भारतीय क्रांतिकारकांने बनवलेली डिश गेली नव्वद वर्षे जपान मध्ये धुमाकूळ घालतेय

गोष्ट आहे १९१५ सालची. जपानच्या टोकियो शहरामध्ये एक नाकामुराया नावाची एक बेकरी आहे. आयझो सोमा नावाच्या व्यक्तीची ही छोटीशी बेकरी. तिथे ब्रेड वगैरे बनवायला ३-४ महिला येत. बाकी सोमा यांच्या घरचे आणि त्या महिला मिळून ही बेकरी चालवत.

या बेकरीमध्ये एक भारतीय तरुण देखील होता. तो त्यांना लागेल ती मदत करायचा. तो कुठून आला, तो त्यांच्या सोबत का राहतोय हे फक्त आयझो सोमा सोडून कोणालाही माहीत नव्हतं. मनमिळाऊ व खेळकर स्वभावाने त्याने घरातल्या प्रत्येकाचं मन जिंकलं होत.

पण तो काही साधासुधा असामी नव्हता. ते होते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान क्रांतिकारक रास बिहारी बोस.

बंगाल मध्ये जन्मलेले रासबिहारी बोस हे सुरवातीला ब्रिटिश सरकारी नोकरीमध्ये होते. जेव्हा इंग्रजांनी बंगालची फाळणी केली तेव्हा ते पेटून उठले. आपल्या सरकारी नोकरीचा त्याग केला व हे जुलुमी सरकार उखडून फेकण्याची प्रतिज्ञा घेतली.

युगांतर या क्रांतिकारी संघटनेचे ते सदस्य बनले. बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं.

राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी व्हाईसरॉय लॉर्ड होर्डिंग हे किंग पंचम जॉर्जच्या दिल्ली दरबारमधून परत येत असताना हत्तीतून काढलेल्या मिरवणुकीत बॉम्बहल्ला करण्यात आला.

युगांतरचे प्रमुख अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मणिंद्र नाथ नायक यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अद्यातवासात जावे लागले.

वेषांतर करून रासबिहारी बोस पंजाबमध्ये पोहचले. तिथे राहून गदर संघटनेचे काही काळ काम केले.

त्यांना अनेक भाषा येत होत्या. वेषांतर करण्यात ते पटाईत होते. त्यांच्याइतका हजरजबाबीपणा क्वचितच कुणाकडे होता. या भांडवलावर ते इंग्रजांना गुंगारा देत राहिले. ब्रिटिशांची गुप्त पोलिसी प्रबळ संघटना ही फक्त या एकाच क्रांतिकारकास पकडू शकली नाही.

जवळपास ३ वर्षे इंग्रजांना हुलकावणी देऊन ते जपानला जाऊन पोहचले. रवींद्रनाथ टागोर यांच्या नातेवाईकांनी यासाठी त्यांना मदत केली.

इंग्लंडने जपानवर रासबिहारी बोस यांना पकडून परत पाठवून देण्याची मागणी केली मात्र जपान्यांनी तसे करण्यास नकार दिला. उलट त्यांना नाकामुराया बेकरीत लपवले.

रासबिहारी बोस यांच्या मागे अख्ख ब्रिटिश साम्राज्य लागलं होतं.

त्यांना बेकरीतुन बाहेर पडताही येत नव्हतं. मृत्यूची तलवार कायम डोक्यावर टांगती होती. पण रासबिहारी बाबू यांनी हे आव्हान देखील लीलया पेललं होतं. ज्यांची भाषा ही येत नाही अशा जपानी कुटुंबात ते सहज मिसळून गेले होते.

बेकरी मध्ये असताना त्यांना घरच्या खाण्याची खूप आठवण येत होती. सहज एकदा किचन मध्ये त्यांनी भात व चिकन करी बनवली. अस्सल भारतीय पद्धतीने बनवलेली ही डिश तिथल्या सर्वांना खूप आवडली.

१९२७ साली सोमा यांनी आपल्या बेकरीच्या वर एक रेस्टॉरंट सुरू केले त्यात मेन्यूकार्डमध्ये असलेली ही भारतीय करी तुफान फेमस झाली. लोक दुरदूरहून या करीची गंमत चाखायला येऊ लागले.

दरम्यानच्या काळात बऱ्याच घटना घडून गेल्या होत्या. सोमा यांच्या घरी नेहमी दिसणाऱ्या या भारतीय माणसाबद्दल जेव्हा नातेवाईक चौकशी करू लागले तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसावा म्हणून सोमा यांनी आपल्या लेकीचं रासबिहारी बोस यांच्या सोबत लग्न लावून दिलं.

अनोळखी व्यक्तीला आपण घरी ठेवून देखील घेत नाही इथे सोमा यांनी त्याला आपला जावई बनवलं.

images 4

रासबिहारी बोस जपानमध्ये गेले तरी स्वस्थ बसले नाहीत.मातृभूमीला स्वतंत्र करण्याची त्यांची प्रतिज्ञा अजून बाकी होती.

१९३९ साली दुसरे महयुद्ध पेटले. त्या युद्धात जपान जर्मनीच्या बाजूचा मित्रदेश होता. हि संधी मिळताच १९४२ मध्ये बॅंकॉक येथे रास बिहारींनी ठिकठिकाणच्या भारतीय क्रांतिकारकांना एकत्र बोलावले. जपानने युद्धबंदी केलेले भारतीय सेनाधिकारीही या बैठकिस हाजर होते. रासबिहारी स्वतः अध्यक्ष होते. तेथे इंडियन नॅशनल आर्मी स्थापन करण्याचे नक्की ठरले.

हीच ती सुप्रसिद्ध आझाद हिंद सेना.

पुढे सुभाषचंद्र बोस जपानला येऊन नेतृत्व स्वीकारू पर्यंत रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना रुजविण्याचे काम केले.

सुभाषबाबू व रासबिहारी बोस यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद हिंद सेना प्राणपणाने लढली मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.

१९४५ साली या दोन्ही नेत्यांचं एकामागोमाग एक निधन झालं. फक्त आझाद हिंद सेना नाही तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर याचा परिणाम झाला.

भारतीय मातृभूमीला स्वातंत्र्य मिळाल्याचं पाहायला रासबिहारी बोस राहिले नव्हते मात्र त्यांनी केलेल्या त्यागाची, त्यांच्या देशभक्तीची यशोगाथा मात्र नक्कीच उरली.

भारताच्या या क्रांतीविराच जपानमध्ये स्मरण मात्र त्यांच्या इंडियन करी या डिश साठी केलं जातं.आजही टोकियोच्या शिंजुकु प्रांतात आपल्या मूळ जागी नाकामुराया बेकरी व रेस्टॉरंट अजूनही उभे आहे. गेली नव्वद वर्षे इथे रासबिहारी बोस यांनी सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे इंडियन करीची डिश बनते आणि तुफान खपते. ही एक मल्टिबिलिनीयर कंपनी बनली असून त्यांची रेडी टू इट इंडियन करी हे प्रत्येक मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये सर्वाधिक खपणारी वस्तू आहे.

04 02 01

एका भारतीय स्वातंत्र्यवीराने बनवलेली रेसिपीवाली कंपनी जपानच्या स्टोक मार्केटमध्ये देखील धुमाकूळ घालताना दिसते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.