सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या नवाब फॅमिलीचा संपत्तीचा वाद ऐकला तर डोळे पांढरे होतील

वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हंटल कि त्याच्या वाटणीसाठी वारसदारांचे वाद काही नवीन नाही. हे वाद कधी- कधी इतक्या टोकाला जातात कि, कायद्याला यात डोकं घालावं  लागत. कारण जितकी मोठी प्रॉपर्टी तितके त्याचे वारसदार आणि तितके मोठे वाद. आता याच वादातून रामपूरचं नवाब घराणं जातंय. ज्यांच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेची सध्या वाटणी सुरु आहे. 

रामपूरमध्ये नवाब कुटुंबाची सुमारे सव्वीशे कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मालमत्ता आहे.  31 जुलै 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने शरियतनुसार या संपत्तीची वाटणी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा न्यायाधीशांकडे या वाटणीची जबाबदारी सोपविण्यात आली होती, ज्यांनी मालमत्तेचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन केल्यानंतर वाटणीची योजना सादर केली. यावर सर्वपक्षीयांकडून हरकती मागविण्यात आल्या. दरम्यान अजून  कोर्टाने निकाल देणं बाकी  आहे. 

आता वाटणी सुरू असलेल्या या नवाब घराण्याच्या संपत्ती  पाहायची झाली तर  नवाब घराण्याच्या पाच मोठ्या मालमत्ता आहेत.  त्यापैकी कोठी खासबाग ही सर्वात मोठी संपत्ती आहे.  युरोपियन इस्लामिक शैलीत बांधलेल्या या कोठीत सुमारे दोनशे खोल्या आहेत.  एक सिनेमा हॉल आणि एक म्यूझिक हॉल देखील आहे.

देशातील पहिली फुल्ली  एयरकंडीशनर कोठी आहे. जी बनवण्यासाठी परदेशातून इंजीनियर्स बोलवण्यात आले होते आणि गवंडींना त्यांच्या मजुरीच्या बदल्यात चांदीची नाणी दिली गेली.  नवाब कुटुंब या कोठीत राहत होते.

असं म्हणतात की, नवाब कुटुंब सोन्याच्या भांड्यांमध्ये जेवायचं आणि चांदीच्या बेडवर झोपायचं.

कोठी खासबागचे क्षेत्रफळ 430 एकर असून, कोठीच्या आजूबाजूला एक बाग आहे, ज्याची किंमत 1435 कोटी निश्चित करण्यात आली आहे.

 नवाबांची  दूसरी मोठी संपत्ती म्हणजे कोठी लक्खी बाग शाहबाद. या कोठीच्या नावामागची  इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या कोठीच्या आजूबाजूला बागा आहेत ज्यात एक लाख रोपे लावण्यात आलीत. त्यामुळे त्याचे नाव लक्खी बाग ठेवण्यात आलं. याची किंमत सुद्धा 721 कोटी आहे.   

याशिवाय कोठी बेनझीर, नवाब रेल्वे स्टेशन आणि कुंडा  ही सुद्धा नवाब कुटुंबाची संपत्ती आहे. त्यांची किंमत 432 कोटी एवढी आहे.  याशिवाय 64 कोटींहून अधिक स्थावर मालमत्ता आहे.  यामध्ये सुमारे एक हजार शस्त्रांचा समावेश आहे.

आता एवढी मोठी संपत्ती म्हंटल्यावर त्याचे वाटेकरी पण तितकेच आहेत. तर या  नवाब कुटुंबाच्या मालमत्तेत 18 जणं वाटेकरी आहेत, यातल्या दोघांचा मृत्यू झाला. पण, त्यांचा हिस्साही शरियतनुसार ठरलेला आहे.

म्हणजे वाटेकरी आणि त्यांचा हिस्सा पाहिला तर, माजी खासदार बेगम नूरबानो यांचा वाटा 2.250 टक्के, त्यांचा मुलगा नवाब काझिम अली खान उर्फ ​​नावेद मियाँ यांचा 7.874 टक्के, बेगम नूरबानो यांची मुलगी समन खान यांचा 3.937 टक्के आणि दुसरी मुलगी साबा दुरेज अहमद यांचा 3.937 टक्के वाटा आहे.  सबाचे पती दुरेज अहमद हे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिले आहेत, तर तिचे वडील फखरुद्दीन अली अहमद हे देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत.

याशिवाय तलत फातमा हसन 2.025 टक्के, गीझला मारिया अली खान 5.165 टक्के, नदीम अली खान 5.165 टक्के, सिराजुल हसन 4.051 टक्के, ब्रिजिश लका बेगम 8.999 टक्के, अख्तर लका बेगम 8.999 टक्के, नाहिद लका बेगम 8.99 टक्के, कमर लका बेगम 8.99 टक्के वाटा ठरवण्यात आला होता.

सोबतच, मुहम्मद अली खान उर्फ ​​मुराद मियाँ यांचा वाटा 8.101 टक्के आणि त्यांची बहीण निघत बी यांचा वाटा 4.051 टक्के आहे.  केसर जमानी बेगम आणि तलत जमानी बेगम यांचा मृत्यू झाला आहे.  या दोघांचा वाटा 4.167 टक्के इतका आहे.

पाकिस्तानचे माजी एअर चीफ मार्शल अब्दुल रहीम खान यांच्या पत्नी मेहरुन्निशा बेगम (87) या देखील वाटेकरी आहेत.  ती नवाब रझा अली खान यांची मुलगी आहे.  सुमारे तीनशे कोटींची कमाल संपत्ती त्यांच्या वाट्याला येत आहे.  प्रत्यक्षात त्यांचा वाटा 7.292 टक्के आहे, तर आई तलत जमानी बेगम यांचा वाटा 4.167 टक्के आहे.  त्याची आई वारली आहे.  पण त्यांचा वाटाही त्यांना मिळत आहे.  अशाप्रकारे 11.459 टक्के मालमत्ता त्यांच्या वाट्याला येत असून, ती तीनशे कोटींहून अधिक आहे.

आता या नवाब घराण्याच्या संपत्तीची हिस्सेदारी तर ठरवली गेली आहे, पण प्रत्यक्षात संपत्तीची वाटणी अजून बाकी आहे. यात नवनवीन वाद समोर येत आहे. त्यामुळे न्यायालयाची सुद्धा डोकेदुखी वाढलीये.

 

Leave A Reply

Your email address will not be published.