मोहींदर अमरनाथ यांनी क्रिकेटर रणवीर सिंगला मैदानाबाहेर काढलं होतं

आयुष्य हे अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं. कधी कोणती घटना आयुष्यावर दूरगामी परिणाम करुन जाईल हे कोणालाच सांगता येणार नाही.

आज आम्ही तुम्हाला एक असाच प्रसंग सांगणार आहोत. हा प्रसंग बाॅलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगच्या आयुष्यात घडला आहे.

आज रणवीरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या करियरला कलाटणी देणारा हा किस्सा.

घडलं असं की, रणवीर तेव्हा सातवी किंवा आठवीला असावा. तो मुंबईत बांद्र्याला असणा-या ‘लर्नर अकॅडमी’ या शाळेत शिकत होता. त्यावेळी रणवीर शाळेतर्फे क्रिकेट खेळायचा. एकदा ‘गाईल्स शिल्ड’ या आंतरशालेय क्रिकेट टूर्नामेंटमध्ये रणवीरने ४६ बाॅल मध्ये ७१ रन केले.

रणवीरने त्या वेळी मैदानात चौकारांची बरसात केली आणि धडाकेबाज ७१ रन्सची खेळी केली. त्यावेळी रणवीरची सर्वांनी वाहवा केली. इतकंच नव्हे तर दुस-या दिवशी पेपरमध्ये रणवीरचा फोटो देखील छापून आला.

ते वय असं असतं की त्यावेळी आपण मित्रांच्या फार प्रभावाखाली असतो. मित्र जे करतील तेच आपण करायचं, असं आपल्याला वाटत असतं. रणवीरच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. रणवीरचे जे शाळेतले खास मित्र होते ते क्रिकेटच्या बाबतीत फार गंभीर होते. ते मित्र ‘मोहींदर अमरनाथ अकॅडमी’ मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जाणार होते.

आपले खास मित्र तिथे चाललेत तर मी इथे एकटा पडेल, या भावनेने रणवीर सुद्धा त्या ॲकडमीत जाण्यासाठी तयार झाला.

जसं मुंबईतील प्रत्येक क्रिकेटरला एकदा दादरच्या शिवाजी पार्कवर खेळण्याची इच्छा असते तसंच भविष्यात क्रिकेटच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शालेय विद्यार्थी ‘मोहींदर अमरनाथ अकॅडमी’ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मुंबईतील खार जिमखानाच्या इथे हि अकॅडमी आहे.

या अकॅडमीत प्रवेश व्हावा या उद्देशाने रणवीरचे मित्र वेळेवर पोहोचले. रणवीर मात्र उशीरा तिथे पोहचला. तो मैदानात पोहोचताच नक्की कुठे जायचं, या विचाराने गोंधळला होता. तेव्हा मैदानात क्रिकेटर मोहींदर अमरनाथ स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

रणवीरने त्यांच्याकडे पाहिलं आणि आधीच उशीर झाल्याने तो धावत जाऊन थेट मोहींदर अमरनाथांना भेटला. रणवीरचं उशीरा येणं मोहींदर अमरनाथांना खटकलं. त्यांनी तिथल्या तिथे रणवीरला अकॅडमीतून बाहेरचा रस्ता दाखवला.

जर त्या वेळी रणवीर वेळेवर पोहोचला असता आणि त्याने अकॅडमीत प्रवेश घेतला असता तर कदाचित आज रणवीर अभिनय क्षेत्रात नसता.

कबीर खान दिग्दर्शित ’83’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग १९८३ च्या भारतीय संघाचे कॅप्टन कपील देव यांची भूमिका साकारत आहे. त्यावेळी मोहींदर अमरनाथांनी रणवीरला मैदानाबाहेर काढलं होतं. आणि आज ’83’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रणवीर सिंग मोहींदर अमरनाथांशी जोडला गेला आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.