खऱ्या आयुष्यात कंगना राणावतच्या बहिणीवर अ‍ॅसिड अ‍ॅटॅक झाला होता !!

हिमालयाच्या दऱ्यामध्ये वसलेलं नयनरम्य डेहराडून. गाव तस छोटंच. असली गर्दी तर ती फक्त पर्यटकांची.
रविवार सकाळची वेळ. शाळा कॉलेजला जाणारी मुल अजून अंथरुणात लोळत असतील. ज्यांचे व्यवसाय टुरिस्टवर अवलंबून आहेत त्यांची तेव्हढीच लगबग सुरु. अशाच एका शांत निवांत कॉलनीमध्ये जोरदार गोंधळ सुरु होता.

पहिल्यांदाच डेहराडूनमध्ये एका मुलाने मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल होतं.

मुलीच नाव होतं रंगोली राणावत. नुकताच आलेल्या गँगस्टर सिनेमातील अभिनेत्री कंगना राणावतची मोठी बहिण. नुकताच तिचा साखरपुडा झाला होता.  रंगोली राणावत तिथे एमएस्सी मायक्रोबायोलॉजी शिकत होती. शेवटच वर्ष होतं.
खर तर डेहराडूनमध्ये कोणाला ही मुलगी फिल्मस्टारची बहीण वगैरे माहितीच नव्हत. मुळात कंगना राणावतला ओळखणारे किती असतील.

तिथल्या कॉलेजच्या लेखी हिमाचल प्रदेशमधून शिकायला आलेली मुलगी एवढीच रंगोलीची ओळख !

झालं अस रंगोली आणि तिची तिच्या गावची मैत्रीण विजया या दोघी खोली भाड्याने घेऊन राहात होत्या. त्याना घरून मनीऑर्डर कुरियरने यायची. त्या दिवशी एक कुरियर वाला आला ते थेट सोबत करीबगमधून आणलेल्या बाटलीतील अ‍ॅसिड रंगोलीच्या चेहऱ्यावर रिकामी करून पळून गेला.

तो कोण होता कुठून आला कोणालाच काही कल्पना नव्हती.

या मुलींचा आक्रोश ऐकून लोक गोळा झाले.शेजाऱ्याच्यानी तिला हॉस्पिटलमध्ये नेल. रंगोलीचा निम्मा चेहरा जळून गेला होता. तिची छाती एक हात या सगळ्यावर अ‍ॅसिड पडल होतं. विजयावर देखील थोडेसे अ‍ॅसिड उडून जखमा झाल्या होत्या. रंगोली जगेल की नाही अशी परिस्थिती होती. डॉक्टरांनी कसबस ऑपरेशन करून तिला वाचवल.

पोलीसानी आरोपीचा शोध घेतला. तेव्हा त्यांना रंगोलीचा जुना प्रेमी अविनाश शर्मा सापडला. त्याला पोलिसांनी रिमांडमध्ये घेतल्यावर सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.

हिमाचलच्या मंडीचाच असणाऱ्या अविनाश शर्माने रंगोलीने लग्नास नकार दिला व दुसऱ्या मुलाशी साखरपुडा केला म्हणून रागावून तिचा बदला घेण्याचा प्लान केला होता. जम्मू मधल्या एका प्रेम सिंग नावाच्या गुंडाला सुपारी दिली आणि  त्या प्रेमसिंगने रंगोलीवर अ‍ॅसिड ओतले. प्रेमसिंगला देखील अटक झाली.

रंगोलीचे आयुष्य बरबाद झाले. रंगोली ही कंगना एवढीच किंबहुना तिच्याहून ही थोडीशी जास्त सुंदर होती अस म्हणतात. मात्र या अ‍ॅसिडमुळे तिचा चेहरा तर कायमचा विद्रूप झाला होताच शिवाय तिचा एक कान सुद्धा जळाला होते. तिच्यावर ५ वर्षात तब्बल ५४ ऑपरेशन करण्यात आले. या काळात तिच्या कुटुंबाने तिला आधार दिला.

तिचा भावी नवरा अजय चांडेलदेखील न डगमगता तिच्या पाठीशी उभा राहिला.

एकेकाळी तीच्याचं शाळेत असलेल्या अजयने रोज आपल्या हाताने तिच्या जखमा साफ केल्या तिला औषध लावले, यासाठी देखील मनाने खूप खंबीर असावे लागते. रंगोलीच्या या संकटातल्या काळात तिला साथ देऊन त्याने आपल्या प्रेमाची अग्नीपरीक्षा पार केली. ती बरी झाल्यावर दोघांनी लग्न केले. त्यांना एक बाळ देखील आहे. रंगोली आता कंगनाची मॅनेजर म्हणून काम पाहते.

आणि आरोपी अविनाश शर्मा?

भारतीय न्यायव्यवस्थेच्या पळवाटांचा त्याने पुरेपूर फायदा उठवला.

काही दिवसातच त्याला जामीन मिळाला. तो एवढा निगरगट्ठ होतं की त्याने रंगोली पाठोपाठ कंगनाला ही अ‍ॅसिड ओतण्याची धमकी दिली. तिने पोलीस कम्प्लेंट केल्यावर त्याला परत अटक झाली.त्यानंतर त्याच पुढे काय झालं हे माहिती नाही. मिडियामध्ये त्याची जास्त खबर पण आली नाही आणि रंगोली म्हणते,

“मी माझ्या सुखी संसारात एवढी व्यस्त झाले की या वाईट भूतकाळाची प्रत्येक खुण मी विसरण्याचा प्रयत्न करते. त्या आरोपीच पुढ काय झालं मी चौकशी देखील केली नाही.”

ती किती जरी म्हणत असली तरी तिच्या मनावर आयुष्यभरासाठी ओरखडा उमटला आहे. कंगनाची मॅनेजर म्हणून काम करताना ती अनेकदा टोकाची आक्रमक झालेली दिसते. ट्विटर वरील तिची भांडणे तर अनेकदा कुप्रसिद्ध आहेत. अस म्हणतात की त्या घटनेमुळे रंगोलीच्या मनात एक विखर निर्माण झालाय तो वेळोवेळी बाहेर पडत असतो.

बाकी काही का असेना बर्यावाईट प्रत्येक क्षणात भांडणात सुखदुःखात या बहिणी एकत्र असतात.

रंगोलीची कथा एकाद्या सिनेमापेक्षाही जास्त थरारक आहे. कंगना बऱ्याचदा गंमतीने तिला म्हणायची देखील की तुझ्या आयुष्यावर मला सिनेमा बनवायचा आहे पण रंगोली तिला नकार द्यायची. पण नुकताच दिपिका पदुकोनच्या छ्पाक सिनेमाचा ट्रेलर आला.

हा सिनेमा लक्ष्मी अग्रवाल नावाच्या खऱ्या अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हायवर वर बनलेला आहे.

रंगोलीसारख्या एका सेलिब्रेटीच्या बहिणीला एवढ सहन करावे लागले तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलीना किती दिव्यातून जावे लागत असेल याची कल्पनाही करता येणार नाही. त्या मुलीचा न्यायासाठीचा लढा गीतकार गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. दीपिका पदुकोनने हा ऑफबीट रोल करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

कायम कंगनाच्या इतर स्पर्धक अभिनेत्रीवर आगपाखड करणाऱ्या रंगोलीने यावेळी मात्र खुल्या दिलाने दीपिकाचे कौतुक केले. अ‍ॅसिड अ‍ॅटॅकच्या बळी असणाऱ्या मुलीना या निमित्ताने आवाज मिळेल अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.