राणी दुर्गावतीने अखेरच्या क्षणांपर्यंत मुघलांना शरण न जाता आत्मबलिदान दिलं…

आपल्या भारताच्या इतिहासात अनेक वीर-वीरांगना आपल्याला माहिती नाहीत. ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशा अनेक लोकांबद्दल आपल्याला पुष्कळ माहिती नसते. भारताच्या इतिहासात मोजक्याच वीरांगना झाल्या त्यापैकीच एक म्हणजे राणी दुर्गावती.

मुघलांना शरण न जाता आणि हार न स्विकारता पराक्रम गाजवणाऱ्या आणि कुशल प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी दुर्गावतीबद्दल आपण जाणून घेऊया.

राणी दुर्गावतीचा जन्म गोंडवनात १५२४ साली झाला. कलिंजरचे महाराजा किर्तीसिंह चंदेल यांच्या त्या एकुलत्या एक कन्या होत्या. दुर्गावतींचे पती दलपत शाह यांचं गोंडवाना क्षेत्रात राहणाऱ्या गोंड वंशजांच्या ४ गढमंडला, देवगढ, चंदा आणि खेरला या राज्यांवर वर्चस्व होतं. पण दुर्दैवाने राणी दुर्गावती सोबत विवाहाच्या ४ वर्षानंतर दलपत शहाच निधन झालं. 

दलपत शहाच्या निधनानंतर त्यावेळी राजपुत्र नारायण फक्त ३ वर्षाचा होता त्यामुळे राणी दुर्गावतीने स्वतः राज्याची सूत्र हातात घेतली. गढमंडला या राज्यावर [जबलपूर केंद्र ] राज्य केलं. राणी दुर्गावतीने तब्बल १६ वर्ष राज्य केलं आणि एक कुशल प्रशासक अशी ओळख मिळवली. पण कुशल प्रशासक या ओळखीपेक्षा त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची जास्त चर्चा झाली.

राणी दुर्गावतीबद्दल सांगण्यात येतं कि राज्यामध्ये कुठेही जेव्हा वाघाच्या त्रासाची बातमी येऊन धडकायची तेव्हा राणी दुर्गावती स्वतः शस्त्र घेऊन वाघाचा निकाल लावून यायची.

जोवर वाघाला नामोहरम करत नाही तोवर राणी दुर्गावती पाणीसुद्धा पीत नसे. राणी दुर्गावतीचा हा पराक्रम मुघल राजवटीलासुद्धा कौतुकास्पद वाटायचा.

पराक्रम आणि धाडसी नेतृत्वाबरोबरच राणी दुर्गावती दिसायला सुद्धा सुंदर होती. जेव्हा माणिकपूरचा सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां याने राणीविरुद्ध अकबराला लढाई करायला भाग पाडलं होतं. अकबर तेव्हा राणी दुर्गावतीला रानिवासाची शोभा वाढवण्यासाठी ठेवणार होता.

असंही सांगितलं जातं कि अकबर बादशहाने राणी दुर्गावतीला भेट म्हणून एक सोन्याचा पिंजरा पाठवला होता आणि सांगितलं होतं कि राणीने कायम पिंजऱ्यातच राहावं, पण राणी दुर्गावतीने याच उत्तर इतकं जबरदस्त दिल होतं कि अकबरसुद्धा चकित झाला होता.

राणी दुर्गावतीने अनेकवेळा मुघलांचा पराभव केला आणि मुघलांसमोर शरणागती न पत्करण्याचा त्यांचा हेकाच होता. २४ जून १५६४ रोजी मुघलांनी पुन्हा राणी दुर्गावती यांच्या राजवटीवर हल्ला चढवला. राणी दुर्गावती यांच्या सैन्याची ताकद कमी पडू लागली तेव्हा राणीने राजकुमार नारायणाला सुरक्षितस्थळी पाठवून दिलं. घनघोर युद्ध सुरु झालं होतं.

या युद्धामध्ये मुघलांनी पूर्ण ताकदीनिशी हल्ला चढवला होता. राणी दुर्गावती यांची या युद्धात पीछेहाट होऊ लागली. अचानक एक बाण येऊन राणी दुर्गावती यांच्या दंडात घुसला. राणीने तो बाण मोठ्या मुश्किलीने काढून फेकला. तो बाण फेकला नि लगेच दुसरा बाण वेगात येऊन राणीच्या डोळ्यात घुसला. राणी दुर्गावतीने तोही बाण काढून फेकला पण त्या बाणाचं टोक तसंच डोळ्यात रुतून राहिलं. पुढचा बाण थेट कंठात घुसला. 

अगदी शेवटच्या क्षणी राणी दुर्गावतीने आपल्या वजिराला म्हणजे आधारसिंहला सांगितलं कि तलवारीने माझं शीर वेगळं कर पण आधारसिंह हे कृत्य करायला तयार होईना तेव्हा राणी दुर्गावतीने कट्यार घेतली आणि स्वतःच्या पोटात खुपसून आत्मबलिदान केलं.

शेवटपर्यंत मुघलांना शरण न जाता राणी दुर्गावतीने आत्मबलिदान दिलं.

जबलपूरच्या बरेला या ठिकाणी हे ऐतिहासिक युद्ध झालं होतं. मंडला रोडच्या ठिकाणी राणी दुर्गावतीची समाधी आहे तिथे गोंड समाजातील आणि इतर बांधव श्रद्धांजली वाहायला जातात. राणीच्या नावावरूनच जबलपूरमध्ये राणी दुर्गावती विश्वविद्यालय उभारण्यात आलं. राणीच्या निधनानंतर त्यांच्या दिराने चंद्रशाहने मुघलांचं राज्य स्वीकारलं आणि मुघलांचा शासक बनून तो काम पाहू लागला.

राणी दुर्गावती यांचा पराक्रम आजही जबलपूरमध्ये चर्चिला जातो. भारताच्या महत्वाच्या विरांगणांपैकी एक म्हणजे राणी दुर्गावती यांना ओळखलं जातं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.