७२ वर्षांपूर्वी या माणसानं घेतलेल्या कष्टामुळे मोदी-शहा आज आसाममध्ये पाय रोवू शकले.
२०१६ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर सध्याच्या कलांनुसार भाजप आसाममध्ये पुन्हा एकदा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे. ७६ जागांच बहुमत असलेल्या विधानसभेत भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस आघाडी २५ जागांवर. त्यामुळे हा कल असाच राहिला तर भाजप सत्तेत येणार हे उघड सत्य आहे.
सध्याच्या स्थितीत या यशामागे अनेक कारण सांगितली जातं आहेत. यात नरेंद्र मोदींचा करिष्मा, पक्षाचे राजकीय रणनिती बनवणाऱ्या अमित शहा यांची चाणक्य नीती, आणि त्यासोबतच मुख्यमंत्री राहिलेल्या सर्बानंद सोनोवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून ५ वर्ष केलेलं काम.
पण ही एवढीच कारण पुरेशी आहेत का? तर अजिबात नाहीत. या साऱ्या गोष्टींच्या देखील आधी, म्हणजे किती? तर तब्बल ७२ वर्ष आधी. ज्यावेळी नरेंद्र मोदी, अमित शहा, सर्बानंद सोनोवाल, हेमंत सरमा यापैकी कोणाचा जन्म पण नव्हतं, त्यावेळी एका माणसानं घेतलेल्या कष्टामुळे आज मोदी-शहा आसाममध्ये पाय रोवू शकले आहेत.
रामसिंह ठाकूर.
ईशान्येकडील राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास चालू होतो १९४६ साली. त्यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये दादाराव परमार्थ, वसंतराव ओक आणि कृष्ण परांजपे या तिघांची पहिल्यांदा आसाममध्ये एंट्री झाली. गुवाहाटी, दिब्रुगढ, शिलॉंग या भागात ईशान्येकडच्या पहिल्या संघाचं काम सुरु केलं. त्यांनी त्यावेळी संघात आणलेले लोक दररोज एकत्र यायचे.
१९४८ साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर बंदी घातली, त्यामुळे काही काळ काम थांबलं होतं.
पण त्यानंतर वर्षभरातच बंदी उठवल्यानंतर तत्कालीन दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी मूळच्या हिमाचल प्रदेशचे असलेले रामसिंह ठाकूर यांना संघटनेचे पहिले प्रांत प्रचारक म्हणून आसामला पाठवलं.
त्यानंतर २ वर्षांनी महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून प्रचारकांना तिथं पाठवलं. ठाकुरांनी या सगळ्यांना हाताला धरत आसाममध्ये संघाला रुजवायला सुरुवात केली. नवीन स्वयंसेवक तयार करायला सुरुवात केली. त्याचवेळी १९५० सालच्या आलेल्या भूकंपादरम्यान संघानं बचाव कार्यात भाग घेतला. त्या दरम्यान संघानं आणि स्वयंसेवकांनी विविध संस्थांशी संबंध जोडले. राज्यातील जनतेमध्ये आपलं अस्तित्व दाखवला सुरुवात केली.
अगदी थोड्या दिवसातच ठाकूर यांनी आसामी भाषा, लिहायला, बोलायला आणि वाचयला शिकून घेतली.
त्यानंतर १९६० च्या दशकातली विमल प्रसाद चालिहा यांच्या काँग्रेस सरकारनं असमियाला राज्याची एकमेव अधिकृत भाषा घोषित करण्यासाठी एक विधेयक आणण्यासंबंधीचा विचार बोलून दाखवला. मात्र एवढं ऐकूनच बहुसंख्य असलेल्या असमिया आणि अल्पसंख्यांक असलेल्या बंगालींच्या मते, मोठ्या प्रमाणावर हिंसा सुरु झाली.
जवळपास ५० हजार बंगाली भाषिकांनी पश्चिम बंगालमध्ये पलायन केलं, तर ९० हजार बराक खोऱ्यात आणि पूर्वेत्तरमध्ये जाऊन वसले. तिथल्या तीन जिल्ह्यांमध्ये त्यांनी एक वर्ष या विरोधात प्रदर्शन सुरु ठेवलं. या आंदोलनादरम्यान ठाकूर यांनी संघाला तटस्थ ठेवलं नाही, तर असमिया आणि बंगाली भाषिक जनतेमध्ये वाढलेली दरी भरण्याचं काम हाती घेतलं.
यात एकत्र सभा घेणं, छोटे मेळावे भरवणं असे कार्यक्रम सुरु केले.
१९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धा दरम्यान बिगर आसामी लोक आसाममधून पळून जात देशाच्या अन्य भागात जाऊन सुरक्षित स्थान शोधू लागले.त्यावेळी ठाकूर यांनी पुढे यात स्वयंसेवकांना हाताशी धरून जेष्ठ प्रचारक एकनाथ रानडे यांच्या सोबत चीनशी लढण्यासाठी योजना आखली.
पण नेमकं त्याच दरम्यान एका रस्ते अपघातामध्ये त्यांचा डावा पाय गंभीररित्या जखमी झाला, मात्र पुढच्या काहीच दिवसात ते पुन्हा उभे राहिले.
१९५० आणि ६० च्या दशकात, सातत्यानं सत्तेत येणाऱ्या काँग्रेसने अनेक बंगाली मुस्लिमांना ते पूर्व पाकिस्तानमधील अवैध घुसखोर असल्याचं सांगत बाहेर काढायला सुरुवात केली. केवळ बांगलादेश निर्मितीच्याच वेळी हा मुद्दा होता असं नाही, त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर देखील निर्वासीतांचा प्रश्न गंभीर होता. असं म्हंटलं जायचं की, भूकबळी पासून वाचण्यासाठी ते मोठ्या संख्येनं आसाममध्ये दाखल व्हायचे.
१९७० च्या उत्तरार्धमध्ये बांगलादेश घुसखोरांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं, “ऑल आसाम स्टूडंट्स यूनियन” याचं नेतृत्व करतं होता. संघानं ही संधी ओळखत आपल्या मर्यादा वाढवायच्या ठरवल्या. स्थानिक लोकांशी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आणि डाव्यांच्या उदयाला थांबवण्यासाठी आंदोलनाच समर्थन करण्याचा निर्णय घेतला.
संघ देखील यात दाखल झाला. आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्या स्वयंसेवकांना कामाला लावलं.
या जवळपास २० ते २१ वर्षात आसाम आणि एकूणच पूर्वेत्तर राज्यात बस्तान बसवल्यानंतर ठाकूर यांना १९७१ साली पंजाबचा सह-प्रांत प्रचारक म्हणून नियुक्त केलं गेलं. मात्र त्यांच्या नंतर देखील त्यांनी संघासाठी आसाममध्ये घेतलेले कष्ट दिसत होते.
१९७५ पर्यंत आसामच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात संघाची एक शाखा सुरु झाली होती.
ज्यामुळे एक प्रकारे भाजपला विस्तारण्यास देखील मोठी मदत झाली.
आसाम निवडणुक संदर्भातील काही तज्ञांच्या लेखानुसार,
१९९० च्या दशकातील राम जन्मभूमी आंदोलन आणि रथयात्रा हा काळ राज्यात संघ आणि भाजपसाठी विकसित होण्याचं आणखी एक पाऊल ठरलं. आंदोलनादरम्यान लोकांमध्ये ‘हिंदू’ ही संकल्पना अधिक तीव्रतेनं रुजायला सुरुवात झाली. त्याच दरम्यानच्या काळात म्हणजे १९९१ साली झालेल्या राज्य विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका भाजपनं लढवल्या.
त्यात भाजपनं पहिल्याच फटक्यात विधानसभेत १० जागा जिंकल्या, त्यातील ९ जागा या बराक खोऱ्यातील होत्या. तेच बराक खोरं जिथं संघानं असमिया आणि बंगाली भाषिक जनतेमध्ये वाढलेली दरी भरण्याचं काम हाती घेतलं होतं. सोबतच लोकसभेच्या देखील २ जागा जिंकल्या.
त्यानंतरच्या काळात भाजप आणि संघानं वैष्णव मठांसोबत आपला संपर्क वाढवत, २००१ आणि २००६ सालच्या निवडणुकांमध्ये आसाम आणि ब्रम्हपुत्रा खोऱ्यातील जागा काँग्रेसकडून घेतल्या. २०११ साली भाजप बराक खोऱ्यात पराभूत झाली, पण अन्य भागात ५ जागा जिंकल्या. याच गतीनं विस्तार करत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील १४ पैकी ७ जागा देखील जिंकल्या.
आणि अखेरीस २०१६ ला भाजप तिथं पहिल्यांदा सत्तेत देखील आली. सध्याच्या कलांनुसार भाजप पुन्हा आसाम जिंकण्याच्या मार्गावर आहे. ७६ जागांच बहुमत असलेल्या विधानसभेत भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस आघाडी २५ जागांवर.
त्यामुळे रामसिंह ठाकूर यांनी १९४९ पासून घेतलेल्या कष्टामुळे आता भाजप दुसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. आजही आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तब्बल ८१३ च्या आसपास शाखा आहेत.
हे हि वाच भिडू.
- भाजपसाठी आसाममधला मुख्य शत्रू काँग्रेस नाही तर हा माणूस आहे..
- फक्त पेटलेला पंजाबच नाही तर आसाम, मिझोराम शांत करण्याचं श्रेय राम प्रधान यांनां जातं.
- संजय गांधींचा मृत्यू झाला होता आणि इंदिरा गांधी आसामचा प्रश्न सोडवत होत्या