या राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.

राजपूत राजे पराक्रमी होते, त्यांचा इतिहास जाज्वल्याचा आहे हे आपण वाचलेलं असतं. पण अनेकदा प्रश्न पडतो की तरी त्यांनी मुघलांचं मांडलिकत्व का स्वीकारलं?

राणा प्रताप यांच्या सारखी उदाहरणे सोडली तर मुघल बादशहाच्या विरोधात बंड करणारे राजे आढळून येत नाहीत.

पण एक राजपूत राजा होता ज्याला मुघलांना घालवून दिल्लीवर विजय मिळवायची संधी मिळाली होती.

राव मालदेव राठोड अस त्याच नाव.

राजस्थानच्या मारवाडचा हा राजा. अतिशय पराक्रमी, जिद्दी व महत्वाकांक्षी. त्याचे वडील राव गंगा हे शांत व सज्जन स्वभावाचे. या दोघांनी अनेक मोहिमा जिंकल्या होत्या. गुजरातपर्यंत त्यांचा दरारा पसरला होता.

मात्र एक दिवस अचानक राव गंगाने जोधपूर किल्ल्याच्या खिडकीतून उडी टाकून जीव दिला. अनेकांचे म्हणणे होते की ही आत्महत्या नसून खुद्द राजकुमार मालदेवरावने त्यांचा खून केला आहे. त्यांच्या अंतीमसंस्कारासाठी मालदेवची अनुपस्थिती या शंकेला वाव देणारी होती.

मालदेव प्रचंड महत्त्वाकांक्षी होता.

१५३१ साली राज्याभिषेक झाल्यावर लगेच त्याने राज्यविस्तार करण्यास सुरुवात केली. नागौर,टोंक,जैसलमेर, बिकानेर अशा इतर राजपूत सत्ता काबीज केल्या. यातील अनेकजण त्याचे सरंजाम होते, कित्येकांशी त्याची लढाई नव्हती त्यांनी पूर्वी राठोड घराण्याला मदतच केली होती, काहीजण तर त्याचे भाऊबंद देखील होते.

पण मालदेव निर्दयी होता. महापराक्रमी राज्यस्थापन करायचे तर त्याला तसे वागावेच लागणार होते. त्याने हिंदुराष्ट्र स्थापन करण्याचा विडा उचलला होता. बाबरने हिंदूंवर लादलेला जिझियाकर त्याने आपल्या राज्यातून हटवून टाकला.

‘तबकाते अकबरी’ चा लेखक निजामुद्दीन एके ठिकाणी म्हणतो,

मालदेव जो जोधपुर व नागौर का मालिक था, हिन्दुस्तान के राजाओं में फौज व हशमत (ठाठ) में सबसे बढ़कर था। उसके झंड़े के नीचे ५०,००० राजपूत थे।

मारवाडचे साम्राज्य इतके प्रचंड झाले की त्याची उत्तरी सीमा झझ्झर दिल्लीच्या अवघ्या ५० किमी अलीकडे पर्यंत जाऊन पोहचली. मालदेवच्या सैन्याचा वावर आग्र्यापर्यंत दिसू लागला होता.

तेव्हा भारताच्या राजधानीवर राज्य करत होता पठाण राजा शेरशाह सूरी.

बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायूनला परागंदा व्हावे लागले होते. शेरशाह सूरीने चौसाच्या लढाईत त्याचा पराभव केला होता. खरंतर हुमायून आणि मालदेव यांच्यात मैत्रीचा करार झाला होता. म्हणून हुमायून त्याच्या राज्यात आश्रयाला आला.

मालदेवने मात्र त्याला मदत करण्यास इन्कार केला. यासाठी मुघल सैन्याने केलेली गोहत्या हे कारण पुढं केलं. पण खरं तर मुघल आता संपले हेच मालदेवच्या डोक्यात होतं. फक्त त्याने हुमायून वर एक उपकार केले म्हणजे त्याला अटक केली नाही. हुमायून तेथून देखील निघून गेला.

अस सांगितलं जातं की हुमायूनला पकडून देण्यासाठी शेरशहा सुरीने थैलीभर अशर्फी पाठवून दिली होती पण अतिथी देवो भवचे खूळ डोक्यात असलेल्या या राजाने त्याकडे दुर्लक्ष केले.

राजपूत इतिहासकार म्हणतात की,

जर राव मालदेवने हुमायूनला तेव्हाच ठार केले असते मुघल खरोखर संपले असते.

मालदेव पराक्रमी होता पण त्याच्याकडे मुत्सद्देगिरी व धूर्तपणा नव्हता. त्याचीही पहिली चूक. याच चुकीचे परिणाम दुसऱ्या चुकीसाठी भाग पडले. रावने आपल्या अनेक भाऊ बांधवांना त्यांचे राज्य काढून घेऊन दुखावले होते. ते सगळे राजपूत राजे शेरशाह सूरी कडे गेले.

त्यांनी मालदेव विरुद्ध तक्रार केली, तो हुमायून ला मदत करत आहे असे खोटे सांगितले.

यानंतर भडकलेल्या शेरशाह सुरीने मारवाडवर हल्ला केला.

शेरशाह सूरी आपले ८० हजार घोडदळाचे सैन्य घेऊन अजमेर जवळ आला. राव मालदेवदेखील तिथे चालून आला. दोघांनी जैतारण येथे छावणी टाकली. खरं तर मालदेवचं सैन्य फक्त ५० हजारांच होतं तरी शेरशाहला त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस होत नव्हते. फक्त भीती घालून जायचे असे त्याच्या डोक्यात होते.

दोन्ही सैन्य महिनोन्महिने एकमेकासमोर उभे राहिले, कोणीही युद्धास सुरवात करत नव्हते.

दिल्लीचा सुलतान शेरशाह सूरी आता वैतागला होता. हे युद्ध जिंकल्याशिवाय परत जाता येणार नाही हे त्याला ठाऊक होते. पण सरळ मार्गाने मालदेवचा पराभव करता येणार नाही हे देखील तो जाणून होता.

अखेर त्याने कुटनीतीचा वापर केला.

राव मालदेवच्या तंबुच्या बाहेर त्याने एक मारवाडी मध्ये लिहिलेली चिठ्ठी टाकण्याची व्यवस्था केली. त्यात लिहिलं होतं की,

बादशाह को अपनी जीत को लेकर संदेह करने की ज़रूरत नहीं है. युद्ध में हम राव को बंदी बनाकर आपके हवाले कर देंगे.’

ही खोटी चिठ्ठी वाचून मालदेव सटपटला. त्याला वाटले की आपलेच सरदार आपल्या विरुद्ध कट करत आहेत. त्याचा स्वभाब संशयी होता आणि इतिहासात त्याने अनेकांशी वैर पत्करले असल्यामुळे आपल्यावरही वेळ येऊ शकते असा त्याचा अंदाज होताच.

त्यातच शेरशाहच्या बाजूने असलेल्या राजपूत राजा विरमदेव याने काही ढालीमध्ये सोन्याच्या मोहरा लपवून त्या मालदेव च्या सैन्यात पसरवल्या व खबर राव पर्यंत पोहचवली.

घाबरलेल्या मालदेवने जोधपूरला परत जाण्याचा निर्णय घेतला.

त्याचे दोन सरदार जैता व कुंफा यांनी समजावून सांगण्याचा हरेक प्रयत्न केला पण मालदेव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याला वाटले हे दोघे आपल्याला मारण्यासाठी ही चाल करत आहेत.

विश्वासघाताचे आरोप झालेले जैता व कुंफा स्वतःला सिद्ध करण्यासाठी युद्धभूमीवरच थांबले.

४ जानेवारी १५४४ रोजी त्यानी शेरशहा सुरीवर आत्मघाती हल्ला केला. हे युद्ध गिरी सुमेल युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. दोन्ही राजपूत योद्ध्यांच्या पराक्रमानंतरही अतिशय कमी संख्याबळ असल्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यांना युद्धभूमीवरच वीरमरण आले.

शेर शहा सूरी एकेठिकाणी म्हणतो,

“खुदा का शुक्र है कि किसी तरह फतेह हासिल हो गई, वरना मैंने एक मुट्टी भर बाजरे के लिए हिन्दुस्तान की बादशाहत ही खो दी होती।”

पुढे शेरशाहने जोधपूरवर आक्रमण करून मारवाड चे राज्य संपवून टाकले. पुढे मालदेवच्या वंशजांनी अकबर बादशाह बरोबर करार करून आपले संस्थान करत मिळवले.

मालदेव रावाने स्वतःच्या मूर्खपणामुळे दिल्ली जिंकण्याची संधी आपल्या हाताने घालवून टाकली. तो जर जिंकला असता तर हुमायून भारतात परतण्याचे धाडस करूच शकला नसता.

राव मालदेव राठोडला दोनवेळा संधी मिळाली होती जर त्याने त्याचा फायदा उठवला असता तर भारताचा इतिहास व नकाशा काही वेगळाच असता हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.