रावसाहेब दानवेंना ६५ रुपयांच्या चेकसाठी आपली ओळख पटवून द्यायला लागली होती…

रावसाहेब दानवे. सध्याचे जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री. गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत आला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये देखील ते केंद्रात Consumer Affairs मंत्री होते. पण दानवेंना संपूर्ण महाराष्ट्र एक केंद्रीय मंत्री यापेक्षा एक अघळपघळ आणि गमतीदार बोलणारा नेता म्हणून जास्त ओळखतो.

रावसाहेब दानवे यांनी आपल्या बोलण्यातील बिनधास्त पणा, त्यातला अस्सल गावरान बाज, मुद्देसूद मांडणीपेक्षा अघळ-पघळ बोलून, किस्से सांगून समोरच्या कार्यकर्त्यांची मन जिंकणारा नेता अशी ओळख  मिळवली आहे. आज त्यांनी औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात असाच एक गमतीदार किस्सा सांगून जुन्या प्रसंगाची आठवण करून दिली आहे.

हा प्रसंग आहे साधारण १९७९-८० च्या काळातील. 

खरतर त्यांनी राजकारणात पडावं असं त्यांच्या घरातल्यांना अजिबात वाटत नव्हतं. नोकरी करून चार पैसे कमवावे असा अट्टहास होता. पण दानवे जनता पक्षातून राजकारणात आले. १९७७ चा तो काळ, देशात नव्यानेच जनता पक्षाची स्थापना झाली होती. दानवे सांगतात गावात कोणीच त्या पक्षाचे अध्यक्ष व्हायला तयार नव्हते, म्हणून मीच अध्यक्ष झालो.

दानवेंचे वय त्यावेळी इनमीन १८ असावं. तर मतदानासाठी वय २१ होतं. पण त्यांनी त्यावर्षी गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि अठराव्या वर्षी सरपंच झाले. 

पुढच्या वर्षातच भोकरदन तालुक्याच्या पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली. २०-२१ व्या वर्षी दानवेंनी त्या निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं. त्यावेळी भाजप नव्हता, जनता पक्ष होता, आणि नांगराच्या चिन्हावर रावसाहेब निवडून आले आणि पंचायत समितीचे सभापती पण झाले. मात्र ते पहिल्यांदा पंचायत समितीचे सभापती झाले होते तेव्हा त्यांच्या गावात साधी खबरसुद्धा नव्हती.

भोकरदनमधली विजयी मिरवणूक आटपून मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन रावसाहेब रात्री आपल्या गावात गेले. अपेक्षा होती की गावात ताशा असेल. मिरवणूक निघेल. पण गाव सुमसाम. झोपी गेलेलं. रावसाहेब घरी गेले. जेवायला काही नव्हतं. तुराटीनी आईनी पिठलं हाटून दिलं. भाकरी होईपर्यंत धीर नव्हता. पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापतीने पहिल्या रात्री मित्रांसोबत फक्त पिठलं खाऊन विजय साजरा केला.

रावसाहेब दानवे सभापती झाल्याची खबर जशी गाववाल्यांना नव्हती तशीच खबर किंवा माहिती बँक अधिकाऱ्याला पण नव्हती. त्यामुळे जेव्हा रावसाहेब ६५ रुपयांचा चेक वटवायला गेले तेव्हा त्यांना आपली ओळख पटवून द्यायला लागली होती. 

रावसाहेब त्यावेळी पंचायत समितीचे सभापती होऊन जिल्हा परिषदेचे सदस्य देखील झाले. दानवे यांनी आज त्यावेळची एक आठवण सांगितली आहे.

ग्रामीण विकासाची पाया म्हणजे जिल्हा परिषद. दानवे जिल्हा परिषदेचा सदस्य होते. सदस्य या नात्यानं त्यांना तेव्हा ६५ रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला. मात्र जेव्हा हा चेक घेऊन ते बँकेत गेले तेव्हा मॅनेजर काही त्यांना कॅश देईना. इतकंच काय तर दानवेंनी मॅनेजरने ओळखलं देखील नाही. कारण दानवे सभापती असतील असं त्यांना वाटत नव्हतं.

बँक अधिकाऱ्याने अखेरपर्यंत दानवेंना ओळखलं नाही.

एवढा लहान सभापती असतो का?, असं बँक अधिकारी म्हणाले.

शेवटी दानवेंना काही तरी करून ओळख करुन द्यावी लागली. आणि त्यानंतरच त्यांना त्या ६५ रुपयांचा चेक मिळाला. पुढे दानवे २ वेळा भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले. १९९९  नंतर सलग ५ वेळा जालना लोकसभा मतदार संघातून खासदार झाले आणि २ वेळा केंद्रीय मंत्रिपदापर्यंत देखील त्यांनी मजल मारली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.