रवी दहियाचे गुरु असलेल्या संन्याश्याने इंटरनॅशल लेव्हलचे १०० पहिलवान तयार केलेत
ऑलम्पिकचा थरार मागचे काही दिवस आपण सगळेच अनुभवत होतो. खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, देशबांधवानी केलेला जल्लोष हे सगळं काही दिवसांपूर्वीचंच चित्र पण यामागे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची किती असते याची प्रचिती आपल्याला येते. कुस्ती हि आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर खेळली जाते. आजचा आपण याच कुस्तीशी संबंधित एका प्रशिक्षकाविषयी जाणून घेऊया.
ऑलम्पिक स्पर्धेत रवी दहियाने सिल्व्हर मेडल मिळवलं. रवी दहियाचे गुरु होते पहिलवान हंसराज. सोनिपत मध्ये राहणाऱ्या या पहिलवान संन्यासीने कुठलीही सुविधा नसताना १०० पहिलवान खेळाडू घडवलेत. या शंभरांपैकी २२ पहिलवानांनी आंतराष्ट्रीय स्तरावर नाव सुद्धा गाजवलं आहे. रवी दहियाने मेडल जिंकल्यानंतर त्याच्या गुरुची चर्चा झाली तेव्हा संन्यासी हंसराज यांच नाव आलं. रवी दहियाची कुस्तीची सुरवात संन्यासी हंसराज यांच्या आखाड्यातूनच झाली.
हंसराज यांनी दिल्लीतली सरकारी नोकरी सोडली आणि १९९६ ला सोनिपतमध्ये एक आखाडा सुरु केला. आजवर त्यांच्या तालमीत १०० पहिलवान तयार झाले आहेत. हंसराज यांना सुरवातीपासूनच कुस्तीची आवड होती, त्यातच आपलं करियर करावं असं त्यांना सारखं वाटायचं. पण त्यांच्या वडिलांना असला प्रकार आवडत नसायचा. हंसराज हे दिल्लीमध्ये सरकारी नोकरीत होते.
कुस्ती खेळताना गुढग्याला मार लागल्याने त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं, त्यामुळे त्यांची पैलवानकी सुटली. त्यांच्या मनात शल्य कायम राहिलं कि ते देशाचं नाव रोशन करू शकले नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि आर्यसमाज मंदिरात आखाडा सुरु करून पहिलवान तयार करण्याचं ठरवलं. घरच्यांनी आणि गावकर्यांनी विरोध केल्यावर हंसराज यांनी नदीशेजारी आखाडा सुरु केला.
हंसराज यांच्याजवळ तेव्हा काही सुविधा नव्हत्या. लहान मुलांना ते कुस्ती आणि इतर अभ्यास शिकवत असायचे. पहिलवानाचं टॅलेंट ओळखून ते त्याला पुढे महाबली सतपाल यांच्या दिल्लीतल्या छत्रसाल आखाड्यामध्ये पाठवून देत. २५ वर्षात १०० पहिलवान त्यांनी तयार केलेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचलेले अर्जुन अवॉर्ड विजेते अमित दहिया, अरुण पाराशर, अरुण दहिया, पवन दहिया आणि सिल्व्हर मेडलिस्ट रवी दहिया आहेत.
जिममध्ये एकदम देशी पद्धतीने ते ट्रेनिंग देतात याच कारण होतं कि जिमचा खर्च हा परवडण्याजोगा नव्हता. डब्ब्यांमध्ये काँक्रीट भरून डंबेल्स तयार केलेले आहेत, नदीच्या कडेला रनिंग ट्रॅक बनवला आहे. लाकडाचं मुदगल, जाड दोरखंड देशी जिममधलं सगळं त्यांच्या आखाड्यात आहे.
गावांमधून हंसराज यांच्या आखाड्यातील पहिलवानांसाठी अन्न आणि दूध येतं. आता नाव झाल्यामुळे गावकरीसुद्धा हंसराज यांच्या तालमीला सपोर्ट करतात. गावागावांमधून हंसराज यांच्या तालमीत मुलं शिकण्यासाठी येतात. अर्जुन अवॉर्डने सन्मानित झालेले खेळाडू हे संन्यासी हंसराज यांच्याच तल्मितले आहेत. आपल्या तालमीत तयार झालेले खेळाडू महाबली सतपाल यांच्याकडे पाठवून झाल्यावर ते स्वतः त्या खेळाडूंच्या ट्रेनिंगवर लक्ष द्यायला जात असतात.
देशासाठी पाहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं नाही म्हणून आखाडा सुरु करून संन्यासी हंसराज यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.
हे हि वाच भिडू :
- जो पैलवान मस्ती पचवतो तोच खरा आदर्श मल्ल अथवा अनेकांचा सुशिल कुमार होतो
- लाल मातीच्या पहिलवानांना ऑलिम्पिकच्या मॅटवर पोहचवणारे कुस्तीचे भीष्म पितामह….
- सर्वांचा अंदाज चुकवून “हिंदकेसरी” आणणारे पैलवान तसेच अंदाज चुकवून गेले..
- ज्याच्यासाठी योगीने कुस्ती सोडली तो चेला ऑलिम्पिकचं गोल्ड मारणार का?