वडिलांनी केलेली मेहनत आज ऑलिम्पिक गाजवणाऱ्या रविकुमारच्या कामी आलीय.

रविकुमार दहिया या नावाचा डंका सध्या टोकियोमध्ये वाजतोय. कोण हा रवीकुमार? पुरुषांच्या 57 किलो गटाच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून त्याने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातल्या नहरी गावातला हा एक मुलगा. 

वडील शेतकरी. शेतकरी म्हणजे स्वतःची जमीन नसलेला भूमिहीन शेतकरी. भाड्याने जमीन घेऊन त्यावर शेती करायचे. या मेहनती मागे त्यांचे स्वप्न होते आपल्या मुलाला रवीला त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मल्ल बनवायचे होते. त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करायचे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी रवीला दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम मध्ये मल्ल सत्यपाल सिंग यांचा कृपाछत्राखाली पाठविलं.

रवी कुस्तीचे धडे गिरवायला लागला. आणि वडील त्याला गावातून दररोज 40 किलोमीटरचे अंतर पार करून दूध आणि फळांचा खुराक आणून द्यायचे. वडिलांची ही सेवा अखंडितपणे आजतागायत सुरू आहे. 

2019 ला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत रवीने कांस्यपदक जिंकले. ती लढत पाहण्याइतकी उसंत ही त्यांच्याकडे नव्हती. रवीचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकारण्यासाठी त्याचे वडील आजही श्रम करीत आहेत. वडिलांची मेहनत रवीने वाया जाऊ दिली नाही. टोकियोतील त्याची मजल अनपेक्षित होती.

पायाच्या दुखापतीमुळे अधून मधून त्रास होतो. आणि पदकापर्यंतचा प्रवास अचानक खुंटतो. यावेळी मात्र तसे झाले नाही. अगदी ज्युनियर स्पर्धांपासून त्याच्या या दुखापतींचा असा लपंडाव सुरू आहे. मात्र या प्रवासात त्याला नशिबाची सुदैवाने साथ लाभली. आज अंतिम फेरीत धडक मारत असताना प्रतिस्पर्धी गलितगात्र झाला आणि रवीने त्याला चितपट केले. त्याची पाठ जमिनीला टेकवली.

नवी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये राहिल्यामुळे त्याच्यावर दैव प्रसन्न झालं. त्याला ऑलम्पिक पदक विजेत्या योगेश्वर दत्तची खोली राहायला मिळाली. या खोलीचा एक शुभशकुन आहे. त्या खोलीत राहणाऱ्या खेळाडूला पदकेच पदके मिळतात. त्या खोलीत रवी कुमारला राहायला आवडते.

आपल्या दुबळ्या पायांवर त्याने आत्ता अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. रशियात तो सरावाला गेल्यापासून त्याच्यात खूपच बदल झाला. प्रशिक्षक मुराद गैदारोव्हने त्याला शारीरिक दृष्ट्या अधिक सक्षम बनवले. आणि तंत्र ही चांगलेच घोटून घेतले. रशियानं रवीला त्याच्यापेक्षा अधिक बलवान व सक्षम तसेच काटक मल्लांशी सराव करायला लावला. याचा परिणाम टोकियो ऑलम्पिक मध्ये पहावयास मिळाला. उद्याच्या अंतिम लढतीत रवीकुमार दाहीया हा भारतीय कुस्तीसाठी नवा अध्याय लिहू शकेल.

  • विनायक दळवी

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.