संजय राऊतांच्या या विधानांचा फटका सेनेला बसतोय का..?

एकनाथ शिंदे गटात असलेले शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं पत्र एकनाथ शिंदेंनी ट्विटरद्वारे शेअर केलं. या पत्रात, ‘विधान परिषदेत आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करावी लागते. आम्हाला डावलून हेच so called (चाणक्य कारकून) बडवे राज्यसभा आणि विधानसभेची रणनीती ठरवतात,’ असं लिहीत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय, असं बोललं जातंय.

त्यात शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असंही वक्तव्य त्यांनी केलं.

बंड सुरू झाल्यावर संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेची ही कोंडी झाली असल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितलं होतं. तर दूसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही पत्रकारांकडे संजय राऊत यांच्याबद्दल तक्रार करत असल्याची बातमी आली.

संजय राऊत हे व्यक्तिगत चांगल बोलतात पण माध्यमांसमोर विरोधी वक्तव्य करत आहेत अशी बातमी आली होती..

महाविकास आघाडीच्या स्थापनेत शिवसेनेकडून संजय राऊत हेच समोर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात समन्वय साधणारे नेते म्हणून संजय राऊत यांचा उल्लेख केला जातो. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधणारा नेता म्हणून महाविकास आघाडीच्या स्थापनेत राऊत यांची भूमिका समोर आली होती.

मात्र गेल्या अडीच वर्षात भाजपवर टिका करत असताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना देखील डिवचण्याचं काम केलं आहे, महाविकास आघाडीतील समन्वय बिघडण्यासाठी त्यांचीच काही वक्तव्य कारणीभूत असल्याचं बोललं जातय..

अशीच प्रमुख वक्तव्य काय आहेत ती पाहूया.. 

1) अपक्ष आमदारांवर अविश्वास

याच महिन्यात राज्यसभेच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या दूसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवावर बोलताना संजय राऊतांनी थेट अपक्षांवर निशाना साधला होता. महाविकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या अपक्षांवर निशाना साधल्यानं अपक्ष मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. असा आरोप करताना त्यांनी राष्ट्रवादीला पाठींबा देणाऱ्या आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर देखील आरोप केला होता.

या आरोपांवर व्यथित झालेल्या देवेंद्र भुयार यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली. तेव्हा ‘तुझ्या बाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही’ अस उत्तर पवारांनी भुयार यांना दिलं होतं. तर दूसरीकडे अपक्ष दुखावतील अस वक्तव्य करू नये म्हणत भुजबळांनी देखील राऊतांचे कान टोचले होते.

2) पुढील 5 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री ; 25 वर्ष मुख्यमंत्री सेनेचाच…

जूनच्या पहिल्या आठवड्यातच संजय राऊत यांच हे वक्तव्य चर्चत आलं होतं. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर मुख्यमंत्री आत्ता राष्ट्रवादी पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा कारभार हस्तांतरीत करतील अशा चर्चांनी वेग पकडला होता. त्यावर स्पष्टीकरण देत असताना पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री सेनेचाच राहिलं अस स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

पण हे स्पष्टीकरण देत असताना ना कोणता वाटा किंवा घाटा होणार नाही अस वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण या वक्तव्याचा संदर्भ जातो तो राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर. २९ मे रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी वक्तव्य केलेलं की, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होवूदे संपुर्ण पक्ष घेवून नवस फेडायला येईल, अस साकडं तुळजाभवानीकडे घातलं आहे. 

त्यांच्या या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना, पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल अस वक्तव्य केलं होतं.

3) खेड पंचायत समितीबाबत राज्यपातळीवर विधान..

खेड पंचायत समितीचा विषय तसा एका मतदारसंघापुरता होता. मात्र संजय राऊतांच्या वाक्यामुळे याची चर्चा राज्यपातळीवर झाली. खेडचे आमदार दिलीप मोहितेनी सेनेवर टिका केल्यानंतर संजय राऊतांनी थेट अजित पवारांवर निशाना साधला होता. अजित पवारांनी मोहिते यांचा बंदोबस्त करावा अशी, त्यांना वेसण घालावी. त्यांच ते ऐकणार नसतील तर शिवसेनेला मुभा द्यावी अस वक्तव्य त्यांनी केलं होतं.

इतक्यावरच न थांबता राज्यात महाविकास आघाडी होवो न होवा पुढच्या विधानसभा निवडणूकीत खेडमध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल आणि सध्याचे मोहिते माजी होतील त्याची व्यवस्था आम्ही करू अस वक्तव्य त्यांनी केलेलं.

4) इंदिरा गांधी करीम लालांना भेटल्या होत्या

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतरच्या महिन्याभरातच म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये संजय राऊतांनी थेट इंदिरा गांधी करीम लाला या गुंडाला भेटायच्या अस वादग्रस्त वक्तव्य केलेलं. करीम लाला हा मुंबईच्या पठाण टोळीचा गुंड होता. पख्तुन ए हिंद या पठाणांच्या संघटनांचा प्रमुख होता.

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. त्यानंतर आपल्या वक्तव्यावर सारवासारव करत तो पख्तून ए हिंद पठाणांच्या संघटनेचा प्रमुख होता, त्यामुळेच तो अनेक कॉंग्रेस नेत्यांना भेटायचा अस राऊत म्हणाले. तरिही कॉंग्रेसकडून टिका सुरूच राहिल्यानंतर मात्र माफी मागत त्यांनी आपले विधान मागे घेतले होते.

याच दरम्यानच्या काळात सामना मध्ये एक लेख लिहीत कॉंग्रेसवर टिका करण्यात आली होती. विधानसभेच्या संख्याबळानुसार कॉंग्रेसच्या वाट्यास जे आले आहे ते समान सत्तावाटपातही आले नसते. जूनी खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये. कॉंग्रेस राष्ट्रवादी हे राजकारणात मुरलेले पक्ष आहेत, कधी व किती कुरकुरायचे, कधी कुस बदलायची हा अनुभव त्यांना आहे अस वक्तव्य त्यांनी केलं होतं.

5) कॉंग्रेस नेत्यांवर वारंवार टिका

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते.

अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती.

तर शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं..

‘तेव्हा राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? त्यांनी UPA ची चिंता करू नये,’ असा समाचार नाना पटोले यांनी राउतांचा घेतला होता. त्यानंतर हा दिल्लीतला विषय आहे, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी यात पडू नये. सोनिया गांधी, राहुल गांधी याविषयी काही बोललात, तर आम्ही उत्तर देऊ असा टोला संजय राऊतांनी लगावला होता.

पुढे महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला.

नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे’ असं म्हणत सेनेनं सामना मधून काँग्रेसला टोला लगावला होता.

याच सोबत त्यांची कधी कॉंग्रेसला-कधी राष्ट्रवादीला टोचणारी वक्तव्य वाढत गेली. त्यातूनच महाविकास आघाडीची घडी विस्कटत गेली अशी टिका होत आहे. त्यात आता बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रातूनही राऊत यांच्यावर टीका केल्याचं बोललं जातंय, त्यामुळं पुढं नेमकं काय होणार, हे पाहावं लागेल.          

 हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.