ज्याच्यामुळे नवनीत राणा गोत्यात येवू शकतात तो युसूफ लकडावाला कोण होता..?

सध्या राज्यात एकच प्रकरण सुरु आहे. ‘राणा प्रकरण’. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी जेव्हापासून मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली तेव्हापासून सगळा  गोंधळ सुरु झाला होता. मग काय…

राणा दांपत्याचं मुंबई आगमन, त्यांची अटक, नंतर त्यांचे पोलिसांवरील आरोप, आणि दरम्यान राजकीय नेत्यांचे वक्तव्य असा सगळा गोंधळ महाराष्ट्रात सध्या दिसतोय.

आता यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एंट्री घेत नवीनच पात्र आणलंय. ते म्हणजे ‘युसूफ लकडावाला’

संजय राऊत राणा दांपत्यावर आरोप करत म्हणाले आहेत की…

“मुंबईतील वातावरण बिघडवण्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. गेल्या १५ दिवसांत जे घडतंय त्यामागे डी गँगचा पैसा लागला आहे. डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाशी राणांचे संबंध असल्याचा एक छोटासा पुरावा समोर आला आहे. हे पैसे का घेतले? घेतलेल्या पैशांचा वापर राणा दांपत्यानं कुठं केला? हा तपासाचा भाग आहे.” 

 

संजय राऊत यांच्या आरोपानंतर आता राणा दांपत्यावर नवीन संकट येण्याची चिन्ह आहेत. सोबतच…

“हा लकडावाला आधी ईओडब्ल्यूच्याच कस्टडीत होता. मग तो ईडीच्या ताब्यात गेला. मग याची चौकशी का झाली नाही?”

असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.

म्हणूनच ज्या व्यक्तीमुळे आता पुढील गोंधळात भर पडण्याची शक्यता आहे,

तो युसूफ लकडावाला नक्की कोण? हे जाणून घेणं गरजेचं आहे.  

मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत जगजाहीर होती. या अधोविश्वात अनेक गैरव्यवहार, टोळीयुद्ध, गोळीबार, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, जीवितहानी घडायची पण अंडर वर्ल्डवर शेवटी मुंबई पोलिसांनी आपला वचक बसवला आणि बेफाम वाढत चाललेल्या अंडरवर्ल्डला लगाम घातला. पण त्यावेळी…

डी गॅंगला आर्थिक पाठबळ देणारी एक व्यक्ती होती ती म्हणजे युसूफ लकडावाला

युसूफ लकडावाला हा बॉलिवूडमधला नावाजलेला निर्माता होता. १९९२ साली आलेल्या संजय दत्तच्या एल्गार सिनेमाचा तो निर्माता होता. अंडर वर्ल्ड त्या वेळी ऐन भरात होतं, बॉलिवुडवर अंडरवर्ल्डचं राज्य सुरु झालं होतं. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांना अंडरवर्ल्ड पैसा पुरवू लागलं होतं. यात आघाडीवर होती डी गॅंग. डी गँगने बॉलिवूडमध्ये आपले हातपाय पसरायला सुरवात केली होती. 

युसूफ लकडावालाच्या ओळखीपाळखी जास्त होत्या आणि तो बॉलिवूडमध्ये प्रत्येकाला माहिती होता. संजय दतच्या करियरमध्ये युसूफ लकडावाला हा देवदूत बनून आला होता.

१९९२ साली एल्गार सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त चांगलाच फेमस झाला होता. निर्माता युसुफ लकडावालाने या सिनेमाच्या यशातून भरपूर पैसा मिळवला होता आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

युसूफ लकडावाला हा बॉलिवूडमध्ये जरी ऍक्टिव्ह असला तरी त्याचे अंडरवर्ल्डसोबत संबंध होते. डी गँगचा तो महत्वाचा माणूस तर होताच शिवाय डी गॅंगला फायनान्स सुद्धा तोच पुरवायचा. अंडरवर्ल्डच्या कारवायांमुळे सिनेमे याच युसूफ लकडावालाच्या पैशाने प्रोड्युस झले होते पण जेव्हा बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डने प्रवेश केल्याचं लक्षात आलं हे सिनेमे थांबवण्यात आले होते.

युसूफ लकडावाला हा बिल्डरसुद्धा होता. प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना २०१० मध्ये सांताक्रुज येथील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी साधना यांनी युसूफ लकडावाला विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र न्यायालयाने याप्रकरणी लकडावालाची निर्दोष सुटका केली होती. 

पुणे जिल्ह्यातील खंडाळामधील मनी लॉन्डरिंग प्रकरणात युसूफ लकडावाला अडकला होता. ५० कोटिंची जमीन खरेदी करताना सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट्स आणि इतर आरोपींना सुमारे ११.५ कोटी रुपयांची लाच देण्याचा युसूफ लकडावाला याच्यावर आरोप होता.

२०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या युसूफ लकडावालाला अटक करण्यात झाली होती.

१२ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली होती. ईडी सुद्धा युसूफ लकडावालाच्या मागे हात धुवून लागलेली होती.   

अशा अनेक आरोपांखाली आर्थर तुरुंगात युसूफ लकडावालाला डांबण्यात आलं होतं. पण पोलिसांनी युसूफ लकडावालाला जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला. डी गॅंग आणि बॉलिवूडचा तो महत्वाचा माणूस होता. डी गॅंगचा विश्वासू फायनान्सर म्हणून युसूफ लकडावालाचा बोलबाला होता.

या युसुफचा आता मृत्यूनंतर देखील बोलबाला सुरु होणार असं दिसतंय. म्हणून याचा प्रभाव नक्की राणा दांपत्यावर कसा होणार? हे येणारा काळच सांगेल…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.