छत्रपतींची बाजू मांडण्यासाठी रंगो बापू तेरा चौदा वर्षे लंडनच्या संसदेत भांडत राहिले…

सातारा जिल्हा म्हणजे वीरांची भूमी. शाहू छत्रपतींनी आपली राजधानी सातारला आणली आणि इथून संपूर्ण देशावर वचक ठेवला. पुढे मराठा साम्राज्य कोसळलं. इंग्रजांनी शनिवार वाड्यावर झेंडा फडकवला. पेशवाई बुडवली.

मराठ्यांवर विजय मिळवण्यात मुंबईचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा मोठा हात होता. हा गव्हर्नर मोठा हुशार होता. महाराष्ट्रात छत्रपतींच्या घराण्याचे किती महत्व आहे ते त्याला ठाऊक होते. त्याने मग प्रतापसिंह महाराजांशी तह केला आणि सातारा गादीचे पुनरुथ्थान केले.

१५ सप्टेंबर १८१९ रोजी कंपनी सरकारने करार करून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारा व आसपासच्या चौदा पेट्यांचे राज्य दिले.

त्यात नीरा व वारणा या नद्यांमधील मुलखाचा समावेश होता. छत्रपतींनी ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार कारभार चालवावा असे ठरेल. छत्रपतींनी परकीय सत्तेशी पत्रव्यव्हार करायचा नाही. ठरवून दिलेल्या पेक्षा स्वतःची शिबंदी वाढवायचे नाही अशा अटी इंग्रजांनी तहामध्ये टाकल्या होत्या.

पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही.

तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले.

 ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते.

सातासमुद्रापार इंग्लंडला जाणारे व तिथे तेरा चौदा वर्षे राहून छत्रपतींची बाजू मांडण्यासाठी ब्रिटिश राणीशी लढा देणारे रंगो बापू नेमके कोण होते ?

रंगो बापूंच्या घराण्याचा थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबध होता

दादाजी नरसप्रभू देशपांडे हे शिवरायांचे बालमित्र ,देशपांडे हा त्यांचा हुद्दा होता. मूळ आडनाव गुप्ते. दादाजी दीर्घायुषी होते. त्यामुळे शिवरायांनंतर छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतही त्यांनी स्वराज्यात सेवा केली. पुढच्या पिढय़ांनीही निष्ठापूर्वक स्वराज्याचीच सेवा केली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतचा प्रचंड रणसंग्राम मध्ये दादाजींचे नातू रामाजी कृष्णाजी गुप्ते हेही होते.रामाजींचे पुत्र बापूजी आणि त्यांचे पुत्र रंगो म्हणजेच प्रस्तुत ‘रंगो बापूजी’ .

जेव्हा प्रतापसिंह महाराजांना कंपनी सरकारने पदच्च्युत केलं तेव्हा रंगो बापूंच्या लक्षात आलं की रॉबर्ट ग्रँट किंवा इतरही इंग्रज हे इंग्लंडमधल्या सत्ताधारी सरकारचे नोकर नव्हते, तर ब्रिटिश सरकारच्या संमतीने हिंदुस्थानशी व्यापार करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ या एका खासगी कंपनीचे नोकर होते. 

मग थेट ब्रिटिश सरकारकडे बाजू मांडली तर आपल्याला न्याय मिळू शकेल म्हणून थेट इंग्लंडमध्ये दाद मागायचं ठरलं. कंपनीच्या नोकरांनी हिंदुस्थानात केलेल्या अन्याय, अत्याचारांची दाद ब्रिटिश संसदेसमोर लावावी, अशा उद्देशाने छत्रपती प्रतापसिंहांनी रंगो बापूना लंडनला पाठवले. 

सन १८४० साली रंगो बापूजी लंडनला गेले. आपल्या राजाची बाजू ब्रिटिश पार्लमेंटसमोर मांडण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. प्रथम दुभाषामार्फत आणि वर्षा-दोन वर्षांत स्वतःच इंग्रजी भाषा आत्मसात करून रंगो बापूजी न्यायासाठी धडपडत राहिले. इकडे सन १८४७ साली छत्रपती प्रतापसिंह स्वर्गवासी झाले. पण रंगो बापूजी परत न येता लंडनमध्येच इंग्रजी सत्ताधीशांचे बंद दरवाजे जिवाच्या आकांताने ठोठावीत राहिले.

 इंग्रजांनी देखील त्यांचे कौतुक केले. अनेक सज्जन इंग्रज अधिकारी, खासदार त्यांचे मित्र बनले. त्यांनी पार्लमेंटमध्ये रंगो बापूजींची बाजू मांडलीदेखील. पण काहीही झाले नाही. कारण काही करायचेच नाही, असा मुळी निर्णय झालेला होता. अखेर रंगो बापूजी निराश होऊन सन १८५३ साली सातारला परतले. इंग्रजी राज्य कसे चालते, हे तेरा-चौदा वर्षे सतत पाहून अनुभवून रंगो बापूजी परतले होते.

त्यामुळे इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱया क्रांतिकारकांनी अर्थातच रंगो बापूजींची भेट घेतली.

रंगो बापूजी गुप्तपणे उत्तर हिंदुस्थानात गेले. ब्रह्मावर्त ऊर्फ बिठूर या ठिकाणी नानासाहेब धोंडोपंत पेशवे यांची नि त्यांची भेट झाली. रंगो बापूजी त्यांना म्हणाले,

‘‘माझ्या मावळातले हजार गडी नि माझे दोन पुतणे, तुमचा निरोप येताच, इकडे रवाना करतो. उत्तरेकडे पंचारतीचा गजर झालेला ऐकू येताच दक्षिणेत मी नौबतीवर टिपरी हाणतो.’’

आणि मग सन १८५७ ची प्रचंड क्रांती झाली. रंगो बापूजींचे दोन पुतणे दिल्लीच्या तुंबळ संग्रामात प्रत्यक्ष लढले. दक्षिणेत मात्र क्रांतीला अनुकूल दान पडले नाही. उत्तरेतही इंग्रजांनी चिवटपणे लढून फासा पलटवला. रंगो बापूजींच्या मुलाला आणि काही सोबत्यांना पकडून फाशी देण्यात आले.

खुद्द रंगो बापूजी मात्र कुठे गेले हे इंग्रजांना जंग जंग पछाडूनही कळले नाही. आजही इतिहासाला ते ठाऊक नाही.

कोल्हापूर नरेश राजर्षी शाहू छत्रपती हे प्रबोधनकार ठाकरे यांना प्रेमाने ‘कोदंड’ असे म्हणत असत. सातारचे छत्रपती प्रतापसिंह आणि त्यांचे निष्ठावंत सेवक रंगो बापूजी यांचे अस्सल ऐतिहासिक चरित्र सिद्ध करण्याचे वचन राजर्षी शाहू महाराजांनी प्रबोधनकारांकडून घेतले. त्यांनी अविश्रांत श्रम करून अखेर १९४८ साली ते प्रसिद्ध केले.

संदर्भ- प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी प्रबोधनकार ठाकरे 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.