गेल्या २३ वर्षांपासून पुण्यातल्या गणपती विसर्जनात रांगोळीच्या पायघड्या आकर्षण ठरल्यात..

पुण्यातल्या गणेशोत्सवाची धूम काही औरचं असते. गणेश मंडळं, त्यांचे देखावे, सजावट, रोषणाई या सगळ्या गोष्टी डोळे दिपवून टाकणाऱ्या असतात. १० दिवसांच्या या उत्सवाबरोबरचं गणपती विसर्जनाची चर्चाही अख्ख्या जगभरात असते.  मानाचे पाच गणपती, ढोल ताशांचा गजर, त्यावर थिरकणारे लोक, दगडूशेठ हलवाई गणपतीची सजावट या सगळ्याच आकर्षणाच्या गोष्टी. पण या सगळ्यात चार चांद लावण्याचं काम करतं राष्ट्रीय काम अकॅडमी.

पुण्यातल्या गणपती विसर्जन मार्गावर कित्येक मोठं- मोठ्या रांगोळ्या काढून राष्ट्रीय कला अकॅडमी  सगळ्याचं लक्ष आपल्याकडं खेचत असते.  महत्वाचं म्हणजे या रांगोळ्या फक्त डिजाईन आणि रंगांपुरत्या नसतात, तर यातून जनजागृती करण्याचं काम राष्ट्रीय कला अकॅडमी करत असते. विसर्जन मिरवणुकीत जशी लोक गणपती आणि मिरणवूक पाहायला येतात, त्याचप्रमाणं राष्ट्रीय कला अकॅडमीच्या रांगोळ्याही पाहायला येतात. 

तर या प्रबोधनपर रांगोळ्या घालणाऱ्या राष्ट्रीय कला अकॅडमीची स्थापना १९९९ साली  झाली. ‘सहकार्य यशोधानम्’ या ब्रीदवाक्यासह ही संस्था पुण्यात सुरु करण्यात आली. मांगल्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या रांगोळीच्या माध्यमातून ही संस्था उभी राहिलीये.

राष्ट्रीय कला अकॅडमीच्या युट्युब चॅनेलवर सांगितल्याप्रमाणं, या संस्थेत अगदी ५ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतची सगळी मंडळी रांगोळी शिकण्यासाठी येतात. एवढंच नाही तर या अकॅडमीतल्या अनेकांना रांगोळीच्या माध्यमातून रोजगाराचंही साधन उपलब्ध झालंय. 

पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरलेलं रांगोळीचं पायघडी अभियान अशी या संस्थेची ओळख. गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रीय कला अकॅडमी या गणेशोस्तवात रांगोळ्यांच्या पायघड्या घालत असते.

दरम्यान, सुरुवातीला या अकॅडमीचे विद्यार्थी फक्त रांगोळीच्या माध्यमातून मंडईच्या चौकात जिथून विसर्जन मिरवणूक सुरु होते. तिथून ते अलका टॉकीज चौकापर्यंत अखंड पायघडी घालत जायचे. या नंतर त्यांनी रांगोळी हे माध्यम ठेवून काही प्रबोधनपर करायचं ठरवलं.

आणि मग काय एक एक विषय सुचत गेले. यात सामाजिक प्रबोधनाचे विषय समोर आले आणि ते रांगोळीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मांडले जाऊ लागले.

राष्ट्रीय कला अकॅडमीने प्रदूषण, वाहतुकीच्या समस्या, भ्रष्टाचार मुक्त भारत, स्त्री सक्षमीकरण या संदर्भात प्रबोधन केलं. दरवर्षी रांगोळीच्या माध्यमातून असा एक विषय मांडून सामाजिक प्रबोधन  करण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. 

गेल्या वर्षीही संस्थेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना जनजागृती करण्याचं काम केलं. यात मास्क घालणं, हॅन्ड सॅनिटायझ करणं या सगळ्या गोष्टींवर प्रबोधन केलं गेलं.

यंदा राष्ट्रीय कला अकॅडमीचं २३ वं वर्ष आहे. यावर्षीही कोरोनाचे निर्बंध असल्याने जरी संस्थेनं  रांगोळीच्या पायघड्या घातल्या नसल्या तरी मानाच्या पाचही गणपतीच्या पुढे प्रबोधनपर रांगोळ्या काढल्यात. ज्यात मुलांचं गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा मुलांवर झालेला परिणाम, नाट्यगृह बंद असल्याने कलाकारांचे झालेले नुकसान, कोरोना वॉरियर्स, कोरोनामुळे कामधंद्यावर आलेली गदा याविषयावर रांगोळ्या काढल्या गेल्यात. 

https://fb.watch/86QUts02KK/

https://fb.watch/86QVlJgIMH/

हे ही वाच भिडू :

 

1 Comment
  1. Prashant Baburao Naik says

    खूप सुंदर कपिलजी अप्रतिम लेख लिहला आहे हे जे कार्य चालु आहे त्याचे आम्ही साक्षीदार आहोत दर गणेशोत्सवात हे कार्य गेली 22 वर्ष अविरत चालु आहे त्याच बरोबर रंगावली चे प्रशिक्षण दिले जाते, आपले बोलू भिडू वरचे सर्व लेख आम्ही वाचतो खूप सुंदर वास्तववादी असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.