दिवाळीत सोनपापडीचा बोनस नाही तर टाटांनी हॉस्पिटल उभारायला १००० कोटी खर्च केले होते..
काय भिडूनो दिवाळीचा बोनस भेटला का नाही ?
भेटला असेल तरी काय सोनपापडीच्या वर आपली कंपनी काय जात नाही. एवढं तर दिलदार मालकांनी असू पण नये असा नियम…
असो पण तुम्हाला माहीत आहे का ? २०१७ च्या दिवाळीत टाटा सन्सनी दिवाळी गिफ्टसाठी तब्बल एक हजार कोटी मोजले होते.
होय, कॅन्सर पेशंटच्या दिवाळीसाठी…
२०१७ मध्ये रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे सर्वेसर्वा होते. त्यावेळी टाटा ट्रस्ट एक असा प्रोजेक्ट हाती घेणार होत, ज्यामुळे कॅन्सर रुग्णांना खूप स्वस्तात ट्रीटमेंट मिळेल. त्यासाठी त्यांना मुंबई हा एकच ऑप्शन न राहता, देशाच्या कानाकोपऱ्यात ही ट्रीटमेंट घेता आली पाहिजे. पण मग काय करता येईल यासाठी ट्रस्टवर असणाऱ्या लोकांनी बराच विचारविनिमय केला. त्यावर रतन टाटांच्या डोक्यातून एक क्लुप्ती आली. त्यानुसार टाटा ट्रस्टने १००० कोटी रुपये खर्च करायचे. ते ही केंद्र सरकारला सोबत घेऊन. आणि केंद्र सरकारने काय करायचं ? तर पुढाकार घेऊन त्या १००० कोटींचा खर्च करत देशातील पाच राज्यांमध्ये कॅन्सर केअरची रुग्णालय उभी करायची. ज्यामुळे देशातील प्रत्येक कॅन्सर पीडित रुग्णाला त्याचा लाभ घेता येईल.
टाटांच्या डोक्यात कॅन्सरची हॉस्पिटलच सुरू करायची का डोक्यात आलं ?
मुंबईत परेल मध्ये असणाऱ्या टाटांच्या कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलच्या धर्तीवर ही बाकीच्या राज्यात उभारण्यात येणारी हॉस्पिटल्स होती. कारण हे परेलच कॅन्सर हॉस्पिटल अत्यंत सुसज्ज आहे. आणि इथं देशी ते परदेशी रुग्ण कॅन्सरच्या उपचारासाठी येतात. या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या ६० टक्के रूग्णांना तर फ्री उपचारच मिळतात. आणि सोयसुविधेची अजिबातच वानवा नाही. हेच कारण असावं की भारतातल्या प्रत्येक राज्यातून येणारा कॅन्सर रुग्ण हेच हॉस्पिटल प्रेफर करतो. मग तो श्रीमंत असो वा गरीब याच्याशी रुग्णालयाला काही देणंघेणं नसतं. फक्त पेशंट बरा होणे ही पहिली प्रयोरिटी असते.
तुम्ही कधी जर परेलला गेलात तर या हॉस्पिटलच्या बाहेरची गर्दी बघा. परराज्यातून आलेले कित्येक रुग्णांचे नातेवाईक फुटपाथवरच राहताना तुम्हाला दिसतील. किती महिने राहावं लागेल सांगता येत नाही म्हणून कधी तंबूत तर कधी उघड्यावरच यांचा संसार मांडलेला दिसेल.
आणि हेच पाहिलं रतन टाटांनी आणि त्यांना वाटलं की देशात प्रत्येक ठिकाणी कॅन्सर रुग्णांची सोय झाली पाहिजे. आणि त्या विचारातूनच पाच राज्यात कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल उभी करण्याची आयडिया टाटांना सुचली.
आता आयडिया सुचली पण मग राज्य कोणती निवडायची ?
तर याआधी टाटांनी आसामच्या राज्य सरकार बरोबर एक ऍग्रिमेंट केलंच होत. त्यानुसार सरकारच्या गुवाहाटी इथं असणाऱ्या कॅन्सर केअरला अद्ययावत बनवण्यासाठी ऍडव्हान्स केमोथेरपी, रॅडीएशन, सर्जिकल ओंकॉलॉजी अशा सुविधा देण्याचं टाटांनी ठरवलं. आणि त्यातल्या पहिल्या फेजसाठी ५४० कोटी देण्याचं ठरवलं.
त्यानंतर दुसरं हॉस्पिटल राजस्थानच्या जयपूर इथं तयार होणार होत.
त्यासाठी टाटांनी २०० कोटी द्यायच ठरवलं. तिसर हॉस्पिटल झारखंडच्या रांची इथं उभं राहणार होत. त्यासाठी टाटा ट्रस्टने २३.५ एकरची जमीन रांची इथं खरेदी केली. चौथ हॉस्पिटल उत्तरप्रदेशात वाराणसी इथं उभं राहणार होत. आणि पाचवं आंध्रप्रदेश च्या तिरुमला इथं.
या पाच राज्यातल्या हॉस्पिटल उभारणी मागे देखील एक कहाणी सांगितली जाते. त्यावेळी दिवाळीचा सण सुरू होता. आणि टाटा परेलच्या कॅन्सर मेमोरियल पासून जात होते. गाडीच्या काचेतून त्यांना जे दृश्य दिसलं ते अतिशय वेदनादायी होत. टाटांनी परेल हॉस्पिटल जवळून जाताना एका कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकाला कागदातून दिवाळीचा फराळ खाताना पाहिलं. त्याक्षणी टाटांच्या मनात आलं, हेच जर हॉस्पिटल त्याच्या राज्यात असतं, तर त्याला दिवाळी साजरी करता आली असती.
आणि हेच कारण होत, टाटांनी १००० कोटी खर्च केले होते कॅन्सर रुग्णांसाठी…दिवाळीचा बोनस म्हणून.
हे ही वाच भिडू
- एअर इंडिया विक्रीचा टाटा आणि सरकारमधला १८,००० हजार कोटींचा करार नेमका कसा आहे?
- टाटा आणि अदानी आता देशाला विजेच्या संकटातुन बाहेर काढणार?
- झुनझुनवाला मोदी भेट काल व्हायरल झाली आणि आज टाटांचे शेअर्स वाढले