राऊत आणि राणा लडाखला गेले, तुम्हाला जायचं असेल तर खर्च अन् कस जायचं ते वाचा 

संजय राऊत व नवनीत राणा आणि रवी राणा हे सध्या लडाखमध्ये आहेत. काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचं तापमान 45 डिग्रीच्या वर गेलेलं. त्यात दोन चार डिग्रीचा हातभार या तिन्ही लोकांनी लावला होता. घरासमोर जावून हनुमान चालीस म्हणण्याचा आग्रह राणा दांपत्याने धरल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात तणाव वाढला होता. 

पण आत्ता हे तिन्हीही लोकं लडाखच्या थंडपणाचा अनुभव घेत आहेत.

त्याला कारण ठरलय ती संसदेची संरक्षण समितीची दौरा. कसय देशाच्या संसदेत वेगवेगळ्या विषयाला डेडिकेटेड समित्या असतात. अशा समितीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोध पक्षाचे खासदार देखील असतात. अशाच संरक्षण समितीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्यासह खासदार संजय राऊत देखील आहेत.

आत्ता समितीचाच दौरा असल्याने  नवनीत राणांच्या सोबतीने आलेले रवी राणा व संजय राऊत हे एकत्रित आहेत.पण एकत्र दौऱ्यावर आहेत म्हणून ते जूनं डोक्यात घेवून एकमेकांना टाळतायत का? तर अस काही नाही, ते मस्तपैकी एकमेकांसोबत संवाद साधतायत. बोलतायत.. 

थोडक्यात लडाखच्या थंडीचा परिणाम  रवी राणा व संजय राऊत यांच्या फोटोवरून दिसून येतोय.. 

पण मुद्दा आहे कार्यकर्त्यांचा, मध्यंतरीच्या गरम वातावरणात रस्त्यांवर बसून वातावरण तापवलेल्या कार्यकर्त्यांच काय. त्यांनीही लडाखसारख्या ठिकाणी जावून शांत होण्याची गरज असल्याचं दिसून येतं. पण मुद्दा आहे तो पैशाचा. लडाखच्या ट्रिपचा खर्च काय असतो, कसं जायचं हे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना समजलं पाहीजे, 

म्हणूनच बोलभिडूसाठी तीन वर्षांपूर्वी ऋषिकेश चव्हाण यांनी लिहलेला लेख खाली देत आहोत. हा लेख वाचून लडाखची ट्रिप कशी करायची किती खर्च येतो ते समजून घ्या. शिवाय ३ वर्षांचा महागाई भत्ता देखील एकूण खर्चात वाढवून ट्रिपचं बजेट आखा, 

तर सुरू करू…

१ जूनला दुपारी ३ ला दौरा पुण्यातून चालू झाला.

दुपारी ३ ची ‘डेक्कन एक्सप्रेस’ पकडून मुंबईत पोहचून तिथून ‘दोरांतो एक्सप्रेस’ने दिल्ली गाठली. दिल्लीत पोहचल्यावर दिल्ली टू जम्मू-तावी राजधानी एक्सप्रेस ला ५ तासाचं फरक होता म्हणून मेट्रो पकडून पुराणी दिल्ली चांदणी चौकला फेरफटका मारता आला. राजधानी एक्सप्रेस ने तिसऱ्या दिवशी सकाळी रविवारी जम्मू मध्ये पोचलो.

एकटे असाल तर तिथली लोकल ट्रान्सपोर्ट पकडा, ग्रुप असेल तर तवेरा करून श्रीनगर ला पोचता येईल.

६००० रुपये देऊन आम्ही तवेरा ठरवली. वासिमने (तवेरा चा ड्राइवर) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आम्हाला “दल” लेक जवळ हॉउसबोट मध्ये पोचवलं. बोट हाऊस चे भाडे १५०० पासून ३५०० पर्यंत आहे. तसेच शिकारा (छोट्या बोटीतून दल लेक फिरवणे) चे भाडे ५०० ते ७०० आहे.

येथे बरेच लोक मनाली मार्गे लेह-लदाख-जम्मू असा प्रवास करतात, पण मला तर हे साफ चुकीचं वाटत कारण मनाली (६७२६ फूट) तिथून पुढे रोहतांग पास (१३०५० फूट) वरून लेह मार्ग आहे. तुमच्या बॉडीला अचानक एवढी उंची सहन होत नाही. पण तेच जम्मू मार्गे लेह-लडाख-मानली केलं तर हळू हळू उंची वाढत जाते आणि बॉडी साथ देते.

दुसऱ्या दिवशी श्रीनगर ते लेह व्हाया कारगिल प्रवास झाला.

या प्रवासासाठी तवेरा १५००० भाडे घेते. एका दिवसात हा प्रवास पूर्ण होत नसून कारगिल मध्ये स्टे करावा लागतो. कारगिल मधील हॉटेलचे भाडे सरासरी २००० असे आहे (कारगिल पूर्ण अल्कोहोल फ्री आहे. कोणाला विचारायचं धाडस करू नका. मार खाता खाता वाचलोय).

या प्रवासात वाटेत द्रास मधील “कारगिल वॉर मेमोरियल” त्या युद्धाची आठवण करून देऊन अंगावर काटा आणत. कॅप्टन बत्रा यांच्या टीमने कसा लढा दिला यापासून पाकिस्तानचे आर्मस सगळं आहे तिथे.

तिसऱ्या दिवशी कारगिल मधून लेहचा प्रवास तसा सुखाचा. 

झकास रोड. वासिम च्या गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याने आम्हाला दुसऱ्या जहांगीरच्या कारला जोडून दिले. या प्रवासात वाटेत मॅग्नेटिक हिल ची मज्जा घयायला विसरू नका तसेच पठार साहिब गुरुद्वारा मधील जेवण. ब्रो (बीआरओ)  Border Road Organization मुळे हा रोड खूप मस्त बनला आहे.

दुपारी लेह मध्ये पोचल्या नंतर डीसी ऑफीसला जाऊन पुढील प्रवासाच्या Inner Line Permit घ्यायला विसरू नका.

नाहीतर पुढे कोणत्याही चेकपोस्ट वरून तुम्हाला आत जात येणार नाही

याच रात्री लेह टॅक्सी युनियन मध्ये जाऊन लेह-मनाली ५ दिवसासाठी कार बुक करून घ्या. इंनोवा साधारणतः ४५,००० रुपये घेते.आम्ही ८ जण असल्यामुळे ६०,००० देऊन टेम्पो ट्रॅव्हलर केली.

चौथ्या दिवशी लेह-तुर्तुक-थांग हा प्रवास चालू होतो.

सुरवातच होते भव्य अश्या दरीने. “खारडुंगला पास” (१७५८० फूट) जगातील एकमेव उंची जिथे गाडी जाऊ शकते. इथे ऑक्सिजन कमी असल्यामुळे उलट्या, रक्तदाब चा त्रास जाणवू शकतो. त्यासाठी आधीच लेह मधून ३०० रुपयांना मिळणार छोटा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन ठेवा. पुढे “हुंदर” जिथे वाळवंट आहे. तसेच शेवटचं मुक्काम तुर्तुक-थांग भारतातील उत्तरेकडील शेवटचं गाव.

पाचव्या दिवशी तुर्तुक ते पेंगोंग लेक (थ्री इडियट वाला).

१३४ किमी अश्या अथांग लेकच्या तुम्ही प्रेमात पडणार हे नक्कीच. इथे राहण्याची सोय थोडी महाग आहे. हाऊस रूम १००० पासून २५०० पर्यंत. टेन्ट २५०० पासून ६००० पर्यंत आहेत. इथला सगळ्यात रम्य दृश्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ४ पासून उठून आकाशात सूर्योदय पाहत बसणे. ते पाहून झाल्यावर अंघोळीचा तर लांबच दात घासायचा विचार पण डोक्यात येणार नाही एवढी थंडी असते.

सहाव्या दिवशी पेंगोंग लेक ते सोमोरी (Tsomori) हा प्रवास चालू होतो.

या प्रवासात तुम्ही १९६२ चे भारत चीन युद्ध ज्या जागी झाले तिथून प्रवास करता. या वाटेत चीन युद्धाचे मेमोरियल सुद्धा आहे. शैतान सिंग भाटी यांनी केलेल्या कर्तबगारीची माहिती तुम्हाला तिथे भेटेल. सोमोरीला बौद्ध मॉनेस्ट्री आहे. तसेच पेंगोंग सारखाच लेक असून फक्त इथे ग्रीनरी जास्त आहे. या भागात दारू, सिगारेट व्यर्ज असून ५०० रुपये पर्यंत जागेवर दंड बसू शकतो. इथे हॉटेल चे भाडे १५००/ रूम पर्यंत आहे.

सातव्या दिवशी सोमोरी ते जसपा हा प्रवास.

या प्रवासात तुम्हाला श्योक वॅली, सुरजताल सारखे स्पॉट बघायला मिळतील. सगळ्यात खास आकर्षण आहे ते बारलाचा पास (१६०४० फूट). Baralachala means summit with cross roads from Spiti, Ladakh, Zanskar and Lahaul meet here and in ancient times it was part of a trade route. इथेच पुढे गेल्यावर जसपा जिथे टेन्ट, हॉटेल ची खास सोय आहे.

आठव्या दिवशी जसपा ते मनाली हा प्रवास सुरु होतो व्हाया रोहतांग पास (१३०५० फूट).

इथे तुम्हाला नक्की ट्रॅफिक जॅमचा विळखा लागणार. ६ किमी चा पट्टा पार करायला आम्हला ७ तास लागले. वरती पोहचल्यावर बर्फाचा आनंद लूटता येतो. रोहतांग पास वरून मनाली कडे उतरताना पुन्हा ट्रॅफिकशी कसरत होते पण त्या निसर्गरम्य वातावरणात ट्रॅफिकजॅम विसरून जाते. मनालीत पोहचल्यावर हॉटेल्सला कमी नाही. पण भाडे अव्वाच्या सव्वा.

जम्मू काश्मीर राज्यात मिळालेला पाहुणचार (हॉस्पिटॅलिटी) तुम्हाला मनाली (हिमाचल प्रदेश) मध्ये बघायला मिळत नाही.

नवव्या दिवशी परतीचा प्रवास चालू होतो.

हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळांच्या मनाली ते दिल्ली वोल्वो दुपारी २ पासून चालू होतात. त्या पहाटे ६ ला दिल्ली मध्ये पोहचवतात. या प्रवासात वोल्वोच्या भव्य खिडकीतून बाहेर बघताना कुल्लू आणी मंडी गावातील तरुणी तुम्हाला तुमचं ह्रदय तिथे ठेवून यायला भाग पाडतात.

दिल्लीमध्ये काश्मीर गेट (बस चा लास्ट स्टॉप) जवळ दिल्ली एअरपोर्ट साठी खास एक्सप्रेस मेट्रो स्टेशन आहे. तिथेच फ्लाईटच चेकिंग करा आणि बॅग सोडून द्या ती आपोआप पुण्यात पोचेल आणि तुम्ही मेट्रो पकडून मस्त एअरपोर्टला हात हलवत जा.

हे सर्व करुन मला खाऊन, राहून (पिऊन) मला २९,१२५ रुपये खर्च आला…!!!

आत्ता हा खर्च तीन-चार वर्षांपूर्वीचा होता. सध्याचा खर्च म्हणून सहज १० एक हजार वाढीव ठेवा अन् जा…

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.