जेजुरीगडावरचा खजिना लुटणारे कोणी डाकू नव्हते तर स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक होते !!

१९४२ च्या चलेजाव आंदोलनाचा काळ. करेंगे या मरेंगे हा नारा देऊन स्वातंत्र्यासाठीची अंतिम लढाई छेडणाऱ्या गांधीजींसकट सर्व कॉंग्रेसना ब्रिटीश सरकारने जेलबंद केले होते. नेतृत्वहीन झालेल्या चळवळीचा जोर कमी होईल असा इंग्रजांचा अंदाज भारतीयांनी खोटा ठरवला.

अबालवृद्ध महिला सर्वजन आपआपल्या परीने आंदोलनाची ज्योत पेटवून धरत होते. बघता बघता चले जाव आंदोलनाचा वणवा देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली सातारा जिल्ह्यातील तरुणांनी इंग्रज सत्ता उलथवून स्वतःच सरकार सुरु करायचं ठरवल होतं.

त्यासाठी वेळ पडल्यास शस्त्र देखील हाती घेण्यास मागे पुढे पहिले नाही. पत्रीसरकार म्हणून या क्रांतीकारकांना ओळखल जात होतं. त्यांनी इंग्रज पोलिसांच्या नाकात दम करून सोडलं होतं. या पत्रीसरकारच्या चर्चा इंग्लंडपर्यंत जाऊन पोहचल्या होत्या.

याच धर्तीवर कोल्हापुरातील तरुणांनी देखील क्रांतिकारी चळवळ सुरु केली. याचे नेतृत्व करत होते रत्नाप्पा कुंभार.

शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे रत्नाप्पा कुंभाराचा जन्म झाला होता. शाहू महाराजांनी सुरु केलेल्या बोर्डिंगमुळे आणि फ्रिशीपमुळे अनेक गरीब घरातील मुले शिक्षणाच्या वाटेवर आली. यातच रत्नाप्पा पण होते. एका गरीब कुंभार घरातील हा मुलगा एलएलबी शिकण्यासाठी कोल्हापूरला आला.

कोल्हापुरात लिंगायत बोर्डिंगमध्ये शिकत असताना त्यांची ओळख शेतकरी चळवळीशी झाली. तेव्हा माधवराव बागल हे शेती व शेतीमालाचे ब्रिटिशांकडुन होणारे शोषण व लूट या विषयांवर सभांमधून बोलत असत. या सभांमुळे रत्नाप्पा त्यांच्याकडे आकर्षित झाले व कायद्याचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून ते बागलांचे सहकारी बनले. शेतसारा कमी करण्यासाठीच्या आंदोलनात सहभाग घेतला.

चले जाव अधिवेशनातील गांधीजींच्या भाषणानंतर जेव्हा आगडोंब उसळला आणि पोलिसांनी कॉग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली तेव्हा रत्नाप्पा कुंभार मुंबईतच होते. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन कशीबशी सुटका करून घेतली व भूमिगत झाले. कोल्हापुरात परतल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इंग्रज सरकारविरोधात लढाई सुरू ठेवली.

या भूमिगत कार्यकर्त्यांचे मुख्य केंद्र मिरजेजवळच्या दंडोबाच्या डोंगरावर होते.

रत्नाप्पानी मालगावच्या बाबंण्णा धुळी यांच्या मळ्यात आपली गुप्त कचेरी स्थापन केली होती. ब्रिटीश सत्तेला जर भारतातून घालवायचे असेल तर छोट्या छोट्या गावापासून त्यांना मागे हटवावे लागेल हे सूत्र प्रत्येक क्रांतीकारकांच्या मनात घट्ट बसले होते. रत्नाप्पांचे कार्यकर्ते कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन्स जाळणे, गाव चावड्या ताब्यात घेणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, दारूचे गुत्ते जाळणे आदी घातपाती कारवाया सुरु केल्या,

या भूमिगत चळवळीची सर्व आखणी आणि कर्यक्रम रत्नाप्पा या दंडोबाच्या डोंगरावरच्या कचेरीत ठरवत असत. त्या नंतर रत्नाप्पांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घातपाती कार्यवाया होत असत. एखाद्या शिकारी कुत्र्याप्रमाणे पोलिस त्यांच्या मागावर होते.

पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. यातूनच रत्नाप्पा कुंभार व त्यांच्या साथीदारांनी बार्शीला जमणारी टपाल ट्रेन लुटली. 

अनेक क्रांतिकारक आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या लढ्यात उतरले होते. ते कोणी चोर लुटारू नव्हते तर सुशिक्षित होते. अनेकजण आपल्या कॉलेजमध्ये शिकत होते. काही जन चांगली चाललेली नोकरी सोडून आले होते. हे सगळे भारतमातेला स्वतंत्र करायचं या एकाच भावनेने पछाडले होते.

यात कोणाच वैयक्तिक नुकसान करायचा त्यांचा तीळमात्रही हेतू नव्हता.

बार्शीच्या ट्रेन लुटीवेळी त्यांना टपालात काही मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका देखील सापडला होता. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे ते सर्टिफिकेट्स क्रांतिकारकांनी सन्मानाने शाळेला परत पोहचवले.

या हल्ल्या नंतर इंग्रज सरकार अतिशय सावध झाले होते.

तिकडे साताऱ्यातील नाना पाटलांच्या पत्री सरकारची दहशतदेखील वाढली होती. सरकारी खजिन्याचे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत होते. चळवळ सुरु होऊन दोन वर्षे झाले तरी अजूनही लढा संपलेला नव्हता. यापुढे अजून काही वर्ष टिकाव धरायचा असेल तर पैसे लागणार होते.

सगळी सोंगे करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.

अखेर क्रांतिकारकांनी निर्णय घेतला की  जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटायचा. पूर्वीच्या काळातील मंदिरामध्ये प्रचंड मोठा खजिना धूळ खात पडलेला असायचा. आता वेळ आली होती की हा पैसा जनतेच्या कामासाठी बाहेर काढायचा.

७ जुलै १९४४ रोजी रत्नाप्पा कुंभार यांनी जेजुरी गडदेवस्थानावर दरोडा घातला. 

त्यांच्या सोबत शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ असे निवडक सहकारी होते. मध्यरात्रीची वेळ होती. तेथील सेवेकरी गाढ झोपेत होते.

क्रांतिकारकांनी त्यांच्यावर हल्ल्ला केला. घाबरलेल्या पुजाऱ्यानी मंदिरातील जामदारखान्याच्या तिजोरीच्या किल्ल्या त्यांच्या हवाली केल्या. ती तिजोरी उघडली तर त्यात इंदूरचे होळकर , ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुड्या, माणिकाचे खडे,  जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने होते.

हे सर्व ताब्यात घेऊन कोल्हापूरचे क्रांतिकारक रातोरात पसार झाले.

सगळीकडे गोंधळ सुरु झाला. कोण आलं कुठ गेल काही पत्ता लागत नव्हता. डाकुनी टाकलेला दरोडा आहे असाच सुरवातीला वाटत होतं मात्र काही दिवसांनी कळाल की हे कार्य स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकांनी केलेलं आहे.

इंग्रज पोलिसांनी या दरोड्याचा तपास जोरात सुरु केला. पुढच्या एक वर्षात अनेक क्रांतिकारक सापडले. पण रत्नाप्पा कुंभार इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत.  जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत.

पुढील ६ वर्षे रत्नाप्पा कुंभार अज्ञातवासातच होते. स्वातंत्र्याची घोषणा झाल्यावर ते अचानक प्रगट झाले.

भारताच्या संविधानसभेवर त्यांची निवड झाली होती. राज्यघटनेच्या मसुद्यावर त्यांची स्वाक्षरी आहे. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानाच्या विलीनीकरणासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांचीच मदत घेतली होती.

जेजुरी गडावरच्या खजिन्यातून लुटलेल्या पैशांचा वापर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीसाठी अत्यंत योग्य रितीने केला होता. मात्र काही जण असही म्हणतात की यातूनच उरलेल्या पैशातून रत्नाप्पा कुभारांनी स्वातंत्र्यानंतर इचलकरंजी परिसरात पंचगंगा सहकारी साखर कारखाना उभारला. याच पंचगंगा साखर कारखान्यामुळे शिरोळ हातकणंगले परिसरात विकासाची गंगा वाहू लागली.

हे ही वाच भिडू.

 

2 Comments
  1. मंदार राजमाने says

    पत्री सरकार की प्रतिसरकार?

Leave A Reply

Your email address will not be published.