रणवीरने स्ट्रगलच्या काळात झाडू मारण्यापासून कास्टिंग काऊच पर्यन्त सगळं अनुभवलं आहे.

फॅमिली फंक्शन मध्ये काही इरिटेटिंग लहान मुले असतात ठाऊक आहे ना? उगाचच चोम्बडेपणा करणारी? तसाच हा एक छोटा सात आठ वर्षाचा मुलगा. कोणी बघो न बघो पण पार्टीमध्ये जुम्मा चुम्मा दे दे गाण सुरु करून त्यावर नाचायला लागायचा आणि तासभर नाचायचा. घरच्यांना ओढून बाहेर काढावं लागायचं पण गडी ऐकायचा नाही. अंगात हिरो बनायचं भूत शिरलेलं.

रणवीरसिंग जगजीतसिंग भवनानी त्याचं पूर्ण नाव.

फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेलं सिंधी कुटुंब. लांबून कुठून तरी कोणी तरी अनिल कपूरच्या फामिलीशी रिलेटेड. बाकी तसा सिनेमाशी काही संबंध नाही. पण रणवीरला एकदम लहानपणी देखील कोणी विचारलं की, बेटा बडा बनके क्या बनेगा? तर हा सांगायचा अंाटी मै हिरो बनुंगा. त्या छोट्याशा मोटू पोराला एवढ्या आत्मविश्वासाने बोलताना ऐकून पण ती आंटी हसायची.

खरं म्हणजे रणवीरच्या डोक्यात हिरो बनायचं खुळ त्याच्या आज्जीने सोडलेलं. ती होती अमिताभ बच्चनची खूप मोठी फॅन. कायम तिच्या खोलीत बच्चनची गाणी लागलेली असायची. त्यावर रणवीर नाचायचा.  दर दोन दिवसांनी ती बच्चनच्या दिवार वगैरे सिनेमाच्या व्हीसीआर मागवायची आणि आपल्या सारख्याच फिल्मी असणाऱ्या या नातवाला मांडीवर बसवून त्याला ते सिनेमे दाखवयाची. रणवीरला तिने न कळत्या वयात देखील निक्षून सांगितलेलं,

“आगे चलकर तुझे अमिताभ बच्चन बनना है.”

रणवीरच्या डोक्यात ही गोष्ट फिट बसली होती. कॉलेजमध्ये जाई पर्यंत त्याला आपण हिरो असल्यासारखंचं वाटायचं. तसही शाळेत हुशार वगैरे होता. जिथे जाईल तिथे अभिनयाचे पारितोषिक मिळवायचा. पण कॉलेजमध्ये आल्यावर डोळे उघडले. जे स्वप्न आपण बघतोय ते केवळ अशक्य आहे, व्यवस्थित शिकून एखादी चांगली नोकरी पदरात पाडू, ९ ते ५ नोकरी करून निवांत मध्यमवर्गीय आयुष्य जगायचं हे त्यानं ठरवलं.

याच दरम्यान त्याला अमेरिकेतल्या इंडियाना विद्यापीठात कम्युनिकेशन स्टडीज साठी प्रवेश मिळाला. तिथे तो अॅडमिशन घेण्यासाठी पोहचला तोवर बाकीच्याचे क्लास सुरु झाले होते. त्या विद्यापीठाचा एक नियम आहे की तुमचे ग्रेड पूर्ण करण्यासाठी तुम्हाला  तुमच्या मेजर सब्जेक्टच्या बाहेरचा एक विषय निवडावा होता. बाकी सगळे वर्ग भरले होते फक्त एकाच वर्गात एकच जागा शिल्लक होती. तो वर्ग होता अभिनयाचा!!

हो तोच अभिनय ज्याला रणवीरने झेव्हियर्स कॉलेजच्या पायऱ्यांवर रामराम केला होता. अॅक्टिंग त्याची पाठ सोडत नव्हता. 

त्या वर्गात गेल्या गेल्या तिथल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले की स्टेजवर जा आणि काहीही करून दाखव. गाण म्हण, डान्स कर काहीही कर. रणवीरला तेव्हा आज्जी आठवली, अमिताभ बच्चन आठवला. तो स्टेजवर गेला आणि त्याने तोंडपाठ असलेल्या दिवार मधला एक सीन एकदम जीव लावून म्हणून दाखवला,

“उफ्फ तुम्हारे उसूल तुम्हारे आदर्श. क्या काम के है तुम्हारे उसूल.”

त्या पूर्ण भरलेल्या वर्गात एकालाही हिंदी कळत नव्हते. रणवीरच्या त्या परफोर्ममन्स नंतर काही क्षण शांतता पसरली. नंतर छप्पर कोसळाव असा टाळ्यांचा गडगडाट झाला. अमेरिकन पोरांना वाटलं खरोखर कोणी तरी बॉलीवूड हिरो आपल्या इथे आला आहे. रणवीरने इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये अभिनयाच शास्त्रशुद्ध तंत्र शिकून घेतलं.

अमेरिकेतल शिक्षण संपवून तो भारतात परत आला. अॅड्व्ह्रटाइझिंग एजन्सी मध्ये काम करू लागला. पण तो पर्यंत त्याचं डिसाइड झालेलं. आता माग फिरायचं नाही. आपल्या नशिबात हिरो बनायचंचं लिहिलेलं आहे. तेच करायचं.

त्याकाळात त्याचा एक मित्र शाद अली फिल्म बनवत होता, झूम बराबर झूम. निर्माते होते यश चोप्रा.

रणवीरने सेटिंग लावून तिथे असिस्टंट डिरेक्टरचा जोब मिळवला. असिस्टंट म्हणून सेटवर पडेल ते काम केलं. हिरोईनचे नखरे सांभाळले, हिरोच्या शिव्या खाल्ल्या. रात्रंदिवस काम करत असताना एक दिवस त्याला जाणवलं की यातून अभिनेता म्हणून आपण ग्रो होत नाही आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळे, बाहेर येत असलेलं पोट बघून त्यान ठरवलं आता नोकरी बास.

घरच्याचा या सगळ्यासाठी पूर्ण सपोर्ट होता. त्यांना ठाऊक होतं तासनतास आरशापुढे घालवणारा हा मुलगा दुसर काहीही करणार नाही. त्याला हिरोच बनू द्याव. रणवीरच्या वडिलानी देखील मनावर घेतलं. त्याच्यासाठी आपलं बांद्रयामधलं मोठं घर विकल, कार विकली आणि सगळे पैसे त्याच्या हिरो बनण्याच्या स्ट्रगल मागे लावले. रणवीरने स्वतःचा पोर्टफोलियो बनवला पण त्याने काळजी घेतली की कितीही पैसेखर्च होऊ देत तिथे तडजोड करायची नाही. 

शाद अलीने त्याला किशोर नमित कपूरकडे पाठवले. किशोर नमित कपूर स्कूल हे मुंबईमधील सर्वोत्तम आणि सर्वात महाग अॅक्टिंग स्कूल समजले जाते. पण काही दिवसातच रणवीर तिथे कन्टाळला. किशोर नमित कपूर फक्त मसाला सिनेमात अभिनय कसा करायचा याच प्रशिक्षण देतात असं त्याला वाटायचं. रणवीरला त्याच्या पलीकडे जायचं होतं. पण शाद अलीने त्याला तो क्लास सोडू दिल नाही.

पण रणवीर किशोर नमित कपूरचा क्लास संपल्यावर सरळ पृथ्वी थिएटर मध्ये गेला. भारतातले नाट्यक्षेत्रातले सर्वात बापलोक तिथे असतात. रणवीरला तिथे कोणी घास पण टाकेना. त्याकाळात मकरंद देशपांडेंच्या एका नाटकाची प्रक्टिस तिथे चालेली असायची. रणवीर त्यांना भेटायचा प्रयत्न करायचा पण मकरंद देशपांडे नेहमीप्रमाणे सगळ्या स्ट्रगलरन चुकवून आपल्या नाटकाच्या तयारीला लागायचा.

एक दिवस रणवीरने ठरवलं काहीही करून त्यांच्यात प्रवेश मिळवायचाचं. त्याने तिथल्या वॉचमनला पटवल. वॉचमनने त्याला सांगितलं की सकाळी आठ वाजता अशा अशा एका खोलीत मकरंदच्या नाटकाची तालीम चालते. रणवीरने त्याच्याकडून त्या खोलीची चावी घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच तिथे पोहचला. पूर्ण खोली झाडून चकाचक केली आणि वाट बघत बसला. थोड्या वेळाने एकएक करत सगळे कलाकार आले. मकरंद देशपांडे देखील होता. कोणालाच माहित नव्हत हा नवीन मुलगा कोण आहे? सगळ्यांना वाटलं मकरंदने त्याला मदतीला बोलावलंय. तर मकरंदला वाटलं की पृथ्वीवाल्यांनी स्वच्छता वगैरे करण्यासाठी या मुलाला पाठवलय. कोणीच विशेष चौकशी केली नाही. तसही रणवीरचा त्यांना काही त्रास नव्हता. सगळी कामगारवर्गाची कामे त्याने आपल्या अंगावर घेतली. धावतपळत जाऊन सगळ्यांना चहा आणणे पासून सेटवर सुतारकाम करणे, ड्रेपरी गोळा करणे काय आणि काय? कधीचं दोन्ही पायावर शांत राहणे त्याला ठाऊक नव्हते.

मकरंद म्हणायचा,

“ये बंदा इतनी एनर्जी लाता कहा से है? “

अखेर त्याला पुढच्या नाटकात एक फुटकळ रोल दिला गेला. रणवीरचा डायलॉग असयाचा एका ओळीचा पण गडी स्वतःच्या पदरचे चार वाक्य घालून नाटकात भाव खाऊन जायचा. पुढे त्याला आणखीन मोठे रोल मिळाले.

मग सुरु केला फिल्मइंडस्ट्रीमधला स्ट्रगल. 

आपला जबरदस्त पोर्टफोलियो, स्ट्रॉंग प्रोफाईल घेऊन तो वेगवेगळ्या स्टुडियोचे चक्कर मारू लागला. एकदा त्याला एका कास्टिंग डिरेक्टरने अप्रत्यक्षरीत्या सुचवले की आपल्या सोबत रात्र घालवलीस तर तुला हवा तो रोल मिळवून देईन. पण रणवीरला धक्का बसला. एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाला कास्टिंग काऊचसाठी विचारतो हेच खूप धक्कादायक होतं.

रणवीर तिथून पळाला, घरी गेल्यावर तो खूप रडला पण स्वतःवरचा कॉन्फीडन्स ढळू दिला नाही. घरच्यांना त्याने आपल्याशी काय घडतंय हे कधीच कळू दिल नाही.

अखेर अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. दोन तीन सिनेमाचा लीड रोल त्याला ऑफर झाले. रणवीरने त्यांची ऑडिशन दिली होती. पण ते खूप मोठे प्रोजेक्ट नव्हते.मिड बजेट नॉर्मल सिनेमे होते. रणवीरने त्याला नकार दिला. लोकांनी त्याला खुळ्यात काढलं. ज्यासाठी आयुष्यभर वाट पाहिली ती अपोर्च्यूनीटी समोर आली तेव्हा मात्र तो नाही म्हणत होता.

रणवीरचा स्वतःवर खूप आत्मविश्वास होता. जर आपल्याला मोठ्या बॅनरमध्ये फक्त एक जरी स्क्रीनटेस्ट मिळाली तरी आपण फोडून टाकू याची त्याला खात्री होती. आपल्या दोस्तांकरवी यशराज स्टुडीओ मध्ये ऑडीशनचे प्रयत्न चालवले होते. यापूर्वी त्याने तिथे असिस्टंट म्हणून काम केले असल्यामुळे त्याच्या थोड्याफार ओळखी तर होत्या.

यशराजची कास्टिंग डिरेक्टर होती शानू शर्मा. ती आदित्य चोप्राची पाहुणी लागत होती. तिने एकदा खूप वर्षापूर्वी एका डिस्कोमध्ये नाचताना सोळा वर्षाच्या रणवीरला सहज म्हटल होतं की,

“तेरे मै कुछ तो बात है. तू स्टार बनेगा.”

त्या शानू शर्माने यशराजच्या नव्या सिनेमासाठी रणवीरची स्क्रीनटेस्ट घेतली. रणवीरला वाटलं की यशराजमध्ये कायम हिरो शाहरुख सारखा मोठा सुपरस्टार असतो, आपल्याला त्याचा भाऊ मित्र असा कोणता तरी मोठा रोल तरी मिळेल. पण त्याला नंतर सांगितलं गेलं की हा रोल हिरोसाठी आहे.

एकेदिवशी रणवीर आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन डेट वर गेला होता. तिथे त्याच्या मोबाईलवर शानूचा फोन आला. रणवीरने उचलला नाही. तिने तीन चार वेळा फोन केला पण रणवीर गर्लफ्रेंड नाराज होऊ नये म्हणून त्या कॉलकडे दुर्लक्ष करत होता. अखेर कंटाळून शानू ने त्याला एक मेसेज केला. रणवीरने हळूच तो मेसेज ओपन केला. त्यात फक्त दोन शब्द होते.

 “आदित्य चोप्रा”

रणवीर सिंगचं आयुष्य त्या दोन शब्दांनी बदलून गेलं. त्याच्यासारख्या फिल्म इंडस्ट्रीच्या आउटसाईडर ला यशराज बॅनरचा ‘बँड बाजा बारात’ हा सिनेमा मिळाला होता. पहिलाच पिक्चर हिट झाला. त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. रणवीरवर अवाॅर्डचा पाऊस पडला.

 ‘बँड बाजा बारात’ ब्लॉकबस्टर झाल्यावर लोकांना वाटले होते की हा फ्लूक आहे, रणवीर ओव्हरअॅक्टिंग करतो, हे सक्सेस यशराजच्या नावामुळे मिळालेवगैरे वगैरे बरीच टीका झाली पण लुटेरा, दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी, पद्मावत, गली बॉय रणवीर एका मागोमाग एक सिनेमात प्रेक्षकांना धक्का देतच गेला. 

बँड बाजा बारात रिलीज झाला त्याला नऊ वर्षे उलटून गेली आहेत. त्याचे यश एखाद्या फिल्मप्रमाणे स्वप्नवत आहे . एका आज्जीने आपल्या नातवाला हिरो बनवायच्या स्वप्नापासून सुरु झालेला रणवीरसिंगचा प्रवास भारतातला सर्वात मोठा स्टार या पदावर जाऊन पोहचला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.