ते इतके लोकप्रिय होते की, पुण्यातील कित्येक आयांनी आपल्या मुलांचे नाव रंगा असे ठेवले होते.
१९३९ ते १९४६ च्या काळातील कपिल देव म्हणजे रंगा सोहोनी. क्रिकेटविश्वात जेवढी लोकप्रियता कपिल देवची होती तशीच रंगा सोहोनी यांची एकेकाळी होती. रंगा सोहोनी हे कित्येक क्रिकेटप्रेमींचे दैवत होते. ते धडाकेबाज फलंदाजी सुद्धा करायचे आणि भेदक गोलंदाजी सुद्धा. याबाबतीत ते कपिल देवच्या सुद्धा वरचढ होते.
रंगा सोहोनी हे मूळचे राजस्थानी. त्यांचा जन्म राजस्थानमधील निंबहेरा गावचा. पुढे पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी क्रिकेटला आपलसं करून घेतलं. गोरा रंग, रुबाबदार चाल, मजबुत शरीरयष्टी आणि कपाळावर रुळणारे केस मागे घेण्याची त्यांची स्टाईल यामुळे ते ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू सारखे देखणे दिसायचे.
सांगायच झाल तर १९४० च्या काळातले ते सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू होते.
त्याकाळी दूसरे महायुद्ध सुरू होते. त्यामुळे टेस्ट क्रिकेट व खेळांचे दौरे बंद करण्यात आले होते. युद्ध संपेपर्यंत रंगा सोहोनी यांना भारताकडून खेळण्यासाठी वाट पाहावी लागली. पण तोपर्यंत त्यांनी लागोपाठ दोनदा रणजी करंडक जिंकले होते. त्या दोन्ही वर्षी रंगा सोहोनी हे महाराष्ट्र संघाच्या यशाचे एक महत्वाचे शिल्पकार होते. त्या दोन वर्षात त्यांनी १०९, ६०, ९६, १२०, १३४ तसेच नाबाद २१८, ६८, व १०४ अशा जोरदार धावा काढल्या होत्या.
रंगा सोहोनी हे आघाडीचे खेळाडू होते. रंगा सोहोनी यांनी शतक किंवा अर्धशतक काढले की संपुर्ण पुण्यात आनंदी आनंद साजरा केला जायचा. आणि लवकर बाद झाले तर संपुर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करायचा.
जरी रंगा सोहोनी फलंदाजी करताना लवकर बाद झाले तरी ते नंतर विकेट्स घेऊन ती कसर भरून काढायचे. रंगा सोहोनी यांचे खर नाव श्रीरंग असूनही रंगा हे त्यांना लाडाने बोलले जायचे. पण रंगा हे नाव इतके लोकप्रिय झाले होते की पुण्यातल्या कित्येक आयांनी आपल्या मुलांचे नाव ‘रंगा’ च ठेवले होते.
ज्या लोकांनी रंगा सोहोनी यांना खेळताना पाहिले होते त्यांच्यावर त्यांची विलक्षण छाप पडायची. त्या वेळेचे शाळकरी क्रिकेटपटू रंगा सोहोनी यांच्या प्रत्येक हालचालींचे अनुकरण करत. पुण्यातील गल्लीबोळात रंगा सोहोनी यांच्या फलंदाजी व गोलंदाजी स्टाईलची हुबेहुब नक्कल केली जायची. पुण्यात चौका चौकात ‘रंगा सोहोनी’ तयार होत होते.
रंगा सोहोनी यांची खेळी व त्यांचा राजबिंडा रुबाब यांनी लोकप्रियतेच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. इतक्या की व्ही. शांताराम यांनी रंगा सोहोनी यांना आपल्या सिनेमात काम करणार का ? म्हणून मागणी घातली होती.
शेवटी महायुद्ध संपले आणि रंगा सोहोनी यांचे ग्रहण सुटले. आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर त्यांची निवड झाले. पण झाले असे की, नवाब पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तेव्हा इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पतौडी हे भारतात फारसे खेळलेले नसल्याने त्यांना खेळाडूंची पुर्ण ओळख नव्हती. त्यामुळे रंगा सोहोनी हे आघाडीचे फलंदाज आहेत हे त्यांना माहीतच न्हवते. त्यामुळे रंगा सोहोनी यांना नवव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले.
पहिल्या टेस्ट सामन्यात त्यांना खेळायची संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्यांना खेळायची संधी मिळाली.
दुसरा टेस्ट सामना हा अनिर्णीत राहिला. तो अनिर्णीत राखला तो रंगा सोहोनी यांनीच. या सामन्यात भारतीय संघाची पार घसरकुंडी उडाली होती. पराभवाच्या उंभरट्यावर भारतीय संघ येऊन उभा राहिला होता. इंग्लंड गोलंदाज ऐन जोशात होते. भारत १३८ वर ९ बाद अशी परिस्थिती होती. इंग्लंड ला विजयासाठी १ विकेटची गरज होती. पण नवव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या रंगा सोहोनी यांनी चिवटपणे शेवटपर्यंत झुंज दिली आणि नाबाद राहिले. त्यांनी फक्त ११ धावाच केल्या पण त्यांच्या या नाबाद खेळीमुळे इंग्लंड संघाला विजय मिळवता आला नाही.
पण उशिरा सुरु झालेली रंगा सोहोनी यांची टेस्ट कारकिर्द मात्र लवकर संपली.
- कपिल जाधव
हे ही वाच भिडू.
- धोतर घालून सिक्स मारणारे देवधर मास्तर
- निंबाळकर ब्रॅडमनच्या विश्वविक्रमापासून १० रन्स मागे होते, आणि अचानक..
- एका ओव्हरमध्ये त्या बॉलरने बॅट्समनला ७७ रन्स काढू दिल्या, ते ही ठरवून..!
- १९ सामन्यात नावावर होते १७४ रन्स, २० व्या सामन्यात द्विशतक ठोकत बनली सर्वात तरुण द्विशतकवीर!!!