रणजीत सिंह यांची ती मुस्लिम प्रेयसी जिने महाराणी नसूनही पंजाबवर राज्य केले.

आपल्या प्रेयसीच्या आनंदासाठी माणूस बर्‍याच काही गोष्टी करतो. पण एकेकाळी महाराजा रणजीत सिंह यांनी आपल्या प्रेयसीसाठी चक्क तिच्या नावाने नाणी पाडली होती. बाजारात वजनासाठी तिच्या नावाचे परिमाण काढले होते. तिच्यासाठी आपल्या प्रिय मित्राशी संबंध तोडण्यातही महाराजा रणजीत सिंह यांनी कसर सोडली नाही.

ती कुणी महाराणी नव्हती. पण एकोणिसाव्या शतकात पंजाबमध्ये महाराजा रणजीत सिंग यांच्या आदेशावरून त्या बाईच्या नावाने चलन सुरू होते. मुद्रांवरती त्यांचे चित्र उमटवले जायचे. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी रणजीत सिंग यांचेच नाव समोर यायचे त्या मोजमाप करण्यासाठीही अनेक परिमाणे तिच्या नावावर बनली होती. त्यामुळे त्या बाईने पंजाबवर बेदिक्कत राज्य केले.

ती स्वतः कधीच लाहोरच्या शाही किल्ल्यामध्ये महाराजा रणजीत सिंग यांच्याबरोबर राहिली नव्हती पण स्वतः रणजीत सिंह हे तिच्या हवेलीवर नेहमी येत.

या बाईचे नाव आहे मोरा माई. एकीकडे मुस्लीम सत्तेशी संघर्ष करताना मैदान गाजवणाऱ्या महाराजा रणजीत सिंह यांनी या मुस्लिम स्त्री समोर आपल्या हृदयाचा ताबा गमावला होता.

इतिहासकारांचे म्हणणे आहे की त्या काळामध्ये लाहोरच्या शहाआलम रस्त्यावरून थोड्या जवळच मोरा बाई यांचे निवासस्थान होते. या स्थळाची काळजी घेण्यासाठी महाराजा रणजीत सिंह यांनी अनेक आदेश दिले होते. या आदेशांना तेथे ठेवण्यात येत असे व त्याच्या खाली लिहिले जायचे.

“जारी करदा कोठा माई मोरां, महबूबा महाराजा रणजीत सिंह.”

लाहोरमधील प्राचीन संग्रहालयामध्ये या आदेशाच्या प्रती अजूनही उपलब्ध आहेत. त्या काळातील नाणी अजूनही पाहायला मिळतात.

या बाईच्या साम्राज्याच्या अनेक आठवणी अजूनही पंजाबच्या राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. काही इतिहासाच्या तडाख्यात नष्टही झाल्या आहेत. पण तिचे नाव अजूनही पंजाबी लोकांच्या मनामध्ये दरवळत असते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात माई मोरा यांनी पंजाब वर राज्य केलं. या बाईने बनवून घेतलेली मशिद ‘मोरांवाली मस्जिद’ या नावाने अजूनही ओळखली जाते.

मोरां माई कधी राणी बनू शकली नाही. महाराजा रणजीत सिंह यांनी तिच्याशी लग्न केलं नव्हतं. पण फक्त आपल्या सुंदरतेच्या जोरावर या बाईने शेर-ए-पंजाब म्हणून ओळखल्या जाणार्‍या या महान राजाचे हृदय जिंकून घेतले होते.

रणजीत सिंग यांची आजची ओळख पंजाबमध्ये शीख साम्राज्य सुरू करणारे म्हणून आहे. 1780 साली सध्याच्या पाकिस्तान मधील गुजरांवाला या शहरांमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1801 साली त्यांनी मोगलांशी लढून पंजाबमध्ये शीख धर्माचे मोठे राज्य स्थापन केले.

एखाद्या मराठी माणसासाठी मराठा साम्राज्याचे जितके महत्त्व आहे तेवढेच महत्त्व एक शिख माणसासाठी महाराजा रणजीत सिंग यांचे असते.

जेव्हा संपूर्ण भारतात मुसलमानी सत्तेचा अंमल होता तेव्हाच्या काळात अफगाणिस्तानमधील खबर खिंडीपासून ते दुसऱ्या बाजूला कश्मीरपर्यंत हा सर्व प्रदेश शीख लोकांचा ताब्यात होता. यावेळी महाराजा रणजीत सिंह यांच्यासोबत त्यांची प्रेयसी मोरा माई होती. तिनेही या भागावर आपले शासन चालवले.

त्या काळामध्ये लाहोरला सौंदर्याची खाण म्हटले जायचे. याच भागात मोरा माई राहत असे. या एक व्यवसायिक नाचणारणी होत्या. आपल्या नृत्याच्या आविष्कारातून त्या आपली रोजीरोटी कमवत असत. त्यांच्या सुंदरतेची चर्चा लाहोरच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये होती.

जेव्हा महाराजा रणजीत सिंह यांनी लाहोर वरती कब्जा केला तेव्हा त्यांनीही मोरा माई यांच्या सौंदर्याची ख्याती ऐकली.

तिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून महाराजा रणजीत सिंग यांनी तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. स्थानिक इतिहासकार लोकांच्या अनुसार ते जेव्हा तिला भेटायला तिच्या कोठ्यावर गेले तेव्हा तिच्या सौंदर्याची मोहिनी महाराजा रणजीत सिंह यांच्यावर पडली. ते तिथे गेले आणि तिचे कायमचे रसिक प्रेमी म्हणूनच बाहेर पडले.

त्यांचा कोठा म्हणजे एक प्रचंड मोठी हवेली होती. काही लोकांच्या मते महाराजा रणजीत सिंग यांनीच तिलाही हवेली बांधून दिली होती.शिख साम्राज्यातील अनेक आदेश मोरा माई यांच्या कोठ्यावरून दिले जात. या आदेशांची अंमलबजावणी तेव्हा संपूर्ण साम्राज्यात होत असे.

महाराजा रणजीत सिंग यांचे या स्त्रीवर किती प्रेम होते या संदर्भात एक किस्सा सांगण्यात येतो.

दहा-बारा लोकांनी महाराजा रणजीत सिंह यांना लाहोर शहरावर आक्रमण करण्यासाठी बोलवले होते. त्यांनी शीख सैनिकांना शहरात घुसण्यासाठी मदत केली होती. यांच्यामध्ये कसूर नावाच्या गावामधला एक माणूस होता त्याचे नाव होते मेहर मुकामउद्दीन.

लाहोरच्या दरबारामध्ये मुख्य शिपाई असणारा हा माणूस शीख साम्राज्याचा पाईक होता.

जेव्हा महाराजा रणजीत सिंह लाहोर मध्ये आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दरवाजा उघडणारा हाच माणूस होता. त्याच्यामुळे शिख फौजा शहरात येऊ शकल्या आणि रंजीत सिंह यांनी लाहोर वर ताबा मिळवला. त्यामुळे दरबारामध्ये मेहर मुकामउद्दीन या माणसाला मोठी प्रतिष्ठा होती. त्याला बसण्यासाठी एक वेगळे आसन बनवले गेले होते. दरबारामध्ये त्याला आपोआपच एक वजन प्राप्त झाले. महाराजा रणजीत सिंह यांनी स्वतः त्याला अनेक किताब देऊन गौरविले होते.

रणजीत सिंह हे त्याला एखाद्या मित्राप्रमाणे वागवत असत. पण मेहर मुकामउद्दीन याला मोरा माई आणि तिचा वाढता प्रभाव अजिबात आवडत नव्हता.

एका नाचणारीच्या कोठ्यावरून शासनाचे आदेश दिले जावेत हे त्याला अजिबात आवडले नाही. त्यांनी ही बाब महाराजा रणजीत सिंह यांच्या कानावर घातली. पण महाराजा त्या स्त्रीच्या एवढ्या प्रेमात होते की त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

परिणामी मेहर मुकामउद्दीन यांनी थेट मोरा माई हिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली.

त्या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू झाली. शीख साम्राज्यामध्ये कुणाकडे जास्त अधिकार आहेत यावरून या दोघांमध्ये सरळ सरळ लढत जुंपली.

मोरा माई यांच्या म्हणण्यानुसार

“मेहर हा आधी लाहोरच्या भाजी बाजारांमध्ये कांदे विकत होता. क्वचित नशिबाचा फेरा चुकला म्हणून त्याला दरबारामध्ये जागा भेटली. आता तिने पुन्हा मेहेर बाबाला त्या जागी परत पाठवण्याचा विडा उचलला होता.”

याच्या उत्तरात मेहर मुकाम उद्दीन याने मोरा माई हिला तिची जागा दाखविण्याचा निर्धार केला. “तिला तिच्या कोठ्याच्या बाहेर जाऊ देणार नाही” ही गोष्ट त्यांनी बोलून दाखवली.

महाराजा रणजीत सिंह यांची कृपादृष्टी कुणावर होते की यातील उत्सुकतेची गोष्ट होती. ज्या माणसाने त्यांना या शहरांमध्ये आमंत्रित केले व जो त्यांचा जवळचा मित्र होता त्यावर की आपल्या प्रेयसीवर.

नंतरच्या काळात एक सरकारी आदेश निघाला आणि मेहर मुकामउद्दीन यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली.

त्यांच्याकडे काहीच राहिले नाही. दरबारातील त्यांची जागाही खाली करण्यात आली. त्याच्याकडे दिली गेलेली नवा कोट भागातील जहागिरी परत घेण्यात आली. मेहर मुकामउद्दीन पुन्हा लाहोरच्या बाजारामध्ये कांदे विकू लागला. प्रेयसीवरील प्रेमाने मित्र प्रेमावर मात केली होती.

याच्यानंतरचा टप्पा होता तो म्हणजे साम्राज्यातील टाकसाळीवरच्या हुकूमतीचा.

प्रत्येक राज्यामध्ये आपल्या राजाच्या नावाने नाणी पाडली जायची. शीख साम्राज्यामध्ये मात्र या टाकसाळीचा ताबा मोरा माई यांनी घेतला होता. त्यामुळे अनेक नाण्यांवरती त्यांचे नाव लिहिलेले असायचे. या नाण्यांना मोराशाही नाणी म्हणून ओळखले जाई.

काही लोकांच्या अनुसार महाराजाने या स्त्रीशी लग्न केले होते. ही त्यांची पहिली मुस्लीम महाराणी होती. पण अर्थात या दाव्यांना पूर्ण करण्यासाठी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.

महाराजा रणजीत सिंह यांनी अमृतसर मधील एका मुस्लिम नर्तकी शिव विवाह केला होता अशी एक नोंद मात्र आढळते. तिला त्यांनी लाहोरच्या शाही किल्ल्यामध्ये देखील जागा दिली होती. पण तिचे नाव गुल बेगम असे सांगण्यात येते.

त्याचे कारण सांगताना इतिहासकार इकबाल कैसर म्हणतात, की गुल बेगम ही फक्त एक नाचणारीण होती. ती बाकी व्यवसाय करत नसे. म्हणून जेव्हा महाराजा रणजीत सिंह यांनी तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी विचारले तेव्हा तिने यासाठी नकार दिला.

“माझा धर्म मला असे करण्याची अनुमती देत नाही. तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर माझ्याशी विवाह करावा लागेल”

असे तिने स्पष्टपणे सांगितले.

म्हणून महाराजा रणजीत सिंह यांना गुल बेगम सोबत लग्न करावे लागले. मोरा माई तिच्यासोबत व्यवहार करताना त्यांना तशी कुठलीही अडचण आली नाही म्हणूनच कदाचित रणजीत सिंह यांनी तिच्याशी विवाह केला नसावा.”

नूर अहमद चिश्ती या समकालीन माणसाने काही घडामोडींचे वर्णन आपल्या लेखनात केले आहे . त्याचे पुस्तक ‘तहक़ीक़ात-ए-चिश्ती’ मध्ये मोरा बाई यांच्या संदर्भात केलेले काही लेखन आढळते. त्यांच्यामते मोरा माई हिने लाहोरमध्ये मशीद बनवण्या पाठीमागे रंजीत सिंह यांचाही संदर्भ होता.

त्याकाळात लाहोरमध्ये वजीर खान नावाची एक प्रसिद्ध मशीद होती. त्या इमारतीचा एक भाग म्हणजे तिचा प्रचंड मोठा मिनार होता. या मिनारावर चढून महाराजा रणजीत सिंह आणि मोरा माई यांनी काही वेळ सोबत घालवला होता. नंतरच्या काळात आपण असे काम करणे वाईट होते असे मोरा माई यांना वाटले.

म्हणून त्यांनी स्वतः आपल्या खर्चाने एक मशीद बनवून घेतली. या मशिदीलाच आज लाहोरमध्ये मोरा माई मशिद म्हणून ओळखले जाते. काळाच्या ओघात तिचे महत्व प्रचंड वाढले आहे. या मशिदीला आता जामा मशिद असा दर्जा मिळाला आहे .

काही लोकांच्या मतानुसार रणजीत सिंह यांच्या या प्रेयसीने एक मंदिर देखील बनवले होते. त्या काळात ते लाहोर मधील एक प्रचंड मोठे मंदिर होते.

पण नंतर पाकिस्तान बनल्याने या मंदिराचा ऱ्हास सुरू झाला या मंदिराचा फार छोटा हिस्सा अजूनही अस्तित्वात आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एकदा मोरा माई यांच्या आईला भुताची बाधा झाली होती यामुळे त्या प्रचंड अस्वस्थ होत्या. इथरा भागातील एका मंदिराच्या पुजाऱ्यांनीे त्यांना सल्ला दिला. जर या मंदिराचे काम तुम्ही पूर्ण केले तर हे भूत निघून जाईल अशी मात्रा त्याने सांगितली. यावर विश्वास ठेवून मोरा माई यांनी या मंदिराचे निर्माण केले.

मंदिराचा मुख्य भाग, भिंती आणि दरवाजे अजूनही शाबूत आहेत. पण मंदिराच्या बाकीच्या भागांवर आता लोकांनी आपापली घरे चढवली आहेत.

अर्थात आयुष्याच्या शेवटच्या काळात मोरा माई यांच्यासोबत काय झाले याचा कुठलाच पुरावा नाही. एकीकडे शीख साम्राज्यातील राण्या महाराण्या आणि राजघराण्यातील स्त्रियांना विशेष वागणूक मिळाली. त्यांचे स्मारक उभारले गेले. पण मोरा माई यांचे कुठेच नाव अस्तित्वात नाही. केवळ लाहोरमधील काही लोकांच्या मनामध्ये त्यांची स्मृती अजूनही शाबूत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.