून देण्यात, त्याचे भांडवल उभे करण्यात वगैरे कोणत्याही राजकारण्यांचा हात नाही. निवडणूक प्रचारासाठी तिचा वापर करावा असं कधी घडलं नाही.

रामोजीराव यांनी भारतातली सर्वात मोठी फिल्म सिटी उभी केली, आजही अनेक हिंदी सिनेमे इथे बनत असतात पण रामोजींनी आम्ही मुंबईची फिल्म इंडस्ट्री हैद्राबादला आणणार अशी घोषणा कधी केली नाही. हॉलिवूडच्याही तोंडात मारेल अशी हि मायानगरी त्यांनी कष्टाने उभी केली आहे आणि ती त्याच जोमात सुरु देखील आहे, कोणतंही राजकारण न करता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.