नागालँडची राणी लक्ष्मीबाई जिला स्वातंत्र्याच्यानंतर देखील भूमिगत व्हावं लागलं होतं..

ते साल होतं १९३२ चं ….भारत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. सगळे आपल्या आपल्या परीने लढत होते, देशाच्या काना-कोपऱ्यातून बंडखोरीचा आवाज निनादू लागला होता त्यातलाच खंबीर आणि निर्भीड आवाज म्हणजे मणिपूरच्या राणी गायदिनिल्यूचा आवाज, ज्यांना देवीचा अवतार मानले जात असायचे. या स्त्रीने इंग्रजांच्या नाकीनऊ आणले होते,

तिला पकडण्यासाठी ५०० रुपयांची रोख रक्कम आणि १० वर्ष कर माफीचे बक्षिश  घोषित केले होते.

स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रीयांच्या सहभाग हे इतिहासातील एक तेजस्वी पान आहे, आणि याचा सर्व भारतीयांना आणि महिलांना याचा कायमच अभिमान आहे.

स्वातंत्र्यसेनानी राणी गायदिनिल्यू, मणिपूरमधील लोंग्काओ येथे रौंग्मी नागा जमातीतील लोथोनांग पामेई आणि क्चाक्लेनिऊ या दांपत्यापोटी तिचा जन्म झाला होता. गाइदिन्ल्यू लहानपणापासूनच अतिशय धाडसी होती. ब्रिटीशांच राज्य असल्यामुळे गावात शाळा नव्हती त्यामुळे तिची शिक्षण ही होऊ शकले नाही. त्याचदरम्यान ब्रिटिश अधिसत्तेच्या या कालखंडात भारतभर ब्रिटिशविरोधी लढे सुरू होते.

गाइदिन्ल्यू लहानाची मोठी होऊ लागली, इंग्रजांचे जुलूम, बंधनात वाढू लागली. 

आणि त्याचदरम्यान मणिपूर मध्ये हेराका नावाचे धार्मिक आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचे प्रतिनिधित्व गाइदिन्ल्यूचा चुलतभाऊ हैपोऊ जादोनांग करीत होता. ब्रिटीश सैनिक नागा लोकांना   ख्रिश्चनीकरण करण्यास भाग पाडत होते. लोकांनी त्यांनी विरोध करीत, आंदोलन केले. हळूहळू हे आंदोलन सशस्त्र बनले.

वयाच्या अगदी तेराव्या वर्षी गाइदिन्ल्यू या आंदोलनात सहभागी झाली.

मणिपूर- नागालँडमधून ब्रिटिशांना बाहेर हाकलून प्राचीन नागा संस्कृती जपायची या उद्देशाने जादोनांग आणि त्याचे सर्व सहकारी पेटून उठले होते. ब्रिटिशांनी जादोनांगला पकडलं आणि फाशी दिली. भावाच्या फाशीमुळे गाइदिन्ल्यू एकटी पडली, परंतु तिने हेराका आंदोलनाचे नेतृत्व आपल्या हातात घेतले, तेही वयाच्या सोळाव्या वर्षी.

गाइदिन्ल्यू गनिमी काव्यात, शस्त्र चालविण्यात अगदी तरबेज होती. तिने सुमारे चार हजार क्रांतिकारी लोकांचे संघटन केले. तिच्या गावातील लोकांनी ब्रिटिश सरकारला आम्ही कर भरणार नाही म्हणून ठाम नकार दिला. त्याचं करातली थोडीफार रक्कम ते गाइदिन्ल्यूला द्यायचे. तिला मदत करणाऱ्या गावांमध्ये  ब्रिटिशांनी जाळपोळ केली, त्यांना अनेक प्रकारे त्रास दिला तरीही नागा लोक तिला मदत करीत असायचे. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली होती.

ब्रिटिश सैनिकांनी तिला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु संपूर्ण प्रांत तिच्या पाठीशी उभा होता.

ती चालवत असलेल्या धार्मिक आंदोलनाचे रुपांतर स्वातंत्र्य लढ्यात झाले. तिच्यामुळे मणिपूरची स्वातंत्र्य चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जोडली गेली. तिच्या या आंदोलनाच्या मागे महात्मा गांधींनी चालविलेल्या आंदोलनाची प्रेरणा होती. अत्यंत सावध आणि गुप्तपणे तिच्या ब्रिटिशविरोधी कारवाया चालत असायच्या. ब्रिटिशांनी तिच्या मागावर होते परंतु ती काही त्यांच्या हाताशी लागली नाही.

मात्र एकदा ब्रिटीशांनी अचानकपणे हल्ला करून गाइदिन्ल्यू आणि तिच्या साथीदारांना पकडले.

इंफाळमध्ये तिच्यावर खटला चालवला आणि अवघ्या १७ वर्षांच्या गाइदिन्ल्यूला जन्मठेपेची शिक्षा दिली आणि तिच्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे जवळपास १५ वर्षे ती तुरुंगात होती.

ती मणिपूरच्या तुरुंगात असतांना पंडित नेहरु तिला भेटायला आले होते.

मणिपूरच्या दौऱ्यावर असतांना नेहरुंना गाइदिन्ल्यूबद्दल माहिती मिळाली, त्यांना कौतुक वाटलं कि इतक्या कमी वयात एखादी स्त्री इतक्या निडर पणे कशी काय लढू शकते म्हणून त्यांनी तिची भेट घेतली. त्यांनी तिला तुरुंगातून सोडविण्याचे बरेच प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. पण त्यांनी तिच्या संघर्षावर वर्तमानपत्रात एक लेखही लिहिला होता. त्यात त्यांनी गाइदिन्ल्यूला पर्वतकन्या म्हंटले.

नेहरूंनीच तिचा उल्लेख ‘राणीʼ असा केला आणि संपूर्ण प्रांत तिला ‘राणी गाइदिन्ल्यू ʼ या नावाने हाक मारायचा असंही ती जनतेमध्ये लोकप्रिय होतीच.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबरच तीही स्वतंत्र झाली.  १४ ऑक्टोबर १९४७ रोजी तिला तुरुंगातून सोडण्यात आलं. त्यानंतर त्या आपल्या गावी परतल्या आणि तिथेच गा संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी कार्य करीत राहिली.

स्वातंत्र्यानंतर देखील पुन्हा एकदा तिला भूमिगत व्हावं लागलं होतं.

कारण तिने भारतातच स्वतंत्र झेलियनग्रोंग प्रदेशाची मागणी केली होती. आणि या मागणीला इतर नागा नेत्यांनी विरोध केला होता. त्यांच्यात संघर्ष वाढतच गेला आणि शेवटी तिला १९६० मध्ये भूमिगत व्हावं लागलं. भूमिगत राहूनही तीने चळवळ चालूच ठेवली.

तिने केलेल्या कार्यामुळे तिचा  ‘नागालँडची राणी लक्ष्मीबाईʼ असाही केला जातो.

मणिपूरमधील लोकांत राजकीय स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करण्यात तिचे योगदान महत्त्वाचे ठरले. राणी गाइदिन्ल्यूला तिच्या क्रांतिकार्यासाठी स्वातंत्र्यसेनानी ताम्रपत्र, भारत सरकारतर्फे पद्मभूषण, विवेकानंद सेवा सन्मान पुरस्कार इत्यादी मानसन्मान देऊन गौरविण्यात आले.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.