शास्त्री भावा, लय झालं कोचिंग; कमेंट्री बॉक्समध्ये परत ये की…

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत सेमीफायनल पण गाठू शकला नाय. शपथ लय वाईट वाटलं. पण चालायचंच, आमचं आजोबा म्हटले- एका जत्रनं देव म्हातारा होत नाय. आजोबा काय आपल्याशी खोटं बोलत नसतात. त्यामुळं हरल्याचं दुःख गुमान परत एकदा पचवलं, आता ते २०१४ पासून पचवतोय म्हणा त्यामुळं काय लोड आला नाय.

एका गोष्टीचा मात्र पार बेकार दर्द झाला. आपला कोच रवीभाऊ शास्त्रीचं करिअर आयसीसी ट्रॉफीविनाच संपलं. ऑस्ट्रेलियाला दोनदा हरवलं, इंग्लंड पण जिंकलं, असली खतरनाक पोरं घडवली, पण आयसीसी ट्रॉफी काय शास्त्रीच्या खात्यात येऊ शकली नाय.

भिडू लोक, आता त्या रात्री शास्त्रीभाऊ मुन्नाभाईसारखा दोन वाजेपर्यंत बसला असंल काय?

कसंय ना शेठ, शास्त्रीनं लिंबू-पाणी प्यावं किंवा दुसरं काय तो त्याचा एकदम पर्सनल विषय ए. तो लय वांड कोच होता, ही काळ्या दगडावरची रेघ ए. कुणाला पुसायची असंल, तर लावा ताकद. (इथं इंस्टाग्रामवालं म्युझिक इमॅजिन करा.)

आता टीम इंडियाचा कोच नाही म्हणल्यावर शास्त्री काय करणार ही चर्चा होतीच. कुणी म्हणलं तो नव्या आयपीएल टीमचा कोच होणार. कुणी म्हणलं सुट्टीला जाणार. मग आम्ही जरा आमच्या आणि चाहत्यांच्या अंतर्मनात डोकावलं, जरा इतिहासही पाहिला आणि मग आम्हाला जाणवलं, शास्त्रीभाऊ कमेंट्री बॉक्समध्ये असला की टीम इंडियाचा विषय खोल होत असतोय. लय म्हणजे लय खोल हा.

कसं? हा प्रश्न तुम्हाला पडला असंलच; देणार, सगळ्याची उत्तरं देणार. गेल्या काही वर्षांत इंडियन टीमनं जे जे भारी क्षण अनुभवले त्याला आवाज होता रवी शास्त्रीचा.

कोलकाता टेस्ट

तीच तीच द्रविड-लक्ष्मण वाली. सगळ्या जगाला वाटलं होतं की, फॉलोऑन मिळालेला भारत हरत असतोय. पण आधी द्रविड-लक्ष्मणची बॅटिंग आणि मग भज्जीच्या बॉलिंगमुळं भारतानं लय हार्ड वाटणारी मॅच मारली. आता मॅच जिंकल्यानंतरचा आवाज जरी टोनी ग्रेगचा असला, तरी कमेंट्री बॉक्समध्ये रवी शास्त्री नावाचा लकी चार्म होताच.

युवराजचे सहा छक्के

अँड्र्यू फ्लिंटॉफनं युवराजला डिवचलं आणि भोगावं लागलं बिचाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला. टी२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या त्या मॅचमध्ये युवराजनं ब्रॉडला सहा बॉल सहा सिक्स मारले. सहाव्या सिक्सला शास्त्री जे बोलला, ते आयुष्यात विसरू शकत नाही. साहेब कमेंट्री बॉक्समधून म्हणाले, ‘And he puts it into the crowd, six sixes in an over! Yuvraj Singh finishes things off in style!’ अहाहाहा, अगदी दिलखेचक!

वर्ल्डकप विन

त्याच स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तान आणि भारत आमनेसामने आले. मिस्बाह उल हक पाकिस्तानला मॅच काढून देणार असं वाटत होतं, त्यानं उचललेला बॉल हवेत गेला आणि शास्त्री भाऊंचा आवाज घुमला, ‘In the air, Sreesanth takes it, India win! Unbelievable scenes here at the bull ring!’ धोनीचं राज्य सुरू झालं तेही शास्त्रीच्या बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये.

सचिनचा दोनशे

वनडे मॅचमध्ये कुठला बॅटर दोनशे रन्स करंल यावर सहसा विश्वास बसला नसता. तसं पोरींमध्ये बेलिंडा क्लार्कनं दोनशे ठोकला होता, पण पोरांमध्ये गणित बसणं अवघड होतं. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं तेही करून दाखवलं. तेही आफ्रिकेविरुद्ध. सचिनचे दोनशे पूर्ण झाले, तेव्हा कमेंट्री बॉक्समध्ये रवी शास्त्रीच होता. भाऊचे शब्द आले, ‘The first man on the planet to reach 200, and it’s a superman from India.’ काय सिंपलमध्ये भारी बोललाय.

हे तर तुम्ही विसरूच शकत नाय

वानखेडे स्टेडियम. तारीख २ एप्रिल २०११. मॅच इंडिया विरुद्ध श्रीलंका. स्ट्राईकवर धोनी-बॉलर कुलसेखरा, धोनीचा सिक्स आणि रवी शास्त्री म्हणतो, ‘Dhoni finishes off in style. India wins the World Cup after 28 years.’ शेठ, सगळं आठवून परत वाचून बघा, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

म्हणजे बघा कमेंट्री बॉक्समध्ये शास्त्री असला, की टीम इंडिया लय भारी खेळते आणि जिंकतेही. भावाच्या आवाजात शुभशकून ए, शंभर टक्के.

रवी शास्त्रीची कमेंट्री आवडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे सोपं इंग्लिश. उगाच जड शब्द नाहीत, उगाच अवघड टोन नाही. एका सगळ्या पिढीला इंग्लिशची ओळख रवी शास्त्रीच्या आवाजामुळं झाली. एका पिढीतली लोकं त्याच्यातल्या क्रिकेटरवर मरत होती, पोरी त्याच्या दिसण्यावर फिदा होत्या, आताच्या पिढीला त्याचं कोचिंग आवडलं, पण त्याच्या कमेंट्रीवर मात्र सरसकट सगळ्या पिढ्या दिलफेक करतील.

त्यामुळं प्रिय रवी भावा, कोचिंगमध्ये चार पैशे जास्त मिळत असले, ते तुझ्या आवडीचं काम असलं, तरी पण तू आपला कमेंट्री बॉक्समध्ये परत ये. आम्ही तुझा आवाज लय मिस करतोय बघ. आणि खरं सांगू काय भावा, टीम हरताना बघून आम्ही ब्याकार थकलोय. तू कमेंट्री बॉक्समधला लकी चार्म आहेस मर्दा. त्यामुळं मनापासून विनंती हाय, तू पुन्हा ये. तू पुन्हा ये. तू पुन्हा ये!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.