गुजरात फाईल्स समोर आणणाऱ्या “राणा अय्युब” यांचा हा इतिहास माहित आहे का..?

तुम्हाला एखाद्या महत्वाच्या कामासाठी देशाच्या बाहेर जायचंय. सगळी तयारी तुम्ही केलीये आणि विमानतळावर पोहोचलाय. विमान येणारच आहे आणि ऐनवेळी तुम्हाला कळतंय की, तुम्ही देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही कारण तुमच्यामागे सरकारी अधिकारी लागलेत. कसं वाटेल? याचं उत्तर सध्या तरी ‘राणा अय्युब’ नीट देऊ शकतील.

पत्रकार राणा अय्युब यांना काल २९ मार्चला लंडनला जाणाऱ्या विमानात बसण्यापासून मुंबई विमानतळावर थांबवण्यात आलं. ईडीने त्यांच्यासाठी लुकआउट नोटीस जारी केल्यामुळे त्यांना परदेशात जाण्यापासून थांबवल्याचं सांगण्यात येतंय. मात्र याच घटनेवरून खूप मोठा गोंधळ सुरु झालाय. कारण हे प्रकरण दिसतं तितकं सरळ नाहीये. म्हणूनच…

नक्की काय झालंय? या पत्रकाराच्या मागे ईडी का लागलीये? शिवाय ज्यांना थांबवल्याने वातावरण तापलंय त्या राणा अय्युब नक्की कोण आहेत? हे जाणून घेऊया…

सध्या काय झालंय? 

राणा अय्युब यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना १ एप्रिलला लंडनमध्ये एका कार्यक्रमाला हजर राहायचं होतं. तिथे मोठमोठ्या दिग्गजांच्या उपस्थितीत त्यामहिला पत्रकारांवरील ऑनलाइन हिंसाचार’ या विषयावर बोलणार होत्या. त्यानंतर ६ आणि ७ एप्रिलला त्या इंटरनॅशनल जर्नालिझम फेस्टिव्हल नावाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इटलीला जाणार होत्या. 

या सगळ्या कार्यक्रमाचा तपशील त्यांनी तीन आठवड्यांपूर्वीच त्यांच्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यानुसार २९ मार्चला त्या मुंबई विमानतळावर पोहोचल्या. दुपारी ३ वाजता त्यांची फ्लाईट होती. मात्र इमिग्रेशनचे लोक पार गोंधळले होते आणि अचानक २ वाजता त्यांना ईडीच्या समन्सचा मेल आला. १ एप्रिलला त्यांना ईडीच्या तपासासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

कोणत्या प्रकारणा संदर्भात राणा अय्युब यांना ईडीने समन्स दिलंय?

फेब्रुवारीमधील मीडिया रिपोर्ट्सनुसार ईडीने ‘मनी-लाँड्रिंग तपासणी’ संदर्भात अय्युबच्या बँक ठेवींपैकी १.७७ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जप्त केली आहे. कोणत्या प्रकरणाअंतर्गत? तर कोरोना काळात अडचणीत आलेल्या लोकांना मदत व्हावी म्हणून अय्युब यांनी अन्न आणि इतर मदत देण्यासाठी निधी उभारणी मोहीम सुरू होती. ज्यात त्यांनी कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 

सप्टेंबरमध्ये, हिंदू आयटी सेल नावाच्या हिंदुत्व गटाने अय्युब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती की त्यांनी चॅरिटीच्या नावावर ‘केट्टो’ या ऑनलाइन निधी उभारणी प्लॅटफॉर्मद्वारे बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले होते. शिवाय कोणत्याही सरकारी परवानगीशिवाय परदेशी निधी त्यांना मिळाल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला होता.

एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं होतं की, अय्युब यांनी केट्टोवर जवळपास २ कोटी ६९ लाख ४४ हजार ६८० रुपये जमा केले. मात्र ही रक्कम त्यांनी स्वतःसाठी वापरली मदत कार्यासाठी वापरली नाही. ही बाब बेकायदेशीर असून याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली होती. त्याआधारे ईडी आणि आयकर विभाग यांच्याकडून चौकशी सुरू असून राणा अय्यूब यांच्या आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी करण्यात येतीये.

मात्र यावर अय्युब यांचं म्हणणं आहे की हे आरोप पूर्णपणे निराधार, अविश्वासू आणि रेकॉर्डद्वारे खोटे सिद्ध होतात. त्यांनी आधीच सर्व संबंधित कागदपत्रे ईडीकडे जमा केलीये. शिवाय त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली होती, ज्याचं उत्तर देण्यासाठी त्यांना एका महिन्याचा कालावधी सुद्धा देण्यात आला होता. शिवाय त्यांनी हे देखील सांगितलंय की, त्यांना कोणतंही परदेशी योगदान मिळालेलं नाहीये.

इतकी मोठी कॉंट्रोव्हर्सी निर्माण करणाऱ्या या राणा अय्युब यांची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेच आहे. 

कोण आहेत राणा अय्युब? 

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राणा अय्युब या पत्रकार आहेत. मात्र साध्यासुध्या नाही तर चांगल्याच प्रसिद्ध पत्रकार आहेत. जरा सुरुवातीपासून पाहूया…

१९८४ चा जम्मू-काश्मीरचा त्यांचा जन्म. श्रीनगरमध्ये त्यांनी शाळेचं शिक्षण पूर्ण केलं आणि दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया कॉलेजमधून ‘सोशल कम्युनिकेशन्स अँड मीडिया’मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यांनी पत्रकारितेच्या करिअरची सुरुवात दिल्लीच्या ‘तेहलका’ मासिकापसून केली. तेहलकामध्ये, राणा एक शोध पत्रकार म्हणून काम करत होत्या. राणा अय्युब यांनी गुजरातचे राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आणि २००२ च्या गुजरात दंगलींबाबत कोणतंही संभाव्य कव्हरअप उघड करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला होता. 

मात्र त्यांचे ते रिपोर्ट्स छापण्यास तेहलकाने नकार दिला. तेव्हा निराश न होता त्यांनी त्यांच्या या शोधांना ‘गुजरात फाईल्स’ या पुस्तकाचं स्वरूप दिलं. राणा यांनी अनेकदा भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. २०१० मध्ये नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी अमित शहा यांना अनेक महिने तुरुंगात पाठवण्यामागे राणा अय्युबने यांच्या रिपोर्ट्सचा हातभार होता. 

नोव्हेंबर २०१३ मध्ये तहलकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्या एका पत्रकार सहकाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला होता. तेव्हा तेजपाल यांच्यावरील आरोप संस्थेने हाताळल्याच्या निषेधार्थ राणा अय्युब यांनी तहलकाचा राजीनामा दिला. आणि तेव्हापासून त्या स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करतायेत.

सप्टेंबर २०१९ मध्ये, त्यांची वॉशिंग्टन पोस्टच्या ग्लोबल ओपिनियन विभागासाठी काँट्रीब्युटिंग रायटर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर, ऑक्टोबर २०२० मध्ये, हार्पर कॉलिन्स इंडियाने FTII च्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या वादग्रस्त निवडीला उत्तर म्हणून अय्युब यांनी लिहिलेलं एक खुलं पत्र प्रसिद्ध केले होतं.

राणा अय्युब यांच्या अशा बेधडक कार्यामुळे त्यांना २०१८ मध्ये ट्विटरवर जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. त्यांनी या संदर्भात पोलिसात एफआयआर दाखल केली होती पण गुन्हेगाराचा शोध न लागल्याने केस बंद करण्यात आली होती. 

त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याला अनेकांनी नोटीस केलेलं आहे. ज्यामुळे अनके पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

२००२ मध्ये राणा अय्युब यांना ‘मोस्ट रेजिलिएंट जर्नलिस्ट’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. निर्भीड पत्रकारितेसाठी त्यांना ‘मॅकगिल पदक’ही मिळालंय. यात २०२० मध्ये, त्यांना यूएसएच्या मुस्लिम पब्लिक अफेयर्स कौन्सिलचा ‘व्हॉईस ऑफ करेज अँड कॉन्शियसनेस अवॉर्डने’ देखील सन्मानित करण्यात आलंय. टाईम मॅगझीनने दहा जागतिक पत्रकारांमध्ये त्यांचं नाव देखील दिलं आहे, ज्यांना त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका असल्याच्या धमक्या मिळाल्यायेत. याव्यतिरिक्तही अनेक पुरस्कार त्यांनी त्यांच्या नावावर केलेत. 

 गुजरात फाईल्स : अनाटॉमी ऑफ अ कव्हरअप 

राणा अय्युब यांच्या करिअरमधील त्यांचं हे पुस्तक खूप महत्वाचं मानलं जातं. नुकतंच हे पुस्तक पुन्हा चर्चेत आलं ते ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे. काश्मीर फाईल्स चित्रपटावरून जो काय राडा झाला होता तो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्या दरम्यान ‘गुजरात फाईल्स पुस्तकावर जर चित्रपट काढला तर नरेंद्र मोदी सरकारचे अनेक चेहरे उघडे पडतील’,  असा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला होता.

अय्युब यांनी गुजरातमधील अनेक नोकरशहा आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या लपून रेकॉर्डिंग केल्या होत्या. या स्टिंग ऑपरेशन दरम्यान अय्युब ‘मैथिली त्यागी’ ही हिंदू मुलगी म्हणून वावरल्या होत्या. २००२ नंतरच्या गुजरात दंगली आणि पोलीस चकमकीत झालेल्या हत्येबद्दल नोकरशहा आणि पोलीस अधिकारी यांचं मत उघड करण्यासाठी हे स्टिंग करण्यात आलं होतं. ज्याचं शब्दशः लिखाण करून त्यांनी त्याला पुस्तकाचं रूप दिलं होतं. 

त्यांचं हे पुस्तक खूप गाजलं होतं आणि त्याने त्यांना नवीन ओळखही दिलीये. अनेकांनी या पुस्तकाचं कौतुक केलं आणि वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद देत यशाच्या शिखरावर पोहोचवलं. आजही त्यांच्या या पुस्तकाला अनेक जण अभ्यासाच्या दृष्टीने हाताळतात. 

अशा राणा अय्युब यांच्यावर सध्या ईडीचं सावट आहे. याच प्रकरणसंदर्भात राणा अय्युब यांना आता तपासणीसाठी समन्स ईडीने पाठवला आहे. ज्यामुळे त्यांना बरोबर १ तास अगोदर फ्लाईटमध्ये चढण्यापासून थांबवण्यात आलंय. मात्र यावरून खूप गोंधळ निर्माण झालाय. अनेक अंतरराष्ट्रीय पत्रकारांनी देखील यावर खडबडून टीका केलीये. 

केंद्रातील सरकाराविरोधात त्यांचं बेधडक बोलणं आणि गुजरात फाईल्स पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दाम केलं जात असल्याचंही बोललं जातंय. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.