जुहूचे रणदिवे २५ अब्ज रुपये खर्च करून अमेरिकन बास्केटबॉल टीमचे मालक कसे बनले ?

भारतीयांची हुशारी जगभरात दोनच कारणांसाठी ओळखली जाते. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं म्हणजे आयटी. सचिन, कोहली,सेहवाग जसे क्रिकेटवर राज्य करतात तसे आपली आयटी जनता अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली वर राज्य करते. म्हणजे गुगलच्या सुंदर पिचई पासून मायक्रोसॉफ्टच्या  सत्या नाडेलापर्यंत अनेक भारतीय या अमेरिकन कंपन्यांना काबीज करून आहेत.

असाच एक आयटीचा राजा आहे जो अमेरिकेच्या बास्केटबॉल वर देखील राज्य करतो.

नाव विवेक यशवंत रणदिवे. मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर, १९५७ रोजी झाला. मुंबईच्या जुहूमध्ये त्यांचे बालपण गेले. तीन भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. भारतीय कम्युनिस्ट नेते बाळकृष्ण त्र्यंबक रणदिवे आणि अहिल्या रांगणेकर यांचे ते पुतणे होते. घरची परिस्थिती चांगली होती.

त्यांचे शिक्षण बाबुलनाथ येथील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.लहानपणापासून प्रचंड हुशार होते मात्र समुद्र किनाऱ्या लगत त्यांचं घर असल्यामुळे खेळायची, खोड्या काढायची एकूण ऍडव्हेंचरची भयंकर आवड होती. अर्थातच क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता आणि गावस्कर लाडका खेळाडू.

एकदा शाळेत असतानाच त्यांना रेडिओवर निल आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला याची लाईव्ह कॉमेंट्री ऐकवण्यात आली. ते ऐकून विवेक रणदिवे प्रचंड इम्प्रेस झाले. विज्ञानाची नवी दुनिया त्यांच्यासाठी खुली झाली होती. हे सायन्स शिकण्यासाठी आपण देखील अमेरिकेला असं त्यांनी बारा वर्षाचा असतानाच ठरवून टाकलं टाकलं.

आणि तिथून त्यांचं आयुष्य बदलून गेलं.

झपाटल्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला, अमेरिकेला जाण्याची माहिती काढली, त्यासाठी काय काय करावे लागते त्या दृष्टीने प्रयत्न केले. आणि वयाच्या  १६ व्या वर्षी त्यांना ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ म्हणजेच ‘एमआयटी’ या जगप्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश घेतला.

पुढे ‘एमआयटी’मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनीरिंगची डिग्री पूर्ण केली. तिथे शिकत असतानाच विवेक रणदिवे यांनी ‘युनिक्स कन्सल्टिंग कंपनी’ नावाची फर्म सुरू केली. तेव्हा ते फक्त १७ वर्षांचे होते. आपल्या क्लास मध्ये जिनियस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणदिवेंनी कॉलेज आणि आपला बिझनेस अगदी व्यवस्थित रित्या सांभाळलं. 

एमआयटीमधून पास आउट झाल्यावर त्यांनी ‘हार्वर्ड’ विद्यापीठात प्रवेश घेतला व तिथे ‘एमबीए’ची पदवी घेतली.

या दोन दिग्गज विद्यापीठांची डिग्री नावावर लागल्यावर त्यांच्या साठी अमेरिकेतील सर्वोत्तम कंपन्यांचे जॉब ऑर येऊ लागले. त्यांनी काही काळफोर्ड मोटर्स, लिंकबिट, फॉर्च्युन सिस्टम्समध्ये फिल्ड इंजिनियर व मॅनेजर या पदावर काम केलं.

अखेर १९८५ मध्ये त्यांनी स्वतःची ‘टेक्नेक्रोन सॉफ्टवेअर सिस्टिम’ नावाची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

या कंपनी तर्फे रिअल टाईम डेटाचा उपयोग करून घेत वॉल स्ट्रीटला डिजिटलाईज करण्याच्या प्रक्रियेचा ते अविभाज्य भाग होते. त्यांच्या या तंत्रज्ञानामुळे शेअर बाजाराची काम करण्याची पद्धत अमूलाग्रपणे बदलली. 

१९९७ साली त्यांनी टिबको सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. हि कंपनी उभारणीसाठी त्यांना ‘सिस्को सिस्टिम’ आणि ‘रॉयटर्स’ने भांडवल उभं करून दिलं. पहिल्याच वर्षी मायक्रॉफ्ट कंपनीच्या पुश टेक्नॉलॉजीमध्ये पार्टनर बनण्याची त्यांना संधी मिळाली.

१९९९ साली त्यांचा स्टॉक पब्लिक साठी खुला करण्यात आला. नॉस्डेक शेअर बाजारात एका दिवसात त्यांची किंमत दुप्पट झाली. पुढच्या एका वर्षात कंपनीचा शेअर २२ डॉलर वरून २२३ डॉलर जाऊन पोहचला. हा त्याकाळचा रेकॉर्ड होता. 

दोन हजार सालच्या डॉट कॉम बबलच्या वादळातही विवेक रणदिवे यांची टिबको कंपनी सर्वहाईव्ह झाली, इतकंच नाही तर सॉफ्टवेअर उद्योग क्षेत्रात आपली अशी एक खास ओळख निर्माण केली. वोडाफोन, डेल्टा एअर, लुफ्तान्झा, भारताचे रिलायन्स अशा मोठ्या कंपन्यांची कामे त्यांना मिळाली. एका पाठोपाठ एक मैलाचे दगड पार करत ही अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक झाली.

 विवेक रणदिवे यांचं नाव मल्टिबिलिनियरच्या यादीत झळकू लागलं.

पण त्यांचा आणि बास्केटबॉलचा संबंध एका अपघातानेच आला.

अमेरिकेत बास्केट बॉल प्रचंड प्रसिद्ध आहे. तिथली एनबीए म्हणजेच नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची लीग आपल्या आयपीएलपेक्षाही कित्येक पटीने अधिक फेमस आहे. मायकल जॉर्डन, कोबे ब्रायन, शकिल ओ निल सारखे सुपरस्टार या लीग मधूनच मोठे झाले आहेत.

विवेक रणदिवे यांची मुलगी शाळेमध्ये असताना तिला बास्केटबॉलची आवड निर्माण झाली. ती बऱ्याचदा वडिलांना मला बास्केटबॉल शिकवा म्हणून हट्ट करायची. रणदिवे तर यापूर्वी कधी बास्केटबॉल खेळले नव्हते. पण त्यांनी आपलं गणिती डोकं तिच्या कोचिंग मध्ये लावलं. यातून त्यांनाही बास्केटबॉल आवडू लागलं.

ते देखील एनबीएचे मॅचेस आवर्जून पाहू लागले. या नव्या प्रेमातूनच त्यांनी २०१० मध्ये ते ‘गोल्डन स्टेट वॉरियर्स’ या टीमचे को ओनर आणि उपाध्यक्ष बनले. ‘एनबीए’च्या एखाद्या संघाचे मालकी असणारे ते पहिले भारतीय वंशाची व्यक्ती ठरले. पण इथं ते थांबले नाहीत.

पुढच्या तीन वर्षात रणदिवेंनी व त्यांच्या पार्टनरसोबत ‘सॅक्रॅमेन्टो किंग्ज’ हा बलाढ्य संघ खरेदी २५ अब्ज रुपयांना खरेदी करून टाकला.

सॅक्रेमेंटो किंग्स ही अमेरिकेतल्या सर्वात जुन्या टीम पैकी एक आहे. तिची स्थापना १९२३ साली झाली. या टीमने एनबीए ची चॅम्पियनशिप देखील जिंकलेली आहे. शाक ओ निल या बास्केटबॉल सुपरस्टारकडे देखील सॅक्रेमेंटो किंग्जचे थोडेसे शेअर्स आहेत. तो देखील रणदिवेंच्या सोबत या टीमचा मालक म्हणून बसतो.

रणदिवेंनी आपल्या टीमच्या कॉम्बिनेशन मध्ये काही असे बदल केले जे संपूर्ण बास्केटबॉल मध्ये पहिलाच प्रयोग मानला गेला.

विवेक रणदिवे यांना सॅक्रेमेंटो किंग्जने एवढं झपाटलं की त्यांनी आपली टिबको हि सॉफ्टवेअर कंपनी ४ अब्ज डॉलर्सना विकून टाकली. आता पूर्णवेळ त्यांनी स्वतःला बास्केटबॉलला वाहून घेतलं आहे.

गेल्यावर्षी भारतात त्यांच्याच प्रयत्नातून ‘एनबीए’ने बास्केटबॉलचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना मुंबईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

४ ऑकटोबर २०१९ रोजी ‘इंडियाना पेसर्स’ आणि ‘सॅक्रेमेंटो किंग्स’ यांच्यामध्ये मुंबई प्रीसिझन सामने खेळवण्यात आले. भारतात बास्केटबॉल खेळला जातो पण इथे प्रोफेशनल बास्केटबॉल लीगला रुजवण्यासाठी विवेक रणदिवेंनी कंबर कसली आहे. या वर्षी कोरोनामुळे अख्खा सिझन वाया जरी गेला असला तरी पुढच्यावर्षी नव्या दमाने नव्या जोशात एनबीए भारतात येईल हीच रणदिवेंच्या कडून अपेक्षा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.