सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं, “गांधीजीनी पाहिलेला पहिला सिनेमा”.

दादासाहेब फाळकेंनी १९१३साली पहिला भारतीय सिनेमा बनवला “राजा हरिश्चंद्र”. भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. आपल्या लोकांना सिनेमाचं वेड लागण्याचा सुरवातीचा हा टप्पा.

याच काळात देशाच्या राजकीय पातळीवर सुद्धा काही महत्वाच्या घडामोडी घडत होत्या. मोहनदास करमचंद गांधी नावाचा महात्मा दक्षिण आफ्रिकेत इंग्लिश सत्तेला नाकी नऊ करून आता भारतात परत आला. साल होत १९१५.  गोपाळ कृष्ण गोखले या आपल्या राजकीय गुरूच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचा धडा गिरवण्यास सुरवात केली होती. देशाचा दौरा केला,

चंपारण्यच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर देशभर त्यांच गारुड निर्माण झालं आणि १९२० येता येता ते भारताचे सर्वोच्च नेते बनले होते.

दरम्यानच्या काळात चित्रपटसृष्टीनेसुद्धा बाळसं धरलं होतं. प्रभात स्टुडीओसारखे प्रयोग होऊ लागले. जागतिक स्तरावर भारतात सिनेमे तयार होतात याची चर्चा होऊ लागली. व्यक्त होण्याचं नवीन माध्यम मिळाल्याने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य अनुभवयाला मिळत होत. याच काळात इंग्रजाच्या जोखडापासून वेगळे होण्याचा लढा जोरात सुरु होता. याचा प्रभाव सिनेमा उद्योगावर पडणे सहाजिक होते.

कोल्हापूरच्या बाबुराव पेंटरनी आपल्या सिनेमामधून ब्रिटीश सरकारविरोधी संदेश दिल्याचा संशय घेऊन सरकारने सेन्सॉर बोर्ड स्थापन केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. पण सिनेमाची लोकप्रियता दुपटीने वाढत होती.

जन माणसावर मोहिनी असलेल्या या सिनेमाक्षेत्राचं का कुणास ठाऊक गांधीजीना वाकड होत.

सत्याग्रहाच्या धामधूमीत गांधीजींना सिनेमा बघण्यासाठी वेळ पण नव्हता आणि निम्मा वेळ ते जेल मध्येच असायचे. यामुळे सिनेमा हे माध्यम नेमक काय आहे याची माहिती घेणे त्यांच्या दृष्टीने त्याकाळात महत्वाचे नव्हते. सिनेमा म्हणजे त्यांच्यासाठी चैन होती आणि देशाला मुक्त करण्याच्यापुढे ही चैन कामाची नाही असेच त्यांच मत होत.

१९३१ साली भारतीय सिनेमा बोलू लागला. याच काळात सविनय कायदेभंगामुळे जगभरात भारतात सुरु असलेल्या या अहिंसक स्वातंत्र्यलढ्याची ओळख झाली. विशेषतः अमेरिकेत गांधी लोकप्रिय झाले. त्यांचा आवाज, त्यांचे व्हिडीओ तिथे पोहचले होते.

जगावर राज्य करणाऱ्या इंग्रज सत्तेविरुद्ध फक्त हातात मीठ उचलून लढा देणारा एक तोळामासाची प्रकृती असलेला अर्धनग्न माणूस आहे आणि करोडो लोक त्यांच अनुसरण करत होती.  हे सगळच भांडवलशाही अमेरिकेसाठी आश्चर्यकारक होत. पण तिथल्या लोकांना गांधीजींना चार्ली चप्लीन माहीत नाही याचं सगळ्यात जास्त आश्चर्य वाटायचं.

१९४३ साली विजय भट्ट यांच्या प्रकाश फिल्म कंपनीने शोभना समर्थ आणि प्रेम आदिब यांना घेऊन “रामराज्य” हा सिनेमा बनवला. रामायणावर आधारित हा सिनेमा लिहिला होता केनु देसाई यांनी. विजय भट्ट आणि त्यांचे वडील शंकर भट्ट हे सिनेमा इंडस्ट्री मध्ये पक्के मुरलेले होते. त्यांना या सिनेमाचं मार्केटिंग करायची एक आयडिया सुचली.

गांधीजी त्याकाळात मुंबईमध्ये नरोत्तम मोरारजी यांच्या बंगल्याच्या आउटहाउसमध्ये राहत होते. नुकतच त्यांना बळजबरीने मिशन टू मॉस्को हा सिनेमा दाखवण्यात आला होता. विजय भट्ट यांनी कनु देसाई यांना गांधीजींना रामराज्य बघण्यासाठी तयार करायला पाठवले.

गांधीजी नेहमी आपल्या भाषणात स्वातंत्र्यानंतर भारतात रामराज्य आणणार असण्याची इच्छा बोलून दाखवत. रामराज्य म्हणजे सर्वजन सुखी आणि संपन्न आहेत असे राज्य अशी त्यांच्या लेखी व्याख्या होती. या त्यांच्या लाडक्या रामराज्यावर  बनवलेल्या सिनेमाला पाहण्याची गळ गांधीजींना कनु देसाईंनी घातली. गांधीजी तयार झाले. इंग्रजी सिनेमा पाहून केलेल्या चुकीचा उतारा म्हणून ते रामराज्य पाहण्यासाठी तयार झाले.

२ जून १९४४ ला विजय भट्टनी सगळी तयारी केली आणि गांधीजींना सिनेमा पाहण्यासाठी बसवण्यात आलं.

जवळपास चाळीस मिनिटे सिनेमा बघितल्यावर गांधीजी मधूनच उठले आणि सिनेमा निम्म्यात सोडून निघून गेले. विजय भट्ट यांची पंचाईत झाली. आता काय करायचे? तरी गुजराती धंदेवाईक डोकं. त्यांनी हार मानली नाही. सिनेमाचं त्यांनी जोरदार प्रमोशन केलं.

“गांधीजीनी पाहिलेला पहिला सिनेमा”

खर तर गांधीजीनी यापूर्वी मिशन टू मॉस्को हा सिनेमा बघितला होता आणि शिवाय गांधीजींच्या मते रामराज्य हा खूप भडक चित्रीकरण असलेला आरडाओरडा असलेला सिनेमा होता. पण विजय भट्टनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी गांधीजींचा जोरदार वापर केला. गांधीजीनी बघितलेला पहिला भारतीय सिनेमा म्हणून त्याच कौतुक सुद्धा झालं.

पुढ कधीतरी कोणी विजय भट्टना खरं काय झालं होत हे विचारलं. तेव्हा ते म्हणाले,

“त्यादिवशी गांधीजी मौनव्रतात होते त्यामुळे काही बोलले नाहीत. सिनेमापाहून उठताना मला तरी ते खुश वाटले. “

या रामराज्यने काय जादू केली काय माहित पण त्यानंतर गांधीजीनी एकही सिनेमा पहिला नाही. त्यांच्या जीवनकथेने पुढे शेकडो सिनेमाना कथासूत्र पुरवले.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.