जनता म्हणतेय रावसाहेब दानवेंनी एकदा लालूंच रेल्वे अर्थशास्त्र वाचलं पाहिजे…

दोन दिवसांपासून रावसाहेब दानवे यांचं एक वक्तव्य बरंच चर्चेत आहे. हे वक्तव्य त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून केलेलं आहे. रावसाहेब दानवे काल म्हणाले,

कोरोनाच्या काळात भारतीय रेल्वेच्या सेवा लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या काळात रेल्वेला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे. आता कोट्यवधींच म्हणजे किती? तर भारतीय रेल्वेला या काळात तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. या काळात मालगाड्यांनी मात्र हा तोटा कमी करण्यास चांगला आधार दिला.

रेल्वे राज्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर जनतेमधून दानवेंना एक सल्ला दिला जात आहे, तो म्हणजे सरकारला तोटा झाला हि सांगायची गोष्ट नाही. तर तो भरून कसा काढायचा, रेल्वेला फायद्यात कसे आणायचे याबाबत विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच सध्या रावसाहेब दानवे यांना रेल्वेच्या बाबतीमधील लालूप्रसाद यादव यांचं अर्थशास्त्र वाचण्याचा सल्ला दिला जात आहे.

कारण लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री व्हायच्या आधीच्या काळात देखील रेल्वे भरमसाठ तोट्यात होती, मात्र त्यांनी ती इतिहासात पहिल्यांदाच फायद्यात आणून दाखवली होती.

सरकारचा कोणताही प्रकल्प, योजना हि जनतेच्या फायद्यासाठी सुरु केलेली जात असते. त्यातून सरकारने फायदा होईलच याबद्दलची अपेक्षा ठेवायची नसते. त्यामुळे प्रसंगी अनेक प्रकल्प तोट्यात चालवावे लागतात. असाच एक प्रकल्प म्हणजे भारतीय रेल्वे. रेल्वे देखील अगदी सुरुवातीपासूनच तोट्यात असायची.

पण लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री झाले आणि खात्याचा कारभारच बदला.

गोष्ट आहे २००६ मधली. कॉंग्रेसने मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करून २ वर्ष झाली होती. याच सरकारमध्ये लालू यादव रेल्वेमंत्री होते. त्यांनी जेव्हा रेल्वेमंत्रिपदाची सूत्र घेतली होती तेव्हा रेल्वे जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. रोख शिल्लक २५९ कोटींवर घसरली होती. ऑपरेटिंग रेश्यो ९८ टक्क्यांवर वर होता. अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले होते.

त्यामुळे रेल्वेचे खाजगीकरण करण्याबाबतच्या चर्चा देखील चालू होत्या.

तसेच लालू प्रसाद बिहारचे मुख्यमंत्री असताना फक्त चारा घोटाळ्यामुळे सर्वाना परिचित होते. असा हा भ्रष्टाचाराचा शिक्का बसलेला बिहारचा ‘रांगडा गडी’ देशव्यापी, अवाढव्य पसाऱ्याच्या रेल्वेचा कारभार कसा काय सांभाळणार, लालू रेल्वेला आता आणखी गाळात घालणार, अशी अनेकांनी अटकळ बांधली होती.

लालू आपल्या ‘गोपालगंज से रायसीना’ या आत्मचरित्रात सांगतात, एकदा एका पत्रकार परिषदेत लालूंना खाजगीकरणाच्या आणि इतर खर्च कमी करण्या संबंधीचे प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी भर परिषदेत सांगितले होते,

‘रेल्वेचे खासगीकरण होईल ते माझ्या मेलेल्या देहावरून. आणि पगारा संदर्भात सांगायचं झालं तर एकही रेल्वे कर्मचार्‍यांचा पगार कमी करणार नाही. आणि प्रवाशांचे भाडे वाढवले ​​जाणार नाही. परंतु नवीन रेल्वे लाईन सुरू केली जाईल आणि नवीन नवीन प्रोडक्शन युनिट उघडले जातील जेणेकरून नवीन रोजगार निर्माण होतील, असे सांगत त्यांनी खाजगीकरणाचा विषय फेटाळून लावला.

२००९ साल उजाडताना लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या बद्दल बोलल्या गेलेल्या सगळ्या अटकळी खोट्या ठरवल्या.

२००५ साली आल्या आल्या त्यांनी रेल्वेची प्रति वगन ५ टन या प्रमाणे मालवाहतूक क्षमता वाढवली. ज्यामुळे प्रतिवर्षी ९०० लाख टन वाहतूक क्षमता वाढली. सोबतच व्यापारी आणि कंपन्यांसाठी ट्रक्सद्वारे डोअर टू डोअर डिलिव्हरी हि योजना चालू केली. त्यामुळे अनेक जण रेल्वेद्वारे कमी पैशात मालवाहतुकीला प्राधान्य दिले.

सोबतच प्रवासी रेल्वेचे डबे आणि सरासरी वेग वाढवला. लालू प्रसाद यादव यांनी काही मार्केटिंग स्किल्स देखील रेल्वेत आणले. त्यांनी रेल्वे स्टेशन्सवरती फूड प्लाझा, एटीएम आणि सायबर कॅफेज सारखी सुविधा उपलब्ध करून दिली. यातून रोजगार तर वाढलेच शिवाय तरुण रेल्वेकडे आकर्षित झाले आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणजे रेल्वेचा महसूल वाढला. 

लालू प्रसाद यादव यांनी “Dynamic Pricing Policy” सारख्या योजना रेल्वेत आणल्या. सिझन आणि ऑफ सिजनमध्ये तिकिटांचे दर कमी जास्त ठेवायचे अशी ती योजना होती. यामुळे गणेशोत्सव, दिवाळी अशा ऐन हंगामात रेल्वेच्या महसुलात वाढ होऊ लागली.

लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे स्टेशनवर कागदी कप बंद करून चहासाठी कुल्हड सुरु केले. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योगांमध्ये वाढ झाली, सोबत रेल्वे स्टेशनवर साफ-सफाईसाठी खर्च होणार पैसा देखील वाचला. त्या वाचलेल्या कामाला रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेची साफसफाई करण्यावर आणखी भर दिला.

लालू सांगतात, या सगळ्याचे परिणाम २ वर्षातच दिसायला लागले. २००६ मध्ये रेल्वेचा महसूल सरप्लस वाढून १५ हजार कोटी झाला. आणि तोट्यातील रेल्वे पहिल्यांदाच नफ्याच्या रुळावर आणून दाखवली.

रेल्वेला नव-नवीन योजना सुरु करून केवळ लालू यादव यांनी फायद्यातच आणलं नाही, तर त्यांनी गरिबरथ सारख्या नवीन गाड्या पण सुरु केल्या. प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांनी रेल्वेत विनाआरक्षित कक्षात कुशनच्या सीट्स देखील आणल्या. सोबतच त्यांनी प्रवासी भाड्यात कपात करण्याची घोषणा केली.

मात्र लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री पदावरून गेल्यानंतर लालूंच्या या अर्थशास्त्राबद्दल अनेक चर्चा सुरु झाल्या. त्यांनी आकडे फुगवले, खोटी आकडेवारी सादर केली अशी टीका केली गेली. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांनी तर श्वेतपत्रिका काढायची घोषणा केली होती. आजही अशा टीका होतं राहातात. पण लालू प्रसाद यादव मात्र आपण रेल्वेला नफ्यात आणून दाखवलं होतं यावर ठाम आहेत. 

आता लालू प्रसाद यादव यांचं म्हणणं खरं धरलं तर आता रावसाहेब दानवे यांना देखील त्यांच्यासारखेच रेल्वेत अभिनव कल्पना राबवून, फायद्याची नवीन क्षेत्र शोधून त्यावर काम करायला हवे. त्यामुळेच कोरोना काळात झालेला तोटा पुन्हा भरून निघण्यास मदत होणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.