काय पण म्हणा रंजना अशोक सराफला कॉमेडीत जडच जायची.

साधारण सत्तर ऐंशीच्या दशकातील काळ. मराठीत एक नवीन तारा उदयास आला होता. अशोक सराफ.

दादा कोंडकेच्या मुळे मराठीत कॉमेडीची लाट आलीच होती मात्र अशोक सराफच्या कॉमेडीची जातकुळीच वेगळी होती. त्याचे विनोद कमरेच्या खालचे नव्हते. त्याचा भर अंगविक्षेपापेक्षा टायमिंगवर मारलेल्या पंचवर असायचा. अशोक सराफच्या येण्याने मराठी सिनेमाला एक नवीन सुपरस्टार मिळाला होता.

याच काळात अशोक सराफच्या तोडीस तोड किंवा काकणभर सरसच कॉमेडीच टायमिंग असणारी एक अभिनेत्री आली होती. तीच नाव रंजना.

रंजनाच पूर्ण नाव रंजना देशमुख. नवरंग, दो आंखे बारा हाथ, पिंजरा या सिनेमातून फेमस झालेली सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्या ही तिची मावशी. आई वत्सला देशमुख ही सुद्धा चित्रपटात अभिनय करायची. संध्या व्ही शांताराम यांची लाडकी अभिनेत्री होती आणि पुढे जाऊन त्यांच लग्न देखील झाल.

व्ही शांताराम यांच्या सिनेमात  संध्या असायचीच. रंजनाच्या आईला देखील त्यांच्या सिनेमात छोटे मोठे रोल मिळायचे. यामुळेच रंजना व्ही शांताराम यांच्या सेटवर लहानाची मोठी झाली अस म्हटल तरी चुकीच ठरणार नाही.

अगदी कमी वयातच तिच्यावर सिनेमाचे संस्कार झाले होते. व्ही.शांताराम यांच्याच ” चंदनाची चोळी अंग अंग जाळी ” या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 

रंजना दिसायला रूढार्थाने अतिसुंदर स्वर्गातून उतरलेली अप्सरा वगैरे नव्हती मात्र तिचा चेहरा प्रचंड बोलका होता. तिचे मोठे डोळे न बोलताही बरच काही तरी सांगून जायचे. पडद्यावरचा तिचा वावर फ्रेश होता.

त्याकाळात अभिनेत्री म्हणजे झाडाच्या भोवती हिरो सोबत धावत नाचणे, मुळूमुळू रडणे असेच रोल असायचे. सुरवातीला रंजनाला सुद्धा असेच तमाशापट टाईपचे सिनेमे ऑफर व्हायचे.

पण रंजनाने आपल्या मेहनतीने हा स्टिरीओटाईप मोडून काढला. ती स्वतः खऱ्या आयुष्यात खमकी आणि खंबीर होती. पडद्यावर सुद्धा तिने तसेच रोल गाजवले.

तिचा दुसराच सिनेमा झुंज प्रचंड चालला. या पाठोपाठ आलेल्या अरे संसार संसार या सिनेमासाठी तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. या सिनेमात अशोक सराफ खलनायकी भूमिकेत होता.

मात्र पुढे गोंधळात गोंधळ या सिनेमापासून तिची आणि  अशोक सराफची जोडी खास जमली. या दोघांनी एक डाव भुताचा, सुशीला, गुपचूप गुपचूप, बिन कामाचा नवरा असे एका पाठोपाठ एक जबरदस्त सिनेमे बनवले.

अशोक सराफच्या कॉमेडीसमोर उभं राहणायचं धाडस तिने दाखवलंच पण त्याच्या कडून शिकत शिकत स्वतःची वेगळी इमेज बनवली.

अस्सल गावाकडची नार असो वा शहरातली मॉडर्न कॉलेज कुमारी हे दोन्ही रोल ती सहज निभावत होती. हळूहळू अस झाल की सिनेमात हिरो कोणीही असो भाव रंजनाच खाऊन जायची. अगदी अशोक सराफ असला तरी.

याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गुपचूप गुपचूप हा सिनेमा. तस बघितल तर या सिनेमाचा हिरो कुलदीप पवार आहे. पण त्याच फक्त पाहिले न मी तुला हे गाणच तेवढ आठवत. याशिवाय कसलेल्या श्रीराम लागूपासून नव्या कोऱ्या महेश कोठारे पर्यंत अनेक कलाकार आहेत.

अशोक सराफने रंगवलेला घसरणारी पँट वर ओढणारा चश्मेश प्रोफेसर धोंड तर जबरीच आहे. 

पण भाव खाऊन जाते रंजनाच. साजूक तुपातल्या बहिणीचा डबल रोल करणारी वेळोवेळी प्रोफेसर धोंडची मजा घेणारी रंजना अफलातून आहे. या सिनेमात तिने इतर सगळ्यांना खाऊन टाकलं.

असच बिन कामाचा नवरा वेळी पण झाल. यावेळी अशोक सराफ आणि खुद्द अभिनयाचा बादशाह निळू फुले यांची जुगलबंदी असतानाही चर्चा रंजनाच्या ध्रुपदाची झाली.

अशोक सराफ बरोबर तीचं पडद्यावरच सूर जुळले होते अस नाही तर पडद्यामागे देखील त्यांची लव्ह स्टोरी रंगात आली होती. दोघांनी साखरपुडा देखील केलेला अशी तेव्हा चर्चा होती.

रंजना तेव्हा यशाच्या शिखरावर होती. प्रसिद्धी आणि पैसे तिच्या पायाशी लोळत होते. तिला समोर ठेऊन भूमिका लिहिल्या जात होत्या. अशोक सराफ सोबतच रविंद्र महाजनी बरोबर सुद्धा तिने अनेक जबरदस्त सिनेमे केले. फक्त कॉमेडीच नाही तर गंभीर धाटणीचा अभिनय सुद्धा ती त्याच ताकदीने करायची. बरेच पुरस्कारसुद्धा तिला मिळाले. निसर्ग राजा ऐक सांगतो, कुण्या गावाचं आलं पाखरू, हा सागरी किनारा अशा गाण्यामध्ये तिला आपण कधी विसरू शकत नाही.

मराठी सिनेमाची सुपरस्टार म्हणून तिच नाव चमकायला सुरु झालं होतं. सगळ अगदी स्वप्नवत चालू होतं आणि ती दुदैवी घटना घडली.

साधारण १९८६-८७ साली रंजनाचं बेंगलोरला झुंझार या सिनेमाच शुटींग सुरु होतं. त्या शुटींगला जात असताना तिच्या कारला मोठा अपघात झाला. ती अगदी मरता मरता वाचली. रंजनाचे सगळे चाहते तिच्या बरे होण्याची वाट पहात होते

आणि  बातमी आली की तिला आयुष्यभरासाठीच अपंगत्व आलं आहे. सगळ होत्याच नव्हतं झाल. ती परत कधी मोठ्या पडद्यावर दिसलीच नाही.

तीच तेव्हा वय अवघ ३२ वर्षे होतं. हातातल्या अनेक सिनेमावर पाणी सोडव लागल. वैयक्तिक आयुष्यात देखील मोठी पडझड झाली. अशोक सराफ बरोबरच नात संपुष्टात आलं.

एकेकाळी मराठी सिनेमाची साम्राज्ञी असलेल्या रंजनाला जेव्हा गरज होती तेव्हा जवळच्या माणसांनी साथ सोडली.

नवे सिनेमे आले. नव्या हिरोईन आल्या. हळूहळू प्रेक्षक सुद्धा तिला विसरून गेले.

व्हीलचेअरवर एकाकीपणाच्या काळोखात रंजनाने काही वर्ष काढली. ‘फक्त एकदाच’ या नाटकाद्वारे रंजनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.  पण या आयुष्याने देखील तिची साथ अर्ध्यात सोडली. हृद्यविकाराने तीच निधन झाल. तेव्हा तीच वय होतं अवघ ४५.

मराठी सिनेसृष्टी आपल्या सर्वात समर्थ अभिनेत्रीला गमावून बसली होती.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Aditya gaikwad says

    रंजना, अश्विनी एकबोटे, अश्या खूप मोजक्याच अभिनेत्री आहेत ज्यांची पोकळी कधीच, कुणीच भरू शकत नाहीत… पण बहुतेक त्यांचा अपघात पंढरीची वारी या दरम्यान झाला होता…

Leave A Reply

Your email address will not be published.