रावसाहेब दानवेंना पहिल्यांदा आमदार करण्यासाठी शरद पवार प्रचाराला आले होते…

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथं बोलताना त्यांनी लातूरचं मराठवाड्यातला सुधारलेला जिल्हा म्हणून कौतुक केलं. जेव्हा लातूरकरांच्या मागण्यांचा विषय आला, तेव्हा दानवे म्हणाले, ‘तुमच्या प्रस्तावित मागण्यांपैकी काही मागण्या या टर्ममध्ये मंजूर करतो आणि काही पुढच्या सरकारमध्ये. २०२४ मध्येही रेल्वेमंत्री मीच असणार आहे.’

दानवेंच्या या उत्तरानंतर चर्चा सुरु झाली त्यांना मोठी जबाबदारी मिळणार का याची, पण ही गोष्ट आहे दानवेंच्या त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या निवडणूकीची. ज्यात त्यांना निवडून आणण्यासाठी थेट शरद पवारांना मैदानात यायला लागलं होतं.

गोष्ट आहे १९८४ सालची.

इंदिरा गांधीच्या हत्येमुळे तयार झालेल्या सहानुभुतीच्या लाटेवर काँग्रेसने लोकसभेत ४०४ जागा मिळवल्या होत्या. तर त्यावेळी शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे ४ खासदार निवडून आले होते. त्याचवेळी भाजप- शिवसेनेची युती होती. त्यांचे देशभरातून २ खासदार विजयी झाले होते. हे दोन्ही भाजपचे होते. शिवनेनेनं मुंबईच्या २ जागांवर निवडणूक लढवली होती, दोन्हीत त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९८५ साली महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. पवारांनी सत्तेत परतण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी पवारांच्या समाजवादी काँग्रेस आणि जनता पक्ष यांचं ‘पुलोद’ कामाला लागलं. पण यावेळी याच पुलोदमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडून भाजप देखील आला होता.

भाजपसाठी तो अगदी नव्याचा काळ होता. लोकसभेतील पराभवामुळे लोकं चिडवायचे, अक्षरशः टिंगल उडवायचे. सरकार चालवणार कोण? ज्यांचे खासदार दोन. जिस दिये मे तेल नही सरकार चलाना कोई खेल नही. दानवे स्वतः सांगायचे वर्ष वर्ष गुलाल अंगावर पडत नसायचा.

त्यामुळे विधानसभेत समाधानकारक कामगिरी करण्यासाठी पक्षाने नवीन टीम उभी करायची ठरली. ती जबाबदारी दिली तरुण नेते प्रमोद महाजन यांच्यावर.

जागा वाटपात भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला होता. महाजनांनी इथून रावसाहेब दानवेंना बळे बळेचं उभं केलं. ते प्रमोद महाजनांच्या खास मर्जीतले. तसचं भाजपचे बहुमत नसताना काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यावर पंचायत समिती सभापतीच्या खुर्चीवर बसून त्यांनी या भागाला आपल्या राजकारणाची झलक दाखवली होती.

निवडणुकीची धामधूम, प्रचार सभांचा काळ सुरु झाला. काँग्रेसचे वारू चौफेर होते.

भोकरदनमधून दानवेंच्या विरोधात होते काँग्रेसचे नेते संतोष दसपुते. ते शरद पवारांची साथ सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले होते. पण या भागात शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. तसचं आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला भाजपनं मित्र पक्षांच्या नेत्यांच्या सभा देखील सुरु केल्या.

सहाजिकच शरद पवार यांची देखील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी काही ठिकाणी सभा ठेवण्यात आल्या. अशीच एक सभा भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी देखील आयोजित केली. पवार दानवेंच्या प्रचाराला दाखल झाले. सभा झाली देखील. निवडणूक पार पडली.

पण मतदारांनी काँग्रेसला कौल दिला होता. दासपुतेंकडून दानवेंचा १ हजार ५६८ असा थोडक्या मतांनी पराभव झाला. मात्र या अत्यल्प मतांच्या पराभवानचं ते अख्या मतदारसंघात चर्चेत आले होते. त्या निवडणुकीत पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसला ५४, जनता पक्षाला २० तर भाजपला अवघ्या १६ जागा मिळाल्या होत्या.

पुलोदनं शतक मारलं होतं. मात्र, सत्ता १६२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्याच हातात कायम राहिली होती. शरद पवार विरोधी पक्ष नेते बनले.

मात्र पराभवानंतर देखील दानवेंनी मतदारसंघात काम सुरु ठेवलं होतं. १९९० मध्ये भाजपची ताकद पण वाढली होती. दानवेंनी त्यावेळचे काँग्रेसचे प्रमुख नेते रंगनाथ पाटील यांचा तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आणि तेव्हापासून दानवे यांच्या याच विजयाचा अश्वमेध अद्यापपर्यंत कोणाला रोखता आला नाही.

पुढे १९९५ साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. यानंतर १९९९ पासून सलग ते जालना मतदासंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.