रत्नागिरीमध्ये अवघ्या ५ दिवसात निकाल लावून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यात आला !!

गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न उभ्या भारताला सतावतोय की  स्त्रियांवरचे अत्याचार कसे थांबवले जातील. हैद्राबादमधील दिशामूळे या गोष्टीची चर्चा सुरु झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात असे शेकडो प्रकरण समोर येतात आणि त्यातल्या  अनेक केसेस मध्ये पोलिसांच्या पर्यंत तक्रारही पोहचत नाही.

बऱ्याचदा तक्रार झाली तर कोर्ट कचेऱ्यांच्या हेलपाट्यात न्याय कुठे विरून जातो.

काही वेळा जनता हताश होते कायदा आपल्या हातात घेते. याचा अर्थ पीडितेला न्याय मिळतो असे नाही. यासाठीच महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत न्यायव्यवस्थेने संवेदनशील भूमिका घ्यावी फास्ट ट्रॅक कोर्टात केस नेऊन आरोपींचा गुन्हा पुराव्यानिशी शाबीत करून निकाल लावावा असे अनेक वर्ष मागणी होत आहे.

असे करायचे झाले तरी त्यातूनही काही कायद्याच्या पळवाटा शोधल्या जा तात असंही तज्ञांचं म्हणणं असते. मात्र पोलीस व्यवस्था आणि न्याय व्यवस्था खंबीर असेल तर न्याय मिळायला वेळ लागत नाही.

याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरी पोलीसानी व तिथल्या कोर्टानें अवघ्या १०० तासात लावलेला निकाल   

३ डिसेंबर रोजी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील बसणी या गावातली मुलगी पालकर हॉस्पिटल परटवने येथून गणपती पुळे रोडने स्कुटीवरून घरी निघाली होती. त्यावेळी तिच्या लक्षात आले कि गाडीचा कोणी तरी बराच वेळ पाठलाग करत आहे.

कोकणातले रस्ते संध्याकाळ होईल तसे निर्मनुष्य होतात. राहती घरे देखील दाट झाडीत अंतरा अंतरावर असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यामुलीने एका दुकानाजवळ सहज गाडी थांबवली आणि पाठलाग करणाऱ्याला पुढे जाऊ दिले.

मात्र काही वेळाने तो मुलगा तिच्या गाडीच्या आरशात परत दिसला. त्याने एक निर्मनुष्य जागा बघून तिच्या गाडीच्या आडवी आपली गाडी लावली आणि तिला थांबवले. रात्री ८.४०ची वेळ होती. तेव्हा त्या मुलाने तिचा विनय भंग केला. अश्लील संभाषण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तवणूक केली.

यापुढे त्याने आणखी काही पाऊल उचलण्यापूर्वी त्या धाडसी मुलीने आरडा ओरडा सुरु केला. त्यांनंतर लोक जमा होत असलेले पाहून आरोपी मुलगा पळून गेला.

अशा वेळी बऱ्याचदा मुली घाबरून त्या व्यक्ती विरुद्ध कोणतेही पाऊल उचलत नाहीत मात्र इथे असे घडले नाही. फिर्यादी मुलीला त्या आरोपीचा चेहरा लक्षात होता. इतर साक्षीदारांच्या मदतीने त्या मुलाचे नाव शोधून काढण्यात आले. त्याचे नाव  प्रथमेश नागले (ऱा पिरंदवणे ता.रत्नागिरी).

रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून पोलिसांनी संशयित आरापी प्रथमेश नागले याला अटक केली आणि गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासात पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बेर्डे यांनी या प्रकरणाचा तपास केल़ा.

४ डिसेंबर ला कोर्टात आरोप पत्र सादर झाले. हा खटला जलदगतीने चालवण्याची मागणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी न्यायदंडाधिकारी इटाळकर यांनी फिर्यादी,साक्षीदार, पंच, तपास करणारे अंमलदार यांचे जबाब लिहून घेतले.

६ डिसेंबर ला आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद समजावून घेण्यात आला. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ७ डिसेंबर ला न्यायमूर्तीनी निकाल जाहीर केला. आरोपी प्रथमेश नागले हा सदर घटनेत दोषी आढळला असून त्याला दोन वर्षाची सश्रम कारावास आणि १० हजारांचा दंड सुनावण्यात आला.

हैदराबाद  उन्नाव अशा ठिकाणी होत असलेल्या बलात्कारांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सारख्या ग्रामीण भागात कोणतेही अतिरेकी पाऊल न उचलता अगदी कायद्याने आखून दिलेल्या रस्त्याने अवघ्या १०० तासांत मिळालेला न्याय कौतुकास्पद आणि पुढे अशा घटना संदर्भात आदर्शवादी असल्याचं देशभरातून सांगण्यात येत आहे.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.